ग्रामीण महिलांच्या रोजगाराची ‘चेतना’

    दिनांक  02-Jan-2019
 
 

सातारा जिल्ह्यातील माण या दुष्काळी भागात राहणाऱ्या महिलांना चेतना सिन्हा यांनी माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...

 

आपण मुंबईसारख्या शहरात जरी राहत असलो तरी गावाकडची ओढ ही असतेच. गावातील नातेसंबंधांबरोबरच, तेथील पापड-लोणचे, धान्य किंवा इतर वस्तूही नातेवाईकांकडून आवर्जून पाठवल्या जातात, शहरात आणल्या जातात. परंतु, गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागाला दुष्काळाचे जबरदस्त चटके सोसावे लागले. त्यामुळे गावाला आणि गावाकडील माणसांना मदतीचा हात द्यायला हवे. कारण, ते गाव जीवंत राहायला हवे, त्यासाठी त्या गावातील माणसेही टिकायला हवीत.

 

गावाकडच्या लोकांची कष्ट करण्याची तयारी असते. मात्र, त्यांच्या हाताला काम मिळायला पाहिजे. म्हणूनच दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगाराची पर्यायी व्यवस्था असणे आवश्यक असते. ते न मिळाल्यास त्यांना पाच एकर शेती असो किंवा १५ एकर, त्याचा फायदा होत नाही. त्यांना शहरात येऊन मजुरी करावी लागते. गावाकडच्या माणसांना गावातच रोजगार मिळावा म्हणून चेतना सिन्हा यांनी माणदेशी महोत्सवाच्या माध्यमातून पुढाकार घेतला. चेतना सिन्हा या जानेवारी २०१८ मध्ये दावोस-स्वित्झर्लंड येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या सह-अध्यक्ष होत्या. माणदेशी फाऊंडेशनच्या माध्यमातून तीन लाख महिलांनी व्यवसाय प्रशिक्षण घेऊन आपले व्यवसाय यशस्वी केले आहेत. सध्या महाराष्ट्र, दादरा-नगर हवेली, कर्नाटकमध्ये माणदेशी फाऊंडेशनच्या एकूण ११ व फिरत्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्राच्या ६ शाखा आहेत.

 

चेतना यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठात अर्थशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकताना जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीने त्या प्रभावित झाल्या. तसेच या चळवळीत त्यांनी सहभागही घेतला. या चळवळीदरम्यान त्यांची ओळख सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील विजय सिन्हा या शेतकऱ्याशी झाली आणि पुढे दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. शहरात लहानाच्या मोठ्या झालेल्या चेतना यांनी दुष्काळी भागातील एका खेड्यात आपला संसार सुरू केला.

 

माण हा सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी तालुका. या भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी चेतना सिन्हा यांनी ‘माणदेशी फाऊंडेशन’ची स्थापना केली. सामाजिक चळवळीत काम करताना त्यांची भेट कांताबाई साळुंखे या महिलेशी झाली. तिला आपल्या मुलांना पावसाच्या पाण्यापासून वाचविण्यासाठी घराच्या छतावर ताडपत्री टाकायची होती. मात्र, ती ताडपत्री खरेदी करण्यासाठी तिला पैसे साठवायचे होते. तिने दररोज ५ रुपये जमा करायचे ठरविले. ती बँकेत पैसे घेऊन गेली. मात्र, एवढी क्षुल्लक रक्कम जमा करण्यासाठी बँकेने खाते उघडण्यास नकार दिला होता. बँक निव्वळ व्याज घेण्यासाठी नसते तर ती कोणाची तरी आत्यंतिक गरज आहे, हे चेतना यांना समजले. त्यामुळे त्यांनी बँक सुरू करण्याचा निश्चय केला.

 

१९९६ साली बँक सुरू करण्यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केला. मात्र, अनुमोदक निरक्षर असल्याचे कारण देऊन रिझर्व्ह बँकेने त्यांचा अर्ज फेटाळला. यावेळी निरक्षर महिलांनी सांगितले की, “आम्हाला भले लिहिता-वाचता येत नसेल, परंतु आकडेमोड मात्र आम्ही करू शकतो. आम्हाला हिशोब करता येतो.” मग चेतना सिन्हा महिलांसह परत रिझर्व्ह बँकेच्या अधिकार्‍यांना भेटायला गेल्या. महिला म्हणाल्या, “तुमचे अधिकारी कॅलक्युलेटरवर जे व्याजदरांचे गणित करू शकतात, ते आम्ही निव्वळ हाताने करू शकतो” आणि या महिलांनी ते प्रत्यक्षात करून दाखविले. अधिकार्‍यांना खात्री पटली आणि चार महिन्यांत रिझर्व्ह बँकेचा परवाना मिळून भारतातील पहिल्या महिला सहकारी बँकेचीमाणदेशी महिला सहकारी बँके’ची स्थापना १९९७ साली झाली. या बँकेतून महिलांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळू लागले. अनेक महिलांनी कर्ज घेऊन नव्याने व्यवसाय सुरू केले, तर काहींनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. ‘माणदेशी फाऊंडेशनाने बिझनेस स्कूल सुरू केले आहे. पिठाची गिरणी कशी सुरू करावी? ज्यूस सेंटर कसं चालवावं? फास्ट फूड सेंटर कसं उभारावं? शेळ्या-मेंढ्यांचं पालन कसं करावं ते अगदी आलेल्या ग्राहकांना कशा पद्धतीने सेवा द्यावी? आपल्या उत्पादनासाठी बाजारपेठ कशी मिळवावी? हे सर्व बिझनेस स्कूलमध्ये शिकविण्यात येत आहे. ९५३ गावांतील ६३ हजार महिला या बिझनेस स्कूलमधील विविध उपक्रमांशी जोडल्या गेल्या. यांपैकी ७४ टक्के महिलांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केले.

 

या महिलांच्या वैयक्तिक वार्षिक मिळकतीत सरासरी १३ हजार, २०० रुपयांनी वाढ झाली. माणदेशी एमबीए हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या महिलेच्या वार्षिक मिळकतीत सरासरी २० हजार, ७६० रुपयांनी वाढ झाली. ४४ टक्के लाभार्थी महिलांच्या सोने, गाई, शेळ्या, मशीन्स अशा स्वरूपाने मालमत्ता वाढली. शेतकरी जनावरांना मुलांप्रमाणे जीव लावतात. दुष्काळामुळे जनावरांसाठी चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे जर ही जनावरे नसतील तर गावात राहण्यात काय अर्थ, असे शेतकर्‍यांना सांगितलेले. त्यामुळे चेतना यांनी जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. तसेच दुष्काळ पडू नये म्हणूनही त्यांनी उपाययोजना केल्या आहेत. या परिसरात त्यांनी १३ बंधारे उभारले आहेत त्यामुळे येथील गावकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. चेतना सिन्हा आणि त्यांच्या ‘माणदेशी फाऊंडेशन’च्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.

 - नितीन जगताप 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/