आम्ही जात नव्हे तर गुण, कर्तृत्व पाहतो : नितीन गडकरी

    दिनांक  19-Jan-2019

 

 
 
 
 

नितीन गडकरींचा काँग्रेसच्या दुष्प्रचारावर पलटवार

 

नागपूर : राजकारणात कन्व्हिन्स करता आले नाही तर कन्फ्यूज केले जाते. काँग्रेसने याच तंत्राचा वापर आमच्याविरोधात केला. आम्ही जातीयवादी, अनुसूचित जाती-जमाती विरोधी अस्पृश्यता समर्थक आणि उच्च वर्णियांचा पक्ष असल्याचा दुष्प्रचार काँग्रेसकडून सातत्याने करण्यात आला. पण आम्ही जात नव्हे तर व्यक्तीचे गुण आणि कर्तृत्व पाहतो, अशा शब्दांत केंद्रीय भूपृष्ठवाहतूक आणि गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. आज नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्ष अनुसुचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनावेळी ते बोलत होते.

 

नितीन गडकरी म्हणाले की, मी आणि माझा पक्ष जातीचे राजकारण करत नाही. कोणतीही व्यक्ती त्याच्या जात, धर्म, लिंग वा रुपाने नव्हे तर कर्तृत्वाने मोठी होते. आम्ही याच विचारधारा व संस्कारानुसार काम करत आहोत. अस्पृश्यता, शिवताशिवत, भेदाभेद नष्ट व्हावा यासाठी परिणामांची पर्वा न करता आमची वाटचाल सुरु आहे. सामाजिक आणि आर्थिक समतेवर आमची श्रद्धा आहे. आम्ही केवळ घोषणांपुरते नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातही यानुसारच आचरण करतो. हे विचार आम्ही आमच्या आयुष्यातही उतरवले आहेत. काँग्रेसने सातत्याने भाजप व रा. स्व. संघाविरोधात दुष्प्रचार केला. आम्हाला अनुसुचित जाती-जमातीविरोधी ठरवले. पण आम्ही कधीही जात पाहून एखाद्याला महत्त्व वा पद दिले नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता असताना अनेक पदाधिकारी अनुसुचित जातीतले होते. संघातले अनेक प्रचारक अनुसुचित जातीतले होते. आम्ही त्यांचेच अनुकरण करत असू. बौद्धिकात देखील आम्हाला समता व समरसतेबद्दलच सांगितले जात असे. पण काँग्रेसने जाणीवपूर्वक आमच्याविरोधात गैरसमज पसरवले, असे टीकास्त्र नितीन गडकरी यांनी सोडले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत गडकरी म्हणाले की, नागपूरला देवेंद्र फडणवीस महापौरपदी व राज्यात युतीचे शासन असताना दिक्षाभूमीच्या विकासाचे काम करण्यात आले. मुंबईतल्या इंदू मिलची जागा आम्ही डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी निश्चित केली व त्या दिशेने पावले उचलली. इतकेच नव्हे तर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरावेळी आम्ही आंदोलने केली, लाठ्या-काठ्या खाल्ल्या. याच नामांतर लढ्याचे नामांतर शहीद स्मारक आम्ही उभारले. लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकर ज्या घरात राहत होते, ते घरही राज्य सरकारने विकत घेतले. पण काँग्रेसने यामधले एकही काम कधी केले नाही. काँग्रेसने फक्त आश्वासने देण्याचेच काम केले. म्हणूनच राज्यातल्याच नव्हे तर सर्वत्रच्या अनुसुचित जाती समाजाने आम्हाला साथ दिली. कारण आम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे काम केले. दरम्यान, सुशासन आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही पुढे जात आहोत, असे म्हणत नितीन गडकरींनी सांगितले की, सत्तेवर आल्यानंतर आमचा उद्देश गरीबांची, वंचितांची, पिडीतांची सर्वांगीण प्रगती करणे हाच होता व आहे. सर्वांना रोजगार मिळावा, भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शकतायुक्त व्यवहार व्हावेत, हे आमचे धोरण आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

गंगा नदी शुद्धीकरणाबद्दल नितीन गडकरी म्हणाले की, आतापर्यंत १० टक्क्यांपर्यंत गंगा नदी स्वच्छ झाली आहे. येत्या मार्च महिन्यात ३०-३५ टक्क्यांपर्यंत गंगा शुद्ध होईल. तर पुढच्या मार्च महिन्यात गंगा १०० टक्के शुद्ध होईल. सध्या गंगेच्या अविरल प्रवाहासाठी २० टक्के जास्त पाणी नदीत सोडले आहे. हे सर्व आम्ही केवळ साडेचार वर्षात केले. पण काँग्रेसने यासाठी राजीव गांधींपासून फक्त घोषणाच केल्या, प्रत्यक्ष काम केले नाही, अशी टीकाही केली.

 

सावरकर आमचे दैवत

 

स्वातंत्र्यवीर सावरकर आमचे दैवत आहेत. सावरकरांचे सामाजिक चिंतन आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. राम मंदिरात ज्यावेळी अनुसुचित जातीतील लोकांना प्रवेश नाकारला, त्यावेळी सावरकरांनी त्याविरोधात आंदोलन केले. सावरकर प्रखर राष्ट्रवादी होते. शिवताशिवत, भेदाभेद, अस्पृश्यता विसरुन हिंदू समाजात एकता व समता प्रस्थापित व्हावी या विचारांचे ते प्रेरक होते. बाळासाहेब देवरसांनीदेखील पुण्यातल्या वसंत व्याख्यानमालेत अस्पृश्यतेवर कठोर शब्दांत आसूड ओढले व अस्पृश्यता नष्ट करण्याच्या बाजून मत मांडले, असे यावेळी नितीन गडकरींनी ठामपणे सांगितले.

 

एकता-अखंडतेला दिलेले आव्हान खपवून घेणार नाही

 

आम्ही राष्ट्रवादाला, मातृभूमीला सर्वोच्च स्थानी मानतो. मातृभूमीनंतर अन्य गोष्टी येतात, हेच संस्कार आमच्यावर झाले व हीच आमची विचारधारा आहे. आम्ही जगू तर देशासाठी आणि मरुही देशासाठीच, असे श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगत आले. आमच्या दृष्टीने अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा प्रमुख मुद्दा आहे. यावरुन जर कोणी देशाच्या एकता आणि अखंडतेला आव्हान दिले तर आम्ही ते कधीही खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी नितीन गडकरी यांनी दिला.

 

भाजपचा इतिहास बलिदानाचा

 

राष्ट्रावर आलेल्या संकटाला भाजप व संघ कार्यकर्त्यांनी नेहमीच छातीवर झेलले. आमच्या कित्येक कार्यकर्त्यांनी राष्ट्रासाठी बलिदान दिले. जम्मू-काश्मिरमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी हुतात्मा झाले. भाजपचा इतिहास हा बलिदानाचा आहे. आम्ही आमच्या विचारांशी कधीही तडजोड करणार नाही. कारण आमचा पक्ष माय-लेकाचा वा पिता-पुत्राचा नव्हे तर राष्ट्रवादाच्या विचारावर आयुष्य पणाला लावणार्‍यांचा आहे, असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/