सफाळ्यात भीषण अग्नितांडव

    दिनांक  19-Jan-2019

 
 

 

पालघर : सफाळे येथील बाजारपेठेतील जयदीप इमारतीमधील चार दुकानांना रात्री अडीचच्या सुमारास आग लागली. आगीनंतर तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असले, तरी या आगीत ३ दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच लगतच्या इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 

पालघर तालुक्यातील सफाळे बाजारपेठेतील ४ दुकानांतील वधू कलेक्शन एम्पोरियम या दुकानाला अचानक आग लागली. पाहता पाहता ही आग बाजूच्या तीन दुकानात पसरली. आग लागल्याची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या २ बंबाना तर पालघर, भोईसर येथील २ बंबाना पाचारण करण्यात आले. ४ तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

 

आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ४ दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये २ कपड्यांची दुकाने, एक हॉटेल आणि एक हार्डवेअरच्या दुकानांचा समावेश आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समजते. इमारतीतील दुकानांना आग लागल्यामुळे इमारतीतील तसेच शेजारील इमारतीतील रहिवाशांना सुखरूपस्थळी हलवण्यात आले आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/