दिव्यांगत्वावर मात करणारी ‘निष्ठा’

    दिनांक  18-Jan-2019   


वयाच्या २२व्या वर्षी केवळ आपल्या निष्ठेच्या जोरावर निष्ठाने ’मिस डेफ इंडिया २०१८,’ ’मिस डेफ एशिया-२०१८,’ ’मिस डेफ वर्ल्ड-२०१८’ हे तीन किताब एकाच वर्षात जिंकले. निष्ठाचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता.

 

हजार बर्क गिरे लाख आंधियां उठे,

वो फूल खिल के रहेंगे जो खिलने वाले हैं।

हा साहिर लुधियानवी यांचा शेर त्याच लोकांना लागू होतो, जे आपल्या स्वप्नांसाठी कोणत्याही थराला जाऊन आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. अशीच एक दिल्लीतील वयाच्या तिसर्‍या वर्षी मूकबधिरत्व प्राप्त झालेली निष्ठा डुडेजा. दिव्यांगत्वावर मात करत, वयाच्या २२व्या वर्षी केवळ आपल्या निष्ठेच्या जोरावर निष्ठाने ’मिस डेफ इंडिया २०१८,’ ‘मिस डेफ एशिया-२०१८,’ ‘मिस डेफ वर्ल्ड-२०१८’ हे तीन किताब एकाच वर्षात जिंकले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. निष्ठाचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. आपल्या देशात दिव्यांगांना जी वागणूक दिली जाते, त्याचा त्रास निष्ठालाही सहन करावा लागला. मात्र, आई-वडिलांनी तिला सर्वतोपरी मदत केली. आपली मुलगी मूकबधिर आहे, हे कळल्यानंतर खरंतर निष्ठाच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यांना नातेवाईकांनी तिला आश्रमात ठेवण्याचाही सल्ला दिला. मात्र, आपल्या मुलीला लढायला शिकवायचं आहे, आपण हार मानून कसं चालेल? या विचाराने त्यांनी तिला इतर मुलांप्रमाणेच वागणूक दिली. निष्ठाचे वडील वेदप्रकाश डुडेजा रेल्वेत अभियंता म्हणून कार्यरत असल्याने त्यांची दर दोन वर्षांनी विविध राज्यात बदली होत असे. त्यामुळे निष्ठाचे शिक्षण हे वेगवेगळ्या शाळांमध्ये झाले. तिच्या मूकबधिरत्वाबद्दल कळल्यानंतर निष्ठाच्या आई-बाबांनी स्वत: या सगळ्यावर अभ्यास केला, ते अनेक लोकांना भेटले, डॉक्टरांशी चर्चा करून निष्ठाला श्रवणयंत्र देण्यात आले. वयाच्या पाचव्या वर्षी निष्ठा काही प्रमाणात ऐकू लागली. मात्र, तिला बोलता येत नव्हते, म्हणून तिच्या वडिलांनी एक खास बोलण्याची पद्धती अवलंबायची ठरवली आणि निष्ठाचा बोलण्याचा प्रवास सुरू झाला. ही पद्धती आजही निष्ठा वापरते. यामुळे आज ती स्वत:ची मतं मांडू शकते. नटणे आणि नटवणे या दोन्ही गोष्टी लहानपणापासून तिला आवडायच्या. त्यामुळे तिने ब्युटीपार्लरचे प्रशिक्षणही घेतले होते.

 

तसेच खेळातही रुची असल्यामुळे तिने टेनिसही शिकण्यास सुरुवात केली. निष्ठाच्या मते, “मुळात मला लहाणपणापासून मी इतरांपेक्षा वेगळी आहे, अशी वागणूक कधी मिळालीच नाही. त्यामुळे मी स्वत:ला कधीच दिव्यांग मानले नाही.” निष्ठाला तिच्या प्रवासात जेवढी तिच्या आईवडिलांनी मदत केली, तेवढीच मदत तिला तिच्या मित्र-मैत्रिणींनीही केली. दिल्लीतील व्यंकटेश्वर महाविद्यालयात शिकत असताना, तिला तिच्या शिक्षकांनी ‘मिस डेफया स्पर्धेबद्दल सांगितले आणि निष्ठाने क्षणाचाही विलंब न लावता या स्पर्धेतभाग घेतला. यासाठी सलग दोन वर्षे या स्पर्धेची निष्ठाने तयारी केली. तिच्या मते, “लोकांना या अशा स्पर्धांबद्दल एक भ्रम असतो की, तुम्ही दिसायला सुंदर असलात की पुरे, तुम्ही जिंकणार. मात्र, यात तुमच्या सामान्यज्ञानाचीही परीक्षा होते. त्यामुळे ‘मिस डेफ’ या स्पर्धेला मी गृहीत न धरता खूप मेहनत केली आणि त्याचं फळ मला मिळालं.”

 

या स्पर्धेदरम्यान झालेल्या प्रश्नोत्तर फेरीत निष्ठाला दिव्यंगत्वावर मात करण्यासाठी काय करणार, असे विचारले असता “मी कुणाचं आयुष्य बदलू शकते की नाही, याबाबत मला ठाऊक नाही. पण, मी ज्या कुणाला आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंचाची गरज आहे, तो त्यांना कसा मिळवून देता येईल, यासाठी प्रयत्न करेन. अर्थात, आपल्याकडे दिव्यांगाना जी वागणूक दिली जाते ती बदलेल की नाही, मला माहीत नाही. पण, माझ्यासारख्या खुल्या डोळ्यांनी स्वप्न पाहणार्‍या प्रत्येकाला माझ्यापरीने मी मदत करेन,” या तिच्या उत्तराने गहिवरून गेलेल्या परीक्षकांनी तिची निवड या स्पर्धेसाठीकेली आणि पुढे ही स्पर्धा निष्ठाने जिंकली. आपल्या यथाबद्दल बोलताना निष्ठा म्हणते की, ”मला माझ्या नावासारखं राहायचं आहे आणि मुळात आज मला लोकं मी दिव्यांग आहे म्हणून ओळखत नाही, तर मी काहीतरी मिळवून दाखवलं म्हणून ओळखतात. मुळात आपल्याकडे कर्तृत्वापेक्षा एखाद्या व्यक्तीच्या दुबळेपणावर जास्त भर दिला जातो. आम्हाला सहानुभूती नको, समान वागणुकीची गरज आहे.”

 

निष्ठाने केवळ या सौंदर्य स्पर्धेतच भाग घेतला असे नाही, तर तिने टेनिस या खेळातही भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. निष्ठा ही कमी वयात ‘वर्ल्ड डेफ टेनिस चॅम्पियनशिपस्पर्धेतभाग घेणारी पहिली भारतीय महिला ठरली होती. २०१३ साली बल्गेरिया येथे, २०१५ साली इंग्लंड येथे आणि २०१७ साली तुर्कीला आयोजितवर्ल्ड डेफ टेनिस चॅम्पियनशिप’ स्पर्धेत तिने भाग घेतला होता. निष्ठाने २०१७ साली संयुक्त राष्ट्रांच्यावतीने आयोजित महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमातही सहभाग घेतला होता आणि असं करणारी ती अनुरिमा सिन्हा नंतरची दुसरी दिव्यांग ठरली आहे. यावेळी आपल्या भाषणात निष्ठाने, ”प्रत्येक माणसात काहीतरी कमतरता असते, याचा अर्थ ती व्यक्ती काहीच करू शकत नाही, असा होत नाही. आत्मविश्वास, आत्मचिंतन आणि आत्मज्ञान या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात.” यावरून साहिर साहेबांच्या या ओळी आठवतात.

 

उम्मीद वक्त का सबसे बडा सहारा है।

गर हौसला है, तो दर मौज किनारा है।

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/