हिंदू हिताय भाग : ८ हिंदूंची मानसिकता ओळखा!

    दिनांक  17-Jan-2019   


 
 
 
फ्रँकाइज गोटिए म्हणतात,“नरेंद्र मोदी यांच्या रूपाने हिंदू राज्यशक्ती प्रस्थापित करण्याची अनेक शतकानंतरची संधी हिंदू समाजाला मिळालेली आहे. तिचा गैरवापर केला जाऊ नये.” लोकांना नेमके काय पाहिजे आहे, याचा शोध सत्ता राबविणाऱ्यांनी घेतला पाहिजे. त्यासाठी उपयुक्त ठरु शकेल अशा या ‘हिंदू हिताय’ लेखमालेतील हा आजचा शेवटचा लेख...
 

फ्रँकाइज गोटिए यांचे ‘हिंदू पॉवर’ या नावाचे तीन लेख आहेत. ‘हिंदू पॉवर’ याचा अर्थ, हिंदूंची राजकीय शक्ती असा होतो. एका लेखाची सुरुवात ‘मुस्लीम धटिंगण आहेत आणि हिंदू भित्रे आहेत,’ या महात्मा गांधींच्या वाक्याने केली आहे. भित्रेपणाचे उदाहरण म्हणून त्यांनी काश्मीर खोऱ्यातून चार लाख हिंदूंच्या पलायनाचे उदाहरण दिले आहे. हिंदू असा भित्रा का झाला, या प्रश्नाचे उत्तर देताना गोटिए म्हणतात की, “साडेचारशे वर्षे हिंदू राज्यसत्तेपासून वंचित राहिले आहेत. हिंदूंचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की, मुस्लीम आक्रमकांनी मध्ययुगात जवळजवळ एक कोटी हिंदूंच्या कत्तली केल्या आहेत. या कत्तलीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम हिंदू मानसिकतेवर झालेला आहे. तो आजही आपण पाहू शकतो. हिंदू फार लवकर भयभीत होतात, ते सर्वात बेशिस्त लोक आहेत, फसविण्यात त्यांना आनंद वाटतो आणि कायदे मोडण्यात ते तरबेज असतात.” हे अतिशय कठोर शब्द आहेत. कठोर असले तरी वास्तविकता दाखविणारे आहेत.

 

इंग्रजांनी भारतीयांच्या बुद्धीत प्रवेश केला आणि जसे इंग्रज विचार करतात, तशी विचार करण्याची सवय इथल्या बुद्धिवंतांना लागली. यासाठी त्यांनी नेहरूंचे उदाहरण दिलेले आहे. राज्यशक्तीचा वापर कसा करायचा, हे कुरूक्षेत्रात भगवद्गीतेच्या माध्यमातून श्रीकृष्णाने सांगितले आहे. आपला ज्याच्यावर ठाम विश्वास आहे, त्यासाठी तेवढ्याच ठामपणे संघर्षास उभे राहावे लागते. शत्रूची दयामाया करून चालत नाही. समोर काका, मामा, आजोबा आहेत, याचा कसलाही विचार करायचा नाही. ते आपल्या पापानेच मेलेले असतात. त्यांना मारणे हेच पुण्य आहे, ही गीतेची शिकवण आहे. हिंदू लोक तेही सर्व विसरले आहेत.

 

हिंदूंना नेमके काय पाहिजे आहे, हे फ्रँकाइज गोटिए फार स्वच्छ शब्दांत सांगतात,“आर्थिक विकास, उत्पन्नात वाढ, नोकऱ्यांची उपलब्धता या सर्व गोष्टी आपल्या स्थानी जरी ठीक असल्या तरी त्या हिंदू राज्यशक्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने फारशा उपयोगाच्या नाहीत. अटल बिहारी वाजपेयी यांनी या सर्व गोष्टी करण्याचा जीवापाड प्रयत्न केला. २००४ साली हिंदू मतदारांनी त्यांना नाकारले. पुढचा इतिहास आपल्याला माहीत आहे.” गोटिए यांचा प्रश्न असा आहे की, “नरेंद्र मोदीदेखील अटल बिहारी यांच्या मार्गाने तर निघाले नाहीत ना?” ते म्हणतात,“नरेंद्र मोदी यांच्या रूपाने हिंदू राज्यशक्ती प्रस्थापित करण्याची अनेक शतकानंतरची संधी हिंदू समाजाला मिळालेली आहे. तिचा गैरवापर केला जाऊ नये.” लोकांना नेमके काय पाहिजे आहे, याचा शोध सत्ता राबविणाऱ्यांनी घेतला पाहिजे. गोटिए यांचे हे तिन्ही लेख खास ‘गोटिए शैली’तील आहेत आणि ते इंटरनेटवर उपलब्धदेखील आहेत, जिज्ञासू वाचकांनी ते वाचावेत.

 

हिंदू समाजाला सामूहिकपणे कोणत्या गोष्टीचा आनंद होतो? कांद्याचे भाव पडले किंवा चढले, डाळीचे भाव पडले किंवा चढले, भाज्या महाग झाल्या की स्वस्त झाल्या, हे सगळे विषय वृत्तपत्रीय बातम्यांसाठी चांगले असतात आणि दूरदर्शनवरील फालतू चर्चेसाठी उपयुक्त असतात. या प्रश्नाच्या कुठल्याही सकारात्मक किंवा नकारात्मक उत्तरात हिंदू राजकीय शक्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य नाही. हिंदू माणसाचा स्वभाव अत्यंत सोशिक आहे. ऐहिक जीवनासंबंधीच्या त्याच्या महत्त्वाकांक्षा फार मर्यादित असतात. सध्या उपभोगत्तावादाची चर्चा चालू आहे. ‘खा, प्या, मजा करा’ संस्कृतीविषयी चिंता केली जाते. परंतु, याच्यामागे जाणाऱ्या हिंदू समाजाचे प्रमाण किती आहे? पाव ते अर्धा टक्का असेल की नाही याची शंका आहे. प्रत्येक हिंदू माणूस एका मर्यादेच्या पलीकडे संपत्ती मिळविण्याच्या मागे धावत नाही. तो स्वतःहून निर्णय करतो आणि एका क्षणी थांबतो.

 

याची मला अनेक उदाहरणे माहीत आहेत. त्यांची नावे मी इथे सांगत नाही. शंभर कोटींपेक्षा अधिक संपत्तीचे रुग्णालय उभा करणारा डॉक्टर ही सर्व संपत्ती न्यासाच्या हवाली करून न्यासाचा एक कर्मचारी म्हणून राहण्याचा निर्णय करतो. दुसरा एक हजार कोटींचा बांधकाम व्यवसाय सोडून आता राहिलेले जीवन वनवासी बांधवांसाठी, म्हणून व्यवसायातून निवृत्ती घेतो. ज्याची औद्योगिक क्षमता उद्योग साम्राज्य निर्माण करण्याची आहे, तो आयुष्याच्या एका वळणावर थांबतो आणि उर्वरित आयुष्य समाजसेवेसाठी खर्च करायचे, असा निर्णय करतो. ही हिंदू आत्म्याची भूक आहे. म्हणून दरडोई उत्पन्न किती वाढणार, प्रत्येकाचे उत्पन्न किती वाढणार, सर्वांना सुंदर घरे मिळणार, या गोष्टी हिंदू मानसिकतेच्या दृष्टीने दुय्यम असतात.

 

त्याला पराक्रमाची भूक आहे. क्रिकेट खेळ आपला नाही, पण आपले खेळाडू जेव्हा बलाढ्य संघाचा पराभव करतात, तेव्हा आपण सर्वजण फटाके फोडून आनंद साजरा करतो. टेनिसमध्ये किंवा बॅडमिंटनमध्ये जेव्हा आपल्या महिला खेळाडू प्रथम स्थान मिळवितात, तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. जेव्हा पाकिस्तानमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला जातो, तेव्हा प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुगते आणि बाबरी ढाचा जमीनदोस्त होतो, तेव्हा झालेल्या आनंदाला काही पारावार नसतो. जेव्हा आपले जवान पाकिस्तानी दहशतवाद्यांना वेचून वेचून ठार मारतात, तेव्हा आपल्याला मी काही तरी पराक्रम केला, असे वाटू लागतेअन्नाची भूक शरीराची असते. वस्त्राची भूकही शरीराची असते. निवाऱ्याची भूकदेखील शरीराचीच, या भुका भौतिक गोष्टी निर्माण करून भागविता येतात, आत्म्याच्या भुकेचे तसे नाही, ती लगेच दिसत नाही, ती समजून घ्यावी लागते. आत्म्याची भूक दोन प्रकारची आहे. पहिली भूक विश्वकल्याणाची आहे आणि दुसरी भूक पराक्रमी आणि स्वाभिमानी जीवन जगण्याची आहे. विश्वकल्याणाचा मार्ग अनेकवेळा व्यक्तिगतही असू शकतो आणि सामूहिकही असू शकतो. परंतु, पराक्रमाचा मार्ग केवळ सामूहिकच आहे आणि तो केवळ राज्यशक्तीच्या माध्यमातूनच पूर्ण होऊ शकतो.

 

प्रत्येक हिंदूची सुप्त भावना अशी आहे की, काश्मीरचा गुंता सन्मानजनक मार्गाने सोडविला पाहिजे. ज्या हिंदूंना काश्मीर सोडून निर्वासित व्हावे लागले, त्यांना सन्मानाने काश्मीरमध्ये जाता आले पाहिजे. ही गोष्ट जो राजनेता करील, त्याच्यामागे हिंदू आनंदाने जातील. त्याला डोक्यावर घेतील. प्रत्येक हिंदूची सुप्त मनीषा अशी आहे की, काश्मीरचा जो भूभाग पाकिस्तानने बळकावलेला आहे, तो आपण परत मिळवला पाहिजे. काश्मीर हे भारतमातेचे मस्तक आहे, शरीराची सर्व शोभा शरीराच्या मस्तकात असते. ते आज अर्धे कापले गेले आहे, ते पूर्ण झाले पाहिजे. प्रत्येक हिंदूची सुप्त इच्छा आहे की, आपले परमपवित्र काशी विश्वेश्वराचे मंदिर त्याच्या मूळ स्थानी स्थापित झाले पाहिजे. ज्या स्थानी रामाचा जन्म झाला, त्या स्थानी भव्य रामाचे मंदिर उभे राहिले पाहिजे. ज्या कृष्णाने सर्व भारताला मोहून टाकले आहे, त्याचे मनमोहक जन्मस्थान पुन्हा आपल्या हाती आले पाहिजे. यासाठी जो राजनेता झुंज देईल आणि जो पक्ष रणांगणात उतरेल, त्याच्यामागे हिंदू धावतील. हिंदू मानसिकतेची ही भूक आमच्या राजकीय नेत्यांनी समजून घ्यायला पाहिजे.

 

या गोष्टी करण्यास हिंदू समाजातील गुलामी मानसिकतेचे लोक प्रचंड विरोध करतील. ते नवनवीन वैचारिक शोध लावत बसतील, न्यायालयीन लढाया लढत बसतील, सत्याची प्रतिष्ठापना असत्याचा प्रतिकार केल्याशिवाय होत नाही आणि त्यासाठी कृष्णनीतीचा अवलंब करावा लागतो. सुदर्शनधारी श्रीकृष्णाने कुणाशीही वैर न करता केवळ धर्मसंस्थापनेवर लक्ष केंद्रित करून सर्व गोष्टी केल्या. आवश्यक तेवढा संहारही केला. आपले मूळ लक्ष्य सोडले नाही. संकटे त्याच्यावरही आली. कौशल्याने त्याच्यातून त्यांनी मार्ग काढला.

 

भारतावर वायव्येकडून कृष्णाच्या काळातही आक्रमणे झाली. आक्रमणकारीचे नाव होते कालयवन. त्याने मथुरेवर हल्ला केला. त्याच्याशी लढणे शक्य नव्हते. तेवढे सैन्यबळ कृष्णाकडे नव्हते. तो आपल्यामागे लागणार हे गृहीत धरून कृष्ण पळाला. एका पर्वताच्या गुहेत झोपलेल्या राजा मुचुकुंद यांच्या अंगावर आपला शेला टाकला आणि तो कोपऱ्यात बसला. त्या राजाला असा वर मिळाला होता की, जो कुणी त्याला मध्येच झोपेतून उठवेल, त्याचे पाहताक्षणीच भस्म झाले पाहिजे. आक्रमक कालयवन याने झोपलेला कृष्णच समजून त्याला लाथ मारली आणि त्याला उठविला. मुचुकुंदाने त्याच्याकडे पाहताच त्याचे भस्म झाले. याला म्हणतात कृष्णनीती. तुम्ही रस्ते बांधा, मेट्रो बांधा, घरे बांधा, जीवनावश्यक वस्तू स्वस्त करा, यामुळे हिंदू आपली जात विसरणार नाही, आपली भाषिक अस्मिता विसरणार नाही, आपली पक्षीय ओळख विसरणार नाही, घराणेशाहीची शरणागत मनोवृत्ती सोडणार नाही, हे सर्व त्याला सोडायला लावायचे असेल तर पराक्रमी व्हा, पराक्रम करा, तोच तुम्हाला यश देईल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/