चंद्र, चीन आणि चकोर

    दिनांक  17-Jan-2019   

 

 
 
 
 
 
चाँद को क्या मालूम चाहता है,

उसे कोई चकोर,

वो तो दूर से देखे, करे न कोई शोर

चाँद को क्या मालूम...

 

१९६६ साली आलेल्या पृथ्वीराज कपूर यांच्या 'लाल बंगला' या सिनेमातलं हे गाणं. या गाण्याप्रमाणेच अगदी चंद्र आणि चीन यांचं नात झालं आहे. कारण, अंतराळविश्वात आपलं स्थान कुठे असावं, हे चीनला ठाऊक आहे, त्यामुळे त्यांचे नवनवीन प्रयोग सुरू असतात. असाच एक प्रयोग करत चीनने चक्क चंद्रावरच कापसाची लागवड केली. चंद्राचा 'चेप' भाग म्हणजे असा भाग जो पृथ्वीवरून दिसतो, ज्यावर डाग आहेत. या भागात मोठ्या प्रमाणावर प्रथिने असल्यामुळे अनेक देश या भागाकडे डोळे लावून बसले होते. याच भागात यशस्वीरित्या चीनने दि. ४ जानेवारी रोजी 'चांग ई-४' हे यान पाठवले आणि चंद्राच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी या यानासोबत अनेक बिया आणि पोषक मातीची एक पेटीही सोबत पाठविण्यात आली. यामध्ये कापूस, बटाटे, पांढरे तीळ, रॉक क्रेस नावाची फुलांची एक प्रजाती, यीस्ट आणि काही उडणाऱ्या माशांचा समावेश आहे, सोबत काही पोषकेही पाठवलेली. मात्र, चंद्रावर थेट कापसाचे आणि बटाट्याचे बीज रोवले गेले नाही. शास्त्रज्ञांनी एका लहानशा प्रयोगशाळेत पृथ्वीवरील वातावरण निर्माण करून हे बीज रोवले आणि तब्बल १३ दिवसांनी कापसाचे आणि बटाट्याचे रोपटे उगवले, मात्र ते जगू शकले नाही. चंद्रावरील तापमान आणि गुरुत्वाकर्षण यामुळे पोषक तापमान झाडांना मिळू शकले नसले तरी, ही एक ऐतिहासिक बाब आहे, सगळ्यांसाठीच.

 

पण, या सगळ्या मोहिमेचा आढावा घेतला तर, चीनने अतिशय गुप्तरित्या ही मोहीम राबविली. अंतराळविश्वात प्रगतीची शिखरं गाठण्यासाठी गेली अनेक वर्षं चीनची जोरदार तयारी सुरू आहे. त्याच अनुषंगाने चीनचे 'मिशन चंद्र २०३०' ही विशेष मोहीम आहे आणि हा सगळा खटाटोप केवळ याचसाठी सुरू आहे. याआधी चीनचे 'चांग ई-३' हे यान २०१३ साली चंद्रावर उतरले होते, आता चीन २०३० च्या तयारीत आहे. जर चंद्रावर अन्नपुरवठा निर्माण करण्यात आला तर, अंतराळात जाणाऱ्या लोकांसाठी अन्नाचा पुरवठा अशा नियंत्रित केलेल्या वातावरणातील अन्नघटकांपासून होऊ शकतो. त्यासाठी पृथ्वीवरून खाद्यपदार्थ पाठविण्याची गरज भासणार नाही. मुळात हा प्रयोग यशस्वी होण्याची चिन्हे फारच कमी आहेत. तरी या वर्षात आणखी दोन यान पाठवून यासंबंधी आणखी काय करता येते का, यासाठी चाचपणी चीनकडून सुरू आहे. यातील, 'चांग ई-५' हे यान चंद्रावरील काही घटक पृथ्वीवर घेऊन येण्याचे काम करणार आहे. यामध्ये खनिजे, माती यांचा समावेश आहे, त्यामुळे २०३० च्या दिशेने चीनने पाऊले टाकायला सुरुवात केली आहे, हे स्पष्ट झाले आहे.

 

मात्र, चंद्रावर बियाणे रुजविण्याचा हा पहिला प्रयत्न नाही. १९७१ मध्ये 'नासा'चे एक यान ५०० झाडांची बियाणे, रोपे चंद्रावर घेऊन गेले होते. यापैकी काही बियाणी चंद्रावर लावण्यात आली, तर उरलेली पृथ्वीवर लावण्यात आली. यांना 'मून ट्री' असे म्हटले जाते, यात विशेषत: फुलझाडांचे प्रमाण जास्त होते. मात्र, 'नासा'ची ही मोहीम यशस्वी झाली नाही. 'नासा'च्या या प्रयोगानंतर अनेक वैज्ञानिकांनी त्यावर टीका केली होती, कारण चंद्रावरचं तापमान आणि शून्य गुरुत्वाकर्षणात हा प्रयोग करणे म्हणजे चंद्राचे नुकसान करण्यासारखे होते. तर, काहींनी चंद्रावरील वातावरणावर याचा प्रभाव पडू शकतो, अशी भीती व्यक्त केली. चंद्रावर यापूर्वी झालेल्या संशोधनातही तिथे कचरा आणि वापरलेल्या वस्तूंचे अवशेष तिथेच सोडण्यात आल्याचे आढळले होते. अशाप्रकारे चंद्रावर मानवी कचरा करणे हानिकारक असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले, त्यामुळे हे असे प्रयोग करू नका, असे आवाहनही सगळ्या देशांना करण्यात आले होते. मात्र, हा प्रयोग पुन्हा करण्यात आला आणि पुन्हा एकदा या वादाला तोंड फुटले आहे. चीनचे मुख्य प्राध्यापक लियू हनलॉन्ग यांनी, “हा प्रयोग केवळ जीवांची निर्मिती होऊ शकते का, हे पाहण्याकरिता करण्यात आला,“ असे स्पष्ट केले. त्यामुळे चीनचे हे चंद्रप्रेम २०३० पर्यंत वेगवेगळ्या प्रयोगातून दिसणार एवढे नक्की आणि या अंतराळविश्वात आपल्याला कसे पुढे जाता येईल, याकरिता 'नासा'चे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे चंद्राची या चकोरांकडून सुटका होणे शक्य नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/