कानडी प्राणायाम...

    दिनांक  15-Jan-2019   
 

महाराष्ट्राच्या शेजारी कर्नाटक राज्यात सध्या सत्तेचा कानडी प्राणायाम पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर वाजतगाजत मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या एच. डी. कुमारस्वामी यांना सध्या सरकार शाबूत राखतानाही पळता भुई थोडी झाली आहे. अर्थात, हे सारे आजचे नाही. मे, २०१८ मध्ये कुमारस्वामी यांनी शपथ घेतली तेव्हापासून रोज वेगवेगळ्या प्रकारे हे सरकार संकटात सापडत आहे. सध्या या सत्तानाट्याचा नवा अंक सुरू आहे. कर्नाटकातील दोन अपक्ष आमदारांनी जेडीएस-काँग्रेस सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा केली. त्यातील एकाने विरोधी पक्ष भाजपला पाठिंबा देऊनही टाकला तर दुसराही लवकरच तशी घोषणा करण्याची शक्यता आहे. अचानक या सार्‍या घटना घडल्या आणि त्यामुळे आता सार्‍या देशाचे लक्ष कर्नाटकाने वेधून घेतल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणूक अवघ्या दोन-तीन महिन्यांवर आलेली असताना कर्नाटक विधानसभेत घडलेल्या या घटना योगायोग निश्चितच नाहीत. वास्तविक, या दोघा अपक्षांनी पाठिंबा काढल्यामुळे कुमारस्वामी सरकार धोक्यात येत नाही. काँग्रेसकडे ८० आणि जेडीएसकडे ३७ जागा आहेत. त्यामुळे २२५ आमदारांच्या कर्नाटक विधानसभेत बहुमताचा आकडा या आघाडीपाशी आहे. शिवाय, विधानसभेची पुढील निवडणूकही इतक्यात होण्याची शक्यता नाही, त्यासाठी अजून चार वर्षे तरी जातील. मग तरीही अपक्षांनी पाठिंबा का काढला? हा प्रश्न उरतोच. राज्यात विरोधी पक्ष असलेला भाजप हा संख्याबळाच्या दृष्टीने मात्र सर्वांत मोठा पक्ष असून भाजपकडे १०४ जागा आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजधानी बंगळुरूमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपचे बहुमत थोडक्यात हुकले; अन्यथा कर्नाटकाचा कौल स्पष्टपणे भाजपलाच होता. २००८ मध्ये येडीयुरप्पा मुख्यमंत्री झाले, त्यावेळेस उभे केलेले आणि नंतर पडझड झालेले सर्व बालेकिल्ले भाजपने या निवडणुकीत काबीज केले. अपवाद बंगळुरूचा. बहुमताचा पल्ला गाठण्यासाठी भाजपला आणखी ९ आमदार लागतील आणि ही गोष्ट इतकी सोपी नाही. मात्र, अपक्ष ही कुंपणावरची प्रजात असते. वारे ज्या दिशेला वाहतील, त्या दिशेने ते वाहतात. वारा थांबला की, पुन्हा कुंपणावर येऊन बसतात. शिवाय, वारा कुठे वाहतो आहे, याबाबतचा त्यांचा अंदाजही पक्का असतो. त्यामुळे सत्ताधारी पक्षांची साथ सोडून विरोधी पक्ष म्हणजे भाजपच्या वळचणीला या आमदारांनी का जावे, हा सर्वांत मोठा गहन प्रश्न या सार्‍या कानडी प्राणायामात विचारला जात आहे.

 

बदलत्या वार्‍यांचे संकेत?

 

आता या सार्‍या घडामोडी घडत असताना, तिकडे भाजप काय करतोय? गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या कथित ‘ऑपरेशन लोटस’ची खमंग चर्चा राज्यभरात आहे. कुमारस्वामी सरकार पाडायचेच, असा निश्चय म्हणे भाजपने केला असून दुसरीकडे स्वतः कुमारस्वामी मात्र बहुमताबद्दल निश्चिंत आहेत. भाजपने आमचे आमदार फोडणे राहिले बाजूला, आम्हीच त्यांचे आमदार फोडू, हा कुमारस्वामी यांचा आत्मविश्वास. तसा आत्मविश्वास त्यांनी गेल्या सहा-सात महिन्यांत अनेकदा दाखवला आहे परंतु, त्यानंतर लगेचच जाहीर व्यासपीठावरून रडारड करावी लागण्याचीही वेळ त्यांच्यावर आली, हे देशाने पाहिले आहे. या रडारडीचे कारण भाजप नव्हता. काँग्रेसने भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून लांब ठेवायचे म्हणून कुमारस्वामींना पाठिंबा देऊन टाकला. परंतु, या आघाडी सरकारमध्ये सारे काही आलबेल नाही. या आघाडीबद्दल जेडीएस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांत नाराजी असून कित्येक आमदारांना मंत्रिपदे न मिळाल्याने ते नाराज आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरामैय्या यांना अडगळीत टाकल्यामुळे तो गट नाराज आहे तर विद्यमान मंत्री आणि काँग्रेसचे महत्त्वाचे नेते शिवकुमार यांच्या महत्त्वाकांक्षाही मध्येच उचल खात आहेत. काँग्रेस आम्हाला नीट काम करू देत नाही, असा आरोप गेल्या सहा-सात महिन्यांत कुमारस्वामी व देवेगौडा या पितापुत्रांनी सतराशे साठ वेळा करून झाला आहे. जेडीएस पक्षाचे म्हणून स्वतंत्र असे काही प्रश्न आहेत. हा पक्षच मुळात ‘देवेगौडा अ‍ॅण्ड फॅमिली’ अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळे गृहकलहाचे खटके इथेही उडाले आहेत. कुमारस्वामींचे ज्येष्ठ बंधू एच. डी. रेवण्णा आणि त्यांचे पुत्र प्रज्वल रेवण्णा पक्ष ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा नेहमीच असते. पुन्हा या एकूणच कानडी प्राणायामाला उत्तर वि. दक्षिण कर्नाटक, लिंगायत वि. वोक्कलिंग वि. अन्य जाती वगैरे असंख्य कंगोरे आहेत. ‘ऑपरेशन लोटस’बाबत पहिल्यांदा बोलले ते हे काँग्रेसचे मंत्री शिवकुमारच. काँग्रेसचे तीन आमदार भाजपने मुंबईत नेले, असा आरोप त्यांनी केला. आता पाठिंबा काढून घेणारे मात्र अपक्ष आमदार आहेत. तेव्हा ते काँग्रेसचे आमदार सध्या काय करत आहेत? हाही प्रश्न उरतोच. त्यामुळे पुढचा आठवडा या राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार, हे निश्चित. सध्या अमुक एवढे आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे सांगून वातावरण तापते ठेवण्याची स्पर्धा येथे लागली असली, तरी हे सर्व वारे उलट्या दिशेने जाऊ लागल्याचे संकेत मानायला नक्कीच हरकत नसावी.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/