पशुपक्ष्यांच्या भावना समजतात यांना...भूमी जीवदया संवर्धन संस्था

15 Jan 2019 21:35:52


बरेचसे सुटका करून वाचवलेले घायाळ जीव यांच्याच सुरक्षित हाती सोपवले जातात आणि हे जखमी जीव बरे होईपर्यंत भूमी जीवदया संवर्धन संस्थेतला प्रत्येक घटक पोटच्या पोरासारखी या मुक्या जीवांची काळजी घेतो. त्यांच्या शारीरिक जखमांचा उपचार करता-करताच या जखमी पशुपक्ष्यांच्या भेदरलेल्या अस्तित्वाला पुन्हा स्वच्छंदी रूप द्यायचे काम करते ती तुर्भे येथील संस्था भूमी जीवदया संवर्धन

 
 

आजकाल मेवा तिथे सेवाहे ब्रीद घेऊन समाजसेवकाचा मुखवटा लावलेल्या कितीतरी संस्था आणि व्यक्ती पैशाला पासरी आहेत. उद्देश एकतर लोकसहभागातून कोणती ना कोणती विचारधारा लोकांच्या मनावर लादण्यासाठी तसेच या माध्यमातून सर्व प्रकारचे दान उकळणे असाच काहीसा असतो, पण मग भूमी जीवदया संवर्धन संस्थेच्या या पशुपक्षी प्रेमाचा, सेवेचा उद्देश काय? यावर भूमी जीवदया संवर्धन संस्थेचे ट्रस्टी सागर सालवा म्हणाले की, “माणसाचं काय हो? विनोद झाला तर त्यांना हसता येतं, दुखलं तर रडून सांगता येतं पण, प्राण्यांनी आणि पक्ष्यांनी काय करावं? कोणाशी बोलावं? तुम्ही ऐकलंय त्यांचं बोलणं ! नाही ना ! पण प्राणी बोलतात...पण त्यांचं निःशब्द बोलणं ऐकण्यासाठी मनाची भाषा कळावी लागते आणि त्याहून आधी त्यांना समजून घ्यावं लागतं. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन एक करुणेची, दयेची संवेदना आहे.

त्या संवेदनेचा उद्देश घेऊन भूमी जीवदया संवर्धन संस्था काम करते. तसं पाहिलं तर सागर यांना प्राण्यांची अगदी लहानपणापासून आवड आणि राहायला ते मुलुंडला. मग त्या वेळी म्हणजे दहा वर्षांपूर्वी रेस्क्यू माध्यमातून त्यांनी त्यांच्या या कार्याची सुरुवात मुलुंडमधील ‘बेन्नास’ या संस्थेसोबत सुरू केली. त्यानंतर गोवंडीमधील ‘आय.डी.ए.’ या संस्थेमध्ये त्यांनी दोन वर्ष सेवा केली आणि या वेळात प्राण्यांविषयीचं दाट प्रेम अगदी त्यांच्या रक्तात भिनायला सुरुवात झाली आणि त्यांचं हे प्रेम अमर करायची संधी त्यांचे गुरू राघवजी पटेल यांनी २०१४ साली मिळवून दिली. नक्की काय घडलं २०१४ साली? हा प्रश्न पडला असेल ना. दि. २७ जुलै, २०१४ या दिवशी भूमी जीवदया संवर्धन संस्थेची निर्मिती झाली. हे स्वप्न म्हणजे राघवजी आणि सागर या दोघांची इच्छापूर्ती. त्यांनी मोठ्या अभिमानाने सांगितलं, “आजपासून पाच वर्ष आधी ऐरोली ते पनवेल या नवी मुंबई भागात जीवदया ही एकमेव संस्था पक्षी या विषयांवर कार्यरत होती, आणि तेव्हाची परिस्थिती फार वेगळी होती, कारण आतासारखे तेव्हा जास्त विकल्प नव्हते आणि लोकांमध्ये माहितीही नव्हती. आता लोकांमध्ये प्राणी-पक्ष्यांबद्दल बरीच जनजागृती निर्माण झाली आहे आणि खूप असे विकल्पदेखील आहेत. त्यात सोशल मीडियाचा वाटा फार मोठा आहे.”

 

 
 

त्यांच्याकडून मिळालेली माहिती खूपच आनंददायी होती. ते म्हणाले, “संस्थेचा मूळ उद्देश प्राणीमात्रांचे रक्षण कार्य, पण मला लोकांची मानसिकता बदलायची आहे, कारण अजूनही माणसं प्राण्यांना किंवा पक्ष्यांना, माणसांच्या नजरेने मुळात बघतच नाहीत, त्यांच्या वेदना समजून घ्यायचा प्रयत्न करत नाहीत. ज्या दिवशी प्रत्येकाचा यांच्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलेल, त्या दिवशी चित्रच काही वेगळं असेल. मग बर्‍याच सार्‍या माध्यमांतून आम्ही लोकांमध्ये जनजागृती करायचा प्रयत्न करतो.” 

हे सर्व उपक्रम पाहिले की वाटते, पशुपक्ष्यांच्या सेवेचा सर्वतोपरी विचार करून संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या कार्यालयाची धारणाशक्ती ही पाचशे पक्ष्यांची असून, संस्थेत चाळीस कुत्रे राहू शकतात. सध्या इथे दीडशे पक्षी असून पंचवीस कुत्र्यांवर उपचार चालू आहेत. दिवसातून सरासरी आठ फोन प्राण्यांच्या बचावासाठी यांच्याकडे येतातमग मी कुतूहलाने विचारलं, जर मोठ्या प्राण्यांसाठी म्हणजेच एखाद्या जखमी गायीसाठी फोन आला तर तुम्ही त्यांना कुठे ठेवता? यावर त्यांनी सांगितले, “मोठ्या घायाळ प्राण्यांना म्हणजेच गाय, गाढवं,घोडा यांना ते कर्नाळा येथील ‘हॅन्ड्स दॅट हिल’ या संस्थेत दाखल करून त्यांच्यावर उपचार तिथेच केले जातात.”

 

मला इथे आवर्जून नमूद करायला आवडेल की, त्यांनी सांगितलं, “तरुण पिढीमध्ये प्राण्यांविषयी विशेष प्रेम पाहावयास मिळते आहे, कारण त्यांच्याकडे असे बरेच भटके कुत्रे काही तरुणांनी दाखल केलेत, ज्यांच्यासाठी काही तरुणांनी आधीच खाजगी उपचारात २५ हजार निःस्वार्थी भावनेने खर्च केलेत आणि याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे या फोटोत दिसणारा रस्त्यावरचा कुत्रा, ज्याच्या घशाचे हाड वाढले असल्याने त्याला जेवणाचा त्रास होत होता. तो कमी करण्यासाठी आणि त्याला जेवण जावे म्हणून खास एक टेबल संदीप वेलकर या नालासोपारा इथे राहणार्‍या तरुणाने बनवून घेतलाआणि शेवटी त्याला इथे दाखल केले. डॉक्टरांच्या प्रयत्नाने तो आता एकदम बरा झालाही संस्था पूर्णतः खाजगी संस्था असून इथे एक डॉक्टर कार्यरत असतात (डॉ. महेश). तसेच आणीबाणी उपचारासाठी बाहेरून डॉक्टर मागवावे लागतात. जागा भाड्याची आहे आणि शिवाय अ‍ॅम्ब्युलन्सचा खर्च संस्थेला येणार्‍या देणगी माध्यमातून भागवला जातो. विशेष म्हणजे आजपर्यंत त्यांनी कोणत्याही व्यापारी संस्था किंवा राजकीय पक्षाकडून मदत घेतलेली नाही.

 

सागर बोलले ते अगदीच थक्क करून टाकणारे होते. “अहो दादा, मी स्वतः दहावी पास. मी काय सांगू? हो, पण मला हे सांगताना अजिबात लाज वाटत नाही. कारण मला अभ्यासात आवड नव्हती, पण प्राण्यांची आवड ही चांगली जोपासतोय. पुस्तकं सगळंच काही शिकवत नाही.काही गोष्टी आपले संस्कृती, संस्कार शिकवतात आणि यातली महत्त्वाची शिकवण म्हणजे प्राणीमात्रांवर दया. इतकंच सांगेन, जगा आणि जगू दया...मग हे जग सुंदर आहेच. आपल्या मुलांना प्राण्यांविषयी विशेष लळा लहानपणापासून लावा. मी म्हणत नाही इथेच पण कोणत्याही संस्थेत जाऊन तिथल्या प्राण्यांना खाऊ घाला. बघा, किती बरं वाटेल.जास्त नाही हो, याला दोन ते तीन हजार खर्च येईल पण त्या मुक्या जिवांना थोडं का होईना, तुम्हांला समजून घेता येईल.”


 
 

व्वा...अगदी माफक शब्दांत खूप काही समजावलं त्यांनी...जे खरंच आदर्श घेण्यासारखं आहे. त्याच्याशी हे बोलणं झाल्यावर माझ्या मनात आलं, खरंच मानसिकता बदलण्याची गरज आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे लोक सामाजिक उपक्रम करू लागलेत खरे...पण ते योग्य ठिकाणी करतायत का? कारण आज मुंबईसारख्या अगदी गजबजलेल्या शहरात बरीच मंडळी वाढदिवस किंवा इतर कार्यक्रम एखाद्या अनाथाश्रमात किंवा वृद्धाश्रमात करतात. माझा विरोध या कार्यक्रमांना नाही, माझा विरोध आहे तो बिघडणार्‍या समतोलाला...अशा काही संस्था गजबजलेल्या शहरात अगदी हाकेच्या अंतरावर असल्यामुळे त्यांच्याकडे हवे आहे, त्याहून जास्त निधी देणगीरूपात येत आहे आणि दुसरीकडे ज्यांना याची खरी गरज आहे, तिथे पुरेशी मदत पोहोचतच नाही. यावर आपल्याला विचार करायला हवा. शेवटी मग मी विचारलं, “हे सगळं केल्यावर तुम्हाला वैयक्तिक नक्की काय फील होतं?” क्षणाचाही विलंब न करता सागर यांनी उत्तर दिलं, “मानसिक समाधान...एक वेगळंच सुख.” यावर लगेच मी म्हणालो... “In sort happywali feeling...Right!...” यावर त्यांचं उत्तर होतं, “हो, खूप जास्त happywali feeling...

 - विजय माने 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
 
 
Powered By Sangraha 9.0