जर्मनीलाही हवी ‘मुक्ती’

    दिनांक  14-Jan-2019   
 

राष्ट्रवादाची ही चेतना केवळ ब्रिटन वा अमेरिकाच नव्हे तर फ्रान्स, हंगेरीसह अनेक युरोपीय देशांत निर्माण झाल्याचे गेल्या काही काळातील घटनांवरून दिसते. एरवी उदारतेचा, सर्वसमावेशकतेचा दावा करणार्‍या युरोपीयन देशांवरही स्वतःपुरते पाहण्याची वेळ आणली ती अरब आणि आखाती देशातील मुस्लीम निर्वासितांनी.

 

टन आणि अमेरिकेसारख्या जगातील दोन मोठ्या लोकशाही देशांत सध्या विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसते. ब्रिटनच्या संसदेत ब्रेग्झिटच्या मुद्द्यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झालेली असतानाच अमेरिकेत मेक्सिको सीमेवर भिंत उभारण्यासाठीच्या खर्चावर वार्षिक अंदाजपत्रकावेळी एकमत न झाल्याने शटडाऊनची नामुष्की ओढवली. २२ डिसेंबरपासून सुरू झालेले अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात मोठे शटडाऊन आहे. याआधी १९९५-९६ मध्ये २१ दिवसांपर्यंत शटडाऊन सुरू होते, यंदा तेही पार झाले. या दोन्ही देशांत उद्भवलेल्या स्थितीमागे लोकानुनयी राजकारण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. निवडणूक प्रचारावेळी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठीच हे सुरू असल्याचे ते म्हणतात. पण राजकीय विश्लेषकांचे हे म्हणणे वरवरचे असल्याचे दिसते. कारण ब्रिटन वा अमेरिकेतील विद्यमान सत्ताधीशांवर ही आश्वासने देण्याची स्थिती का आली, याचा विश्लेषक विचार करत नाहीत. आपल्या पूर्वसुरींच्या अनिष्ट कारभारामुळे देशावर आलेले संकट दूर करण्यासाठी या लोकांनी आश्वासने दिली व ते त्याच्याच बळावर निवडून आले. अर्थातच या सगळ्यामागे पार्श्वभूमी होती ती राष्ट्रवादाची.

 

राष्ट्रवादाची ही चेतना केवळ ब्रिटन वा अमेरिकाच नव्हे तर फ्रान्स, हंगेरीसह अनेक युरोपीय देशांत निर्माण झाल्याचे गेल्या काही काळातील घटनांवरून दिसते. एरवी उदारतेचा, सर्वसमावेशकतेचा दावा करणार्‍या युरोपीयन देशांवरही स्वतःपुरते पाहण्याची वेळ आणली ती अरब आणि आखाती देशातील मुस्लीम निर्वासितांनी. दहशतवाद, अंतर्गत बंडाळी, युद्ध, राजकीय महत्त्वाकांक्षा आदी कारणांनी होरपळत असलेल्या मुस्लीम देशांतील हजारो, लाखो लोक आपापले देश सोडून अन्य देशांत आश्रय घेऊ लागले. सुरुवातीला युरोपीयन देशांनी या निर्वासितांचे मोकळेपणाने स्वागतही केले. पण नंतर नंतर त्याची संख्या जसजशी वाढू लागली तसतसे या लोकांचे आव्हान त्या त्या देशांतील सरकार व प्रशासनापुढे उभे ठाकले. कायदे व नियमांच्या चौकटीत राहून कार्य करणार्या या देशांत मुस्लीम निर्वासितांनी रानटीपणे वागायला सुरुवात केली. काहींनी या युरोपीय देशांवर तर कुराण, शरियतमधील गोष्टी थोपण्याचे प्रयत्नही केले. बलात्कार, चाकू हल्ले, गाडीखाली चिरडणे अशाप्रकारे या लोकांनी फ्रान्स, नेदरलॅँड आदी देशांतल्या मूळच्या नागरिकांवरच जरब बसविण्याचा खेळ केला. परिणामी या देशांतून अशा आततायी निर्वासितांना हाकलून देण्याची मागणी जोर धरू लागली. असाच एक देश म्हणजे जर्मनी.

 

नुकतीच जर्मनीतल्या अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) या पक्षाने जर्मनीने युरोपीय संघातून बाहेर (डेक्झिट) पडण्याची मागणी व समर्थन केले. आपल्या मागण्या मान्य केल्या नाही तर आगामी निवडणुकीवेळी युरोपीय संघातून बाहेर पडण्यासाठी विशेष अभियान चालवले जाईल, असेही त्या पक्षाने स्पष्ट केले. जर्मनीतल्या एखाद्या पक्षाने पूर्ण ताकदीनिशी डेक्झिटची मागणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. कदाचित एएफडीची ही डेक्झिटची मागणी मान्य होईल अथवा होणार नाही. पण या सगळ्यामागे निर्वासितांचे अवांच्छित उद्योग हीच कारणे आहेत. २०१३ साली स्थापन झालेला एएफडी हा पक्ष सुरुवातीपासूनच युरोपीय संघाच्या विरोधातच होता; अतिउजवा असाच होता व आहे. पण जसजसे जर्मनीत मुस्लीम निर्वासितांचे जत्थेच्या जत्थे प्रवेश करू लागले, तसतसे एएफडीने स्थानिकांच्या हक्कांसाठी निर्वासितांच्या विरोधात भूमिका घेतली.

 

जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या,‘’निर्वासितांनो तुमचे स्वागत आहे,” या अवसानघातकीपणावर एएफडीने आक्षेप नोंदवला. २०१५ साली तब्बल १.५ दशलक्ष निर्वासित जर्मनीत दाखल झाले होते. त्याचवेळी एएफडीने अवैधरित्या जर्मनीत घुसखोरी केलेल्या निर्वासितांना त्यांच्या त्यांच्या देशात वा अन्यत्र कुठेही रवानगी करण्याची मागणी केली. सोबतच युरोपीय संघ आणि जर्मनीच्या सीमारेषा बंद करण्याचीही गोष्ट केली. एएफडीचेनेते अ‍ॅलीस विडेल यांनी सांगितले की, “आम्ही नकारात्मक स्थलांतराविरोधात आहोत.” विशेष म्हणजे त्यांनी जर्मनीला इस्लामिक देश होण्यापासून वाचविण्याचे मतही धडाडीने मांडले. मुस्लीम निर्वासितांमुळे जर्मनीची मूळची ख्रिश्चन देशाची ओळख पुसली जात असल्याचे ते म्हणाले. एकूणच जर्मनीतील वातावरण सध्या मुस्लीम निर्वासितांमुळे कमालीचे तापल्याचे दिसते. माणुसकीच्या नात्याने आश्रय देऊनही ज्या थाळीत खातो, तिथेच छेद करण्याच्या या निर्वासितांच्या कृत्यांमुळेच ही अशी परिस्थिती उद्भवल्याचे कोणीही सांगू शकेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/