हिंदू हिताय : भाग ५ - हिंदू शासन भारताच्या हिताचे

    दिनांक  14-Jan-2019   


नरेंद्र मोदी यांना पाण्यात पाहणार्‍यांचे हेतू उदात्त आहेत काय? त्यांचे हेतू काहीही करून सत्ता मिळविण्याचे आहेत. त्यांचे हेतू जागृत होणारी हिंदू शक्ती कशी ठेचता येईल याचे आहेत. त्यांचा हेतू हिंदू समाजाला पराक्रमाची शिकवण देणारा नेता, चारित्र्याची शिकवण देणारा नेता उभाच राहता कामा नये, हा आहे.

 

आता नरेंद्र मोदी यांच्या रूपाने एक हिंदू राज्यकर्ता पंतप्रधान झालेला आहे. हिंदूच्या दोन व्याख्या केल्या जातात. पुनरावृत्तीचा दोष स्वीकारून एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत बसावे लागते, वाचकांनी त्याबद्दल क्षमा करावी. हिंदूची पहिली व्याख्या - “जो समग्र मानवजात, प्राणीजात, वनस्पती जीवन, या सर्वांचा समग्र विचार करतो, सगळ्यांच्या कल्याणाची कामना करतो, माझेच म्हणणे खरे, अन्य सर्व चूक असा विचार करीत नाही, त्याला हिंदू म्हणायचे. हिंदू असण्याचा आणि विशिष्ट पूजापद्धती स्वीकारण्याचा ग्रंथप्रामाण्य स्वीकारण्याचा काहीही संबंध नाही. माझे हिंदू असणे, मी कोणत्या देवाची पूजा करतो आणि कोणत्या धर्मग्रंंथाचे पारायण करतो, यावर अवलंबून नाही.”

 

हिंदूची दुसरी व्याख्या इंग्रजी मानसिकतेतून निर्माण झालेली आहे. ही गुलामीची मानसिकता आहे. ही व्याख्या सांगते की, “हिंदू म्हणजे संकुचितता, हिंदू म्हणजे सामाजिक विषमता, हिंदू म्हणजे स्त्रीदास्य, हिंदू म्हणजे सर्व प्रकारची असहिष्णूता, हिंदू म्हणजे जातवाद.” स्वातंत्र्यानंतर या विषयांवर ग्रंथालय भरतील एवढी पुस्तके निर्माण झाली आहेत. त्यातील अनेकांना पुरस्कार मिळालेले आहेत. काही लेखकांचा ‘पद्म’ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. जो बुद्धीवंत आपल्या हाताने आपल्या थोबाडाला शेण लावून घेईल, त्याला पुरस्कार मिळतात, त्याचा सन्मान होतो आणि त्याला विचारवंत हा किताब दिला जातो, याला जबाबदार कोण? याला जबाबदार हिंदू म्हणून आपण सर्वजण आहोत.

 
 
 

नरेंद्र मोदी पहिल्या व्याख्येतील हिंदू राज्यकर्ते आहेत. ते सर्व गुणसंपन्न आहेत, असे तर मी काही म्हणणार नाही. कोणताही माणूस सर्व गुणसंपन्न नसतो. प्रत्येकामध्ये काही ना काही गुणदोष असतातच. मर्यादापुरुषोत्तम रामालादेखील सर्वगुणसंपन्न राम असे म्हणता येत नाही. सीतेच्या त्यागाचे कोणत्याही प्रकारे समर्थन करता येत नाही. असे काही जरी असले तरी स्वातंत्र्यानंतर या देशाला जे हिंदू राज्यकर्ते लाभले, त्यातील नरेंद्र मोदी हे सर्वोत्तम राज्यकर्ते आहेत. ते सर्वोत्तम राज्यकर्ते असल्यामुळे हिंदू तोडू जथ्थ्याचे क्रमांक एकचे शत्रू झालेले आहेत.

 

पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर त्यांचे नाव असणे स्वाभाविक आहे. भारतात हिंदू शक्तीचा उदय होता कामा नये, असे मानणार्‍या विदेशी शक्तींच्या हिटलिस्टवर त्यांचे नाव असणे स्वाभाविकच आहे. जाती-पातीत हिंदू समाजाला तोडण्याचे राजकारण करणार्‍याला राजकीय पक्षांच्या हिटलिस्टवर त्यांचे नाव असणे हेदेखील स्वाभाविक आहे. काँगे्रस संस्कृतीला विकले गेलेल्या तथाकथित बुद्धिमान पत्रपंडितांच्या हिटलिस्टवर नरेंद्र मोदी यांचे नाव राहणे अत्यंत स्वाभाविकच आहे. याचे दुःख करण्याचे कारण नाही. श्रीकृष्ण कितीही चांगला असला तरीही त्याचा द्वेष करणारे शकुनी, दुर्योधन, शिशुपाल, जरासंध समाजात होतेच. हादेखील सृष्टीचा नियमच आहे. जेथे चांगले आहे तेथे वाईट असणारच. जेथे सृजन आहे, तेथे विनाशदेखील असतोच. मधुर गायन करणारे जेथे असतात तेथेच कर्कश स्वरात गाणारेदेखील असतातच. जीवन असेच असते. म्हणून त्याची चिंता शहाण्या माणसाने करू नये, फक्त चिंतन करावे.

 

चिंतनाचा विषय असा असला पाहिजे की, भारतात नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाचा जे पराकोटीचा द्वेष करतात, त्यांचे हेतू कोणते आहेत? हेतूवरून माणसाच्या कर्माचे मूल्य ठरते. अत्यंत चांगल्या हेतूने केलेली वाईट कृतीदेखील नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ असते. कृष्णाने आपल्या सख्ख्या मामाला ठार केले. आजचे पिनल कोड लावले तर हा झाला खून, पण भारतातील कोणीही ते मानत नाही. कंस मारण्याच्याच लायकीचा होता, त्याला मारून कृष्णाने धर्माचे रक्षण केले, असे सर्वजण मानतात. पाहुण्याला जेवायला बोलावून त्याला ठार करणे हेदेखील पातकच आहे, परंतु शिवाजी महाराजांनी अफजल खानाला भेटीला बोलावून त्याचे पोट फाडले, ही आपल्याला आजही अत्यंत आनंदाची गोष्ट वाटते, अफजल खान त्याच लायकीचा होता. कृष्ण आणि शिवाजींचे हेतू उदात्त होते.

नरेंद्र मोदी यांना पाण्यात पाहणार्‍यांचे हेतू उदात्त आहेत काय? त्यांचे हेतू काहीही करून सत्ता मिळविण्याचे आहेत. त्यांचे हेतू जागृत होणारी हिंदू शक्ती कशी ठेचता येईल याचे आहेत. त्यांचा हेतू हिंदू समाजाला पराक्रमाची शिकवण देणारा नेता, चारित्र्याची शिकवण देणारा नेता उभाच राहता कामा नये, हा आहे. त्यांचा हेतू भ्रष्टाचारमुक्त आणि स्वच्छ भारताचे स्वप्न पाहणारा नेता उभा राहताच कामा नये, हा आहे. म्हणून त्यासाठी ते वाट्टेल ते आरोप करीत राहतात. चौकीदार चोर झाला, हा त्यातील एक आरोप आहे. असा आरोप करताना ते विचारही करीत नाहीत की, या चौकीदाराला मुलेबाळे नाहीत, मोहात पडावा असा परिवार नाही. पैशाचा मोह शून्य आहे, हा निर्मोही राज्यकर्ता आहे. म्हणून चिंतनाचा बिंदू नेहमी हेतूंच्या तपासणीचा असला पाहिजे.

 

काँग्रेसचा हेतू कोणता आहे? जनतेच्या कल्याणाचा आहे, देशाला महासत्ता करण्याचा आहे, देशातील दैन्य-दारिद्य्र दूर करण्याचा आहे, सदोदित कुरापती काढणार्‍या पाकिस्तानला धडा शिकविण्याचा आहे, की आणखी कोणता आहे? काँग्रेसचा हेतू एकच आहे, काहीही करून राजपुत्र राहुल गांधी यांना दिल्लीच्या तख्तावर बसविण्याचा आहे. काँग्रेसचे असे प्रामाणिक मत आहे की, दिल्लीच्या सिंहासनावर बसण्याचा मान फक्त आणि फक्त नेहरू-गांधी घराण्याचाच आहे, अन्य कुणी त्यासाठी लायक नाही. मध्यंतरी नरसिंह राव पंतप्रधानपदी आरुढ झाले. काँग्रेसने त्यांना कवडीचीही किंमत दिली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर जो तमाशा गांधी घराण्याने केला, तो हिंदू परंपरांना धुळीला मिळविणारा आहे. अटल बिहारी वाजपेयीदेखील पंतप्रधानपदी बसले. त्यांचे सरकार कसे खेचता येईल, हे कट करण्यातच काँग्रेसचा सगळा वेळ गेला आणि एकदा केवळ एका मताच्या फरकाने त्यांचे सरकार पाडले.

 

आता नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. गेल्या पाच वर्षांत लोकसभेची जी अधिवेशने झाली, ती आपण दूरदर्शनच्या पडद्यावर पाहिली. कोणतेही अधिवेशन सुरळीतपणे पार पडणार नाही, हे काँग्रेसने पाहिले. अधिवेशनाच्या कामकाजाचे दिवस मातीमोल केले. सभागृह बंद पाडले. जनहिताच्या प्रश्नावर कोणतीही चर्चा होऊ दिली नाही. मोदी आणि भाजपच्या बदनामीचा एककलमी कार्यक्रम राहुल गांधी आणि त्यांच्या साथीदारांनी पार पाडला. प्रजासत्ताकात संसदेत कामकाज व्हावे लागते. लोकप्रतिनिधींचे काम कायदे करण्याचे आहे. लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याचे आहे. जनहितांच्या योजना मार्गी लावण्याचे आहे. केवळ 45 खासदार असताना काँग्रेस संसदेच्या कामकाजाची कशी वाट लावते, हे आपण पाहतो. उद्या ही संख्या आपण दुप्पट केली तर काय होईल? याची कल्पनाच केलेली बरी.

 

एक संस्कृत सुभाषित आहे-

यौवनं धनसम्पत्तिः प्रभुत्वविवेकिता।

एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्यम्॥

 

त्याचा अर्थ असा - तारुण्य, श्रीमंती, सत्ता आणि अविचार यापैकी एकही गोष्टसुद्धा अनर्थ करण्यास पुरेशी आहे तर जेथे चारही असतील तेथे अनर्थ घडेल हे काय सांगावयास पाहिजे? हा श्लोक जसा राजपुत्राला लागू होतो तसा पक्षालादेखील लागू होतो. स्वातंत्र्यापूर्वीची काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस आहे आणि आताची काँग्रेस नेहरू-गांधी घराण्याची राजकीय काँग्रेस आहे. या पक्षाला ग्रँड ओल्ड पार्टी म्हणणे सर्वस्वी चूक आहे. या पक्षाचा एकच आणि एकमेव अजेंडा आहे, तो म्हणजे सत्तेवर एक तर नेहरू-गांधी घराण्याचा माणूस पाहिजे, नाही तर कळसूत्री बाहुली पाहिजे. नेहरू-गांधी घराण्याने ऊठ म्हटल्यावर उठणारा आणि बस म्हटल्यावर बसणारा-आज्ञाधारक, मनमोहन सिंग त्यांना चालतो. काँग्रेसचा हा हेतू आपण विसरणे, हे आपल्याला खूप महागात पडणारे ठरेल. नरेंद्र मोदी यांच्याशी लढण्यासाठी राजपुत्र राहुल गांधी यांनी हिंदूपणाचा मुखवटा पांघरलेला आहे. गाढवाने वाघाचे कातडे पांघरल्याने गाढव कधी वाघ होत नाही. याच्या कथा पंचतंत्रातदेखील आहेत आणि इसापनीतीतदेखील आहेत. आपण पंचतंत्रातील एक गोष्ट नीट समजून घ्यायला पाहिजे. एक सिंहीण आपल्या पिल्लांबरोबर कोल्ह्याचे पिल्लूदेखील वाढविते. ते सिंहाच्या छाव्याबरोबर मोठे होऊ लागते.

 

एके दिवशी जंगलात फिरताना समोरून एक मोठा हत्ती येतो. तो पाहिल्याबरोबर सिंहाचे छावे गुरुगुरायला लागतात. त्याच्यावर हल्ल्याची तयारी करतात. कोल्ह्याचे पिल्लू त्यांना म्हणते,“अरे पळा, हा केवढा मोठा प्राणी आहे. त्याच्या पायाखाली आपण चिरडून जाऊ.” पण छावे त्याचे ऐकत नाही. शेवटी कसेबसे सर्वांना घेऊन तो आईकडे येतो आणि तिला सांगतो की, हे माझे भाऊ वेडाचार करायला निघाले होते. सिंहीण हसते आणि कोल्ह्याच्या पिल्लाला म्हणते, “मुला, तू शूर आहेस, विद्यावान आहेस, दिसायलासुद्धा चांगला आहेस, परंतु तू ज्या कुळात जन्मलास त्या कुळात हत्तीची शिकार कुणी करीत नाही. तू कोल्हा आहेस, हे जर माझ्या मुलांना समजले तर ते तुला फाडून खातील, म्हणून तू तुझ्या जातभाईंकडे परत जा.” मंदिरात गेल्यामुळे कुणी हिंदू होत नाही, हिंदूपण त्याच्यात येत नाही, हिंदू आस्था त्याच्यात निर्माण होत नाही, हिंदूहिताची चिंता त्याच्या नसानसात भिनत नाही, म्हणून, ‘काय भुललासी वरलिया रंगा’ अशी अवस्था आपली होऊ नये.

 

(क्रमशः)

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/