‘टी सीरिज’ विरुद्ध प्युडिपाय

    दिनांक  13-Jan-2019   

 

 
 
 
संगीतकार गुलशन कुमार यांनी १९८३ मध्ये स्थापन केलेली टी सीरिज ही गीत-संगीत क्षेत्रातली कंपनी युट्यूबवर जगात क्रमांक एकवर असल्याचा दावा करेल, असा विचार गेल्या काही वर्षांत कुणाच्या मनातही आला नसेल. मात्र, सध्या जे प्रकरण सुरू आहे, ते पाहिल्यास टी सीरिज कंपनीचे युट्युब चॅनल जगातील प्रथम क्रमांकाच युट्यूब चॅनल होण्याच्या स्पर्धेत आहे, हे ऐकून आपल्याला अभिमान वाटेल. पण, इतका सहजासहजी विजय भारतीयांच्या वाट्याला येत नाही, हा आपलाच इतिहास आहे.
 
 
सध्या टी सीरिजच्या युट्यूब चॅनलला तगडे आव्हान प्युडिपाय हा युट्युबर देत आहे. एकेकाळी केवळ धार्मिक आणि हिंदी सिनेमातील गाण्यांच्या कॅसेट्स आणि व्हिडिओ सीडी बनविणारी कंपनी म्हणून टी सीरिजची ओळख होती. गायत्री मंत्र, गणेश पूजा, दुर्गा आरती, भावगीत, भक्तिगीते, भजने अशी लाखो गाणी त्या काळात टी सीरिजच्या ब्रॅण्डखाली विकली गेली. देवावर अतूट विश्वास असल्याने त्यांनी भक्तीसंगीतावर जास्त भर दिला होता. १९९० च्या काळात केवळ ५० रुपयांमध्ये एक कॅसेट आणि नंतरच्या काळात ३५ रुपयांमध्ये एक व्हिडिओे सीडी उपलब्ध करून दिल्याने टी सीरिजच्या यशाच्या आलेख वाढता वाढता वाढे... असा झाल्याने ‘कॅसेटकिंग’ अशी ओळख गुलशन कुमार यांना मिळाली होती पण, १२ ऑगस्ट १९९७ रोजी १६ हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा पुत्र भूषण कुमार यावेळी १९ वर्षांचा होता आणि कंपनीची सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावरच आली. गुलशन कुमार यांची व्यवसायातली धोरणे भूषण कुमार यांनी तंतोतंत पाळली. केवळ चित्रपट आणि इतर गोष्टींवर निर्भर न राहता त्यांनी स्वतः गाण्यांची निर्मिती करण्यावर भर दिला होता. भूषण कुमार यांनीही तो कायम ठेवला. कॅसेट्स, व्हिडिओ सीडीज्च्या जमान्यात जितक्या जोमाने व्यावसायाचा विस्तार झाला तोच वेग फोर जीच्या जमान्यातही कायम आहे. २००६ पासून टी सीरिजने युट्यूब चॅनल सुरू केले. आजतागायत चॅनल्सचे आठ कोटी सबस्क्रायबर्स आहेत. याशिवाय टी सीरिज किड्स, टी सीरिज पोर्तुगीज फेरी टेल्स, टी सीरिज गुजराती, टी सीरिज मराठी, टी सीरिज भक्ती मराठी, टी सीरिज पंजाबी, भोजपुरी आदी युट्यूब चॅनल्सही आहेत.या सर्वांच्या सबस्क्रायबर्सच्या बेरजेचा आकडा हा किमान १० कोटींचा टप्पा पार करेल इतका आहे. मात्र, सध्या जगात एकच चढाओढ सुरू आहे, ती म्हणजे नंबर वन युट्युबर कोण होणार याची.
 
 
 
 
२००६ पासून टी सीरिजच्या युट्यूब सबस्क्रायबर्सची संख्या इतकी वाढली की, जगातील क्रमांक एकच्या युट्यूबरला दणका बसला. त्याचे नाव प्युडिपाय. तो अवघ्या २९ वर्षांचा... मात्र, जगभरातील चाहत्यांनी आपल्या चाहत्याला बसलेल्या दणक्याचा वचपा काढण्यास सुरुवात केली. स्वीडनमध्ये राहणाऱ्या प्युडिपायचे सबस्क्रायबर्सही आठ कोटींहून अधिक आहेत. एकेकाळी हॉटडॉग विकणारा हा पोरगा आज लाखो लोकांचा आवडता युट्यूबर आहे. एक व्हिडिओ कॉमेंट्री करणारा हा युवक घरबसल्या मनोरंजनात्मक व्हिडिओज तयार करत अनेकांच्या डोळ्यातला तारा बनला. टी सीरिजच्या युट्यूब चॅनलच्या वाढत्या सबस्क्रायबर्सची चिंता त्याला सतावू लागली आणि टी सीरिज आणि भारताविरुद्ध गरळ ओकण्यास त्याने सुरुवात केली. त्यात भारताच्या लोकसंख्येला, इथल्या टीव्ही कार्यक्रमांना, टी सीरिजच्या कार्यक्रमांना विरोध करणारा रॅप त्याने गायला. यात टी सीरिज कधीच पहिल्या क्रमांकावर येणार नाही, असे तो म्हणत आहे. या अडीच मिनिटांच्या रॅपमध्ये त्याने तिथली संस्कृती दाखवून दिली.
 
 
 
अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन त्याने ही टीका केली. याउलट भूषण कुमार यांनी मात्र, “ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भारतासाठी गर्वाची बाब आहे,” असे म्हटले आहे. एक भारतीय कंपनी जी केवळ त्यांच्या आशयावर काम करत आहे, त्या युट्यूब चॅनलमुळे जगविख्यात एका युट्यूबरला घाम सुटावा हे भारतासाठी आणि माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. प्युडीपायने त्याच्या व्हिडिओतून भारताला लक्ष्य केल्यानंतर आणि क्रमांक एकचे स्थान तो गमावणार हे कळल्यावर त्याच्या चाहत्यांनी त्याच्या समर्थनासाठी टाईम स्वेअरमध्ये फलकबाजीही केली. एका हॅकरने अमेरिकेतील ५० हजार प्रिंटर हॅक करत प्युडिपायच्या समर्थनासाठी आवाहन केले आहे. या चुरशीच्या लढतीत कोणाचा विजय होणार, याची उत्सुकता जगाला आहे.
 
 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/