ओळख नाशिक वन्यजीव विभागाची

    दिनांक  12-Jan-2019   

 


 
 
 
 
नाशिक वन्यजीव विभाग हा दि. १२ नोव्हेंबर १९९३ रोजी कार्यान्वित झाला. आजमितीस या वन्यजीव विभागांतर्गत नाशिक जिल्ह्यातील नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य, अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई हरिशचंद्रगड अभयारण्य, जळगाव जिल्ह्यातील यावल वन्यजीव अभयारण्य आणि धुळे जिल्ह्यातील अनेरडॅम वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गरज असते, ती कालबद्ध नियोजनाची. याच दृष्टीने नाशिक वन्यजीव विभागामार्फत आगामी वर्षासाठी हे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक वन्यजीव विभागात समाविष्ट विविध अभयारण्यात येत्या वर्षात अनेकविध नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आले असल्याची माहिती नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली.

 

वनसंपदेने समृद्ध असलेल्या नाशिक वन्यजीव विभागामध्ये प्रामुख्याने वाघ, बिबळा, गवा, सांबर, भेकर, रानडुक्कर, तरस, कोल्हा, लांडगा, साळींदर, रानमांजर, उदमांजर यांसारख्या वन्यजीवांचा अधिवास आढळतो. नाशिक जिल्ह्याची वेगळी ओळख असलेले आणि प्रख्यात पक्षीनिरीक्षक सलीम अली यांनीदेखील पक्षीनिरीक्षण केलेल्या ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात प्रामुख्याने २६५ विविध जातींचे स्थलांतरित आणि स्थानिक पक्षी आढळतात. यात रोहित, क्रेन, गुलाबी मैना, चमचा, वारकरी, उघड्या चोचीचा करकोचा, राखी, बगळा, गडवाल, युरेशियान, वेडा राघू, बुलबुल, दयाळ, नीलकंड मार्श हेरिअर यांसारख्या पक्ष्यांचा प्रामुख्याने समावेश करावा लागेल. उपलब्ध सोईसुविधा आणि त्यासंबंधीचा करण्यात आलेला प्रसार-प्रचार यामुळे २०१७-१८ या वर्षात नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात २८ हजार, २४४ पर्यावरणप्रेमी पर्यटकांनी भेट दिली आहे. त्याच माध्यमातून वनखात्यास तब्बल १२ लाख, ४१ हजार, ४६० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तसेच कळसूबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात ४७ हजार, ३२६ पर्यटकांनी भेट दिली आणि त्यापासून २६ लाख, ५३ हजार, ६५५ रुपयांचा महसूल वनखात्यास प्राप्त झाला आहे. या प्रतिसादामुळे वन्यजीव विभागामार्फत सन २०१८-१९ मध्ये येथे प्रामुख्याने अनेक कामे हाती घेण्यात आली.

 

वन आणि आग हे समीकरण तसे आदिम काळापासून चालत आलेले. या आगीची धग जशी वन्यजीवांना बसते तशीच ती मनुष्यालादेखील अनुभवावी लागते. त्यामुळे या वन्यजीव अभयारण्याचे आगीपासून संरक्षण करण्याकरिता अभयारण्य क्षेत्रात जाळरेषा घेण्यात येणार आहे. तसेच अग्निशमन दल स्थापन करणे, स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण ठेवणे, आगींच्या दुष्परिणामांबाबत स्थानिकांमध्ये जनजागृती करणे, यांसारखे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. या माध्यमातून २०१८-१९ या हंगामामध्ये आगींचे प्रमाण कमी करून ५० टक्क्यांवर आणण्यासाठी वन्यजीव विभाग प्रयत्नशील राहील, असे अंजनकर यांनी सांगितले. वन्यजीव अधिवास विकासासाठी पाणवठे निर्माण करणे, अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक पाणवठ्यांची साफसफाई, अनावश्यक वनस्पतींचे निर्मूलन, गवत-कुरणांचा विकास, जल व मृदसंरक्षणाची कामेदेखील पर्यावरण संतुलनकामी घेण्यात आली आहेत. पर्यटनवृद्धीसाठी पर्यटनाच्या सोयी निर्माण करणे, निसर्ग निर्वाचन केंद्राचे बळकटीकरण, माहिती फलक उभारणे, (दर्शनीय स्थळांवर), पर्यटकांसाठी निवासाच्या सोयी निर्माण करणे, माहितीपत्रके तयार करणे, पक्षी-प्राणी निरीक्षणासाठी दुर्बीण / स्पॉटिंगस्कोप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 

वनसंवर्धनासाठी विभागामार्फत वन व पर्यावरणविषयक दिवस साजरे करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यात मुख्यत्वे पर्यावरण दिवस, वन्यजीव सप्ताह, वनदिन, पाणस्थळ दिवस यांचा समावेश असणार आहे. याशिवाय माहितीपत्रके, घडीपत्रिका, ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे, कर्मचाऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या सहली नियोजन करणे, महाराष्ट्र हरितसेनेची नोंदणी करणे व स्वयंसेवकांमार्फत हरित महाराष्ट्र चळवळीसाठी व वन्यजीव संवर्धनासाठी सहभाग घेणे, यांसारख्या कार्यक्रमांचा समवेश असेल. चार अभयारण्याच्या सीमेपासून २ किमी. पर्यंतच्या गावांमध्ये ‘डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना’ राबविण्यात येत आहे. त्यात आतापर्यंत यावल अभयारण्यात ८ गावे, अनेरडॅम अभयारण्यात ४ गावे, नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात १ गाव व कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात ७ इतक्या गावांमध्ये योजना राबविण्यातदेखील आल्या आहेत. या योजनेमधील गावामध्ये वन्यजीव संरक्षण व संवर्धन संसाधनांचा विकास, मानव - वन्यजीव संघर्ष कमी करणे, पर्यायी रोजगारसंधी वाढविणे, स्वच्छता अभियान राबविणे, पशुसंसाधनांचा विकास करणे, जल संसाधनाचा विकास करणे, कृषी संसाधनांचा विकास करणे, इत्यादी कामांसाठी पाच वर्षांसाठी दरवर्षी २५ लाख रुपये निधींचे वाटप करण्यात येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याची सुधारित सीमा निश्चित करून तसेच जागतिक स्तरावरील पाणस्थळ जागा रामसारस्थळ म्हणून घोषित करण्यासाठी २०१९ मध्ये वन्यजीव विभाग प्रयत्नशील असेल.

 

वन्यजीव विभाग नेमके काय करणार याची ओळख आपणा सर्वांना असणे, आजच्या आधुनिक जगात अतिशय आवश्यक आहे. कारण काही मोजके पर्यावरणप्रेमी सोडले तर, शासनाचा हा विभाग फारसा कोणी चर्चेत घेत नाही. नागरी वस्ती ज्याचे कार्यक्षेत्र नाही, असा हा विभाग पर्यावरणीय व्यवस्थेचा समतोल ढासळू नये यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. अबोल निसर्गाच्या आणि वन्यजीवांच्या भावना समजून घेऊन त्यांना समृद्ध करणे हे तणावपूर्ण काम हा विभाग आपल्याला निसर्गाच्या सान्निध्यात तणावमुक्त करण्यासाठी जोमाने करत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/