ध्वज विजयाचा उंच धरा रे..!

    दिनांक  11-Jan-2019   
 
 

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियन भूमीतील पहिल्यावहिल्या कसोटी मालिकाविजयाचा चषक उंचावला आणि क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद केली जावी, अशी कामगिरी करून दाखवली. ऑस्ट्रेलियासारख्या क्रिकेटमधील महासत्तेला पारंपरिक कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवणे, ही बाब अभिमानास्पदच, परंतु आणखी एका कारणामुळे हा विजय महत्त्वाचा ठरतो. ते म्हणजे अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला एकदिवसीय विश्वचषक. विश्वचषकाच्या तोंडावर असताना या यशामुळे विराटसेनेचा आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत होणार, हे निश्चित.

 

क्रिकेट हासाहेबांचा खेळ’ ब्रिटिश सत्तेच्या काळात भारतात अवतरला. देशातील ठराविक भागांत तो रुजला. पुढे भारताने एकेक महान खेळाडू दिले, मोठमोठे मालिकाविजय नोंदवले आणि हा खेळ देशव्यापी होत गेला. 1983 मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक पहिल्यांदा जिंकला आणि क्रिकेटची लोकप्रियता शिगेला पोहोचली ती कायमचीच. पुढे तर क्रिकेट हा भारतीय भावविश्वाचा महत्त्वाचा घटक बनला. जागतिकीकरणानंतर भारतीय क्रिकेट, क्रिकेटपटू, विविध उत्पादने, त्यांच्या जाहिराती आणि भारतीय बाजारपेठ असे एक नवे समीकरण जन्माला आले आणि भारत क्रिकेटमधील आर्थिक महासत्ता बनत गेला. आयपीएल हे त्याचेच एक अपत्य. अशी ही क्रिकेट महासत्ता असलेला भारतीय क्रिकेट संघ प्रत्यक्ष मैदानावरही या काळात एकामागोमाग एक चमकदार कामगिरी नोंदवत होता. अजित वाडेकरांनी इंग्लंड, वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकून दिल्या. कपिल देवांच्या नेतृत्वात 1983 चा विश्वचषक भारताने जिंकला. सुनील गावस्करांपासून ते सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंह धोनी आदी असंख्य अव्वल क्रिकेटपटू व कर्णधार भारताने जगाला दिले. टी-20 या नव्या क्रिकेटमधील पहिला विश्वचषक, पाठोपाठ २०११ मधील एकदिवसीय विश्वचषकही भारताने पुन्हा एकदा जिंकला. भारतावर दीडशे वर्ष राज्य करून भारतात क्रिकेटचे वेड मागे ठेऊन जाणार्या ब्रिटिशांनाही मिळवता आले नाही, एवढे यश भारताने मिळवले.

 

हे सर्व होत असतानाही, एक प्रतिमा मात्र भारताला पुसता आली नव्हती. ती म्हणजे ‘मायदेशात वाघ आणि परदेशात शेळी’ असण्याची! आमचे फलंदाज भारतीय खेळपट्ट्यांवर धावांचे डोंगर उभारत परंतु, विदेशात उसळत्या चेंडूंचा सामना करताना मात्र ते नांगी टाकत. त्यामुळे एखाद दुसर्‍या मालिकेचा अपवाद वगळता इंग्लंडमध्ये कसोटी मालिकाविजय भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक ठरला. भारताला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांत कसोटी मालिका एकदाही जिंकता आली नाही. इतकंच कशाला, २०११ मध्ये भारत विश्वविजेता झाला परंतु, पुढे लगेचच ऑस्ट्रेलियात आणि इंग्लंडमध्ये प्रत्येकी ४-० ने व्हाईटवॉश घेत मानहानीकारक पराभव भारताने स्वीकारले होते. थोडक्यात, ही प्रतिमा भारताला काही बदलता आली नाही. अर्थात, दुसरीकडे गेल्या दहा-पंधरा वर्षांत कसोटीसह इतर क्रिकेट प्रकारांत केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारत जागतिक क्रमवारीत अगदी पहिल्या नाही परंतु पहिल्या तीन स्थानांमध्ये कायम राहिला. मायदेशात आलेल्या बहुतेक सर्व पाहुण्यांना मोठ्या फरकाने भारताने पराभूत केले. धोनी आणि आता कोहलीच्या नेतृत्वाखाली नव्या दमाची ‘टीम इंडिया’ उभी राहिली. या ‘टीम इंडिया’च्या यशाचा परमोच्च बिंदू म्हणजे ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकाविजय.

 

म्हणूनच, विश्वचषक तोंडावर आलेला असताना भारताची आजवरची प्रतिमा पुसण्यास मदत करणारा हा मालिकाविजय महत्त्वाचा ठरतो. सध्या जागतिक क्रिकेटवर नजर टाकली तर भारताचे पारडे जड आहे. ऑस्ट्रेलियाचा जुना दरारा आता राहिलेला नाही, त्यांचा संघही खिळखिळा झाला आहे. बाकी अनेक संघ जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे सूत्रे सोपवत असतानाच्या स्थित्यंतराच्या काळात आहेत. अशात भारतासाठी ही सुवर्णसंधी आहे. आज भारत कसोटी क्रमवारीत पहिल्या तर एकदिवसीय, टी-२० मध्ये दुसर्‍या स्थानावर आहे. विराट कोहली फलंदाजीच्या कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही क्रमवारीत अग्रस्थानावर आहे. भारतीय संघातील इतर अनेक खेळाडू ‘टॉप-१०’मध्ये विराजमान आहेत. त्यामुळे या परिस्थितीत उत्कृष्ट अशी सांघिक कामगिरी दाखवल्यास भारत या विश्वचषकावर आपले नाव कोरू शकतो. त्यामुळे कांगारूंवरील विजयातून स्फूर्ती घेऊन विराटसेनेने हाच विजयी तिरंगा लॉर्ड्सवरही झळकवावा, हीच तमाम भारतीय क्रिकेटरसिकांची मनीषा असणार आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/