अ‍ॅसिड पीडितांची ‘रिया’ ताई

    दिनांक  11-Jan-2019   


आपलं ऐशोआरामाचं आयुष्य सोडून अ‍ॅसिड हल्ल्यातील मुलींना सक्षम करण्यासाठी भारतातील पहिले पुनर्वसन केंद्र उभारणारी रिया शर्मा

 

महिलांसाठी हा समाज सुरक्षित नाही, किंवा महिलांनीच आपल्या चौकटीत राहिलं पाहिजे, असं म्हणत त्यांच्यावर बंधने घातली जातात आणि हे फक्त भारतात होतं असं नाही, संपूर्ण जगात हीच परिस्थिती आहे, फक्त फरक एवढाच की, या ठिकठिकाणच्या समाजाचे नियम वेगळे असतात. पण महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा त्या राहत असलेल्या किंवा वावरत असलेल्या चार भिंतीतही असतोच की. मग अशाच काहीशा परिस्थितीत याच असुरक्षित महिलांच्या सुरक्षेसाठी उभी राहतात ती पुनर्वसन केंद्रे (रिहॅब सेंटर). मात्र, या पुनर्वसन केंद्रात कितीतरी महिला जाण्यासाठी बिचकतात, कारण या केंद्राबद्दल त्यांच्या मनात एक भीती असते आणि त्या सगळ्यात बलात्कार पीडित आणि अ‍ॅसिड पीडित महिलांचा जास्त समावेश असतो, अशा या पीडितांसाठी त्यांचे केवळ पुनर्वसन न करता त्यांना शिक्षण आणि स्वबळावर काहीतरी करण्याची उमेद देतेय ती रिया शर्मा.

 

व्यवसायाने फॅशन डिझायनर. हे शिक्षण घेत असताना रिया अनेक पीडितांना भेटली. कारण रियाने तिच्या शैक्षणिक संशोधनासाठी ‘मेक लव्ह, नॉट स्कार्स’ म्हणजे ‘प्रेम द्या, त्रास नको’ हा विषय घेतला होता. या निमित्ताने रिया देशभरातील विविध पीडितांना भेटली आणि तिला अनेक धक्कादायक गोष्टी नव्याने समजल्या. रियाच्या मते, “संशोधनाच्या काळातील माझा प्रवास हा मला शिकवणारा आणि थक्क करणारा होता. मी ज्यावेळी या मुलींना भेटायचे, त्यावेळी रक्तबंबाळ झालेल्या या मुली आपलं तोंड लपवून जोरजोरात रडत असत. मला प्रश्न पडायचा या तोंड का लपवत आहेत, यांची काय चूक?”

 

मुळात अ‍ॅसिड हल्ला हा गंभीर गुन्हा असला तरी, भारतात वर्षागणिक सुमारे ३००-४०० अ‍ॅसिड हल्ले सर्रास होतात. हे हल्ले एकतर प्रेमभंगातून किंवा वैमनस्यातून होतात. त्यामुळे याविषयी सखोल अभ्यास करण्यासाठी रियाने आपले या विषयातील संशोधन सुरूच ठेवले. दरम्यान, तिने केलेल्या या संशोधनात तिला अनेक धक्कादायक गोष्टी समजल्या. मुलींवर अ‍ॅसिड हल्ले होण्यामागे पहिले कारण असते ते, मुलांची नकार न समजण्याची प्रवृत्ती, यामुळेच जवळजवळ ३० टक्के महिलांवर हल्ले केले जातात आणि इतरवेळी एखाद्या मुलीबद्दल असलेला वैयक्तिक राग. केवळ या दोन कारणांमुळे आज भारतात अनेक मुली या विद्रूपतेच्या छायेत आल्या आहेत. या सगळ्या अनुभवातून रियाने तयार केलेल्या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा सन्मान मिळाला आणि दुसरीकडे रियाला आपल्या आयुष्याचं ध्येय. रियाला ठाऊक होते की, हा प्रवास खडतर असेल. तरीही ती पूर्ण जोमाने या प्रवासात उतरली. रियाच्या मते, ”या प्रवासाबाबतची एक गोष्ट मला सर्वात जास्त आवडते, ती म्हणजे मी शून्यापासून सुरुवात केली. त्यामुळे अपेक्षांचं ओझं नसलं तरी, ही जबाबदारी मोठी होती, त्यासाठी हत्तीचं बळ लागणार होतं. त्याकरिता स्वत:च्या मानसिक तयारीसाठी मी काही काळ घेतला.” २०१४ पासून रियाच्या या पुनर्वसन प्रवासाला सुरुवात झाली.

 

२०१४ साली आपलं शिक्षण पूर्ण करून ती भारतात आली आणि तिने ‘मेक लव्ह, नॉट स्कार्स’ याच नावाने अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडित तरुणींसाठी एक पुनर्वसन केंद्र उभे केले. मात्र, पहिल्या महिन्यातच तिला समजले की, हा रथ पेलवणे सोपे नाही. मुळात पीडित आहोत म्हणजे आपण विद्रूप आहोत, हा मुलींच्या डोक्यातील भ्रम काढण्यासाठी तिने पीडित मुलींच्या घरी जाऊन त्यांना भेटण्यास सुरुवात केली. केवळ त्यांना मानसिकरित्या सक्षम करण्याबरोबरच रियाने या महिलांना स्वबळावर उभं करण्यास मदत केली. आपल्या पुनर्वसन केंद्रात तिने संगणक प्रशिक्षण, विविध भाषांचे प्रशिक्षण, स्टार्टअपसाठी मदत, विविध लघु उद्योगांचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि आज २०० हून अधिक पीडित तरुणींना रोजगार मिळवून दिला. रियाच्या मते, “या तरुणींना न्याय मिळेपर्यंत त्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असते, त्यामुळे अशा पुनर्वसन केंद्रांचा आधार त्यांना मिळतो. खरंतर अशा पुनर्वसन केंद्रांची गरज आपल्या देशाला आहे, याची मलाच खंत वाटते.” याकरिता समाजमाध्यमांवरही रियाने विशेष काम करण्यास सुरुवात केली. अनेक अभिनेत्री आणि अभिनेते तिच्या या प्रवासात जोडले गेले आणि यातूनच तिने समाजमाध्यमांवर पीडित सुंदरता ही संकल्पना रुजवली. या मुली अ‍ॅसिडपीडित आहेत, म्हणून त्यांच्याकडे बघून अनेक लोक नाकं मुरडतात, त्यांना विद्रूप समजतात, मात्र या मुली मनाने किती सुंदर आहेत, हे कोणी पाहत नाही. याकरिता रियाने पीडित सुंदरता ही मोहीम सुरू केली आणि त्याला सर्व स्तरावर चांगला प्रतिसादही लाभला.

 

आपलं ऐशोआरामाचं आयुष्य सोडून या ‘पीडित सुंदर’ मुलींचं आयुष्य मार्गी लावणार्‍या या त्यांच्या रियाताईला 2016 साली ब्रिटिश कौन्सिलिंगचा पुरस्कार मिळाला. तर, २०१७ साली संयुक्त राष्ट्रांच्या युनिसेफ या संस्थेकडून रियाला गोलकीपर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. असा पुरस्कार मिळवणारी रिया पहिली भारतीय ठरली आहे. याचवर्षी तिला ‘वूमन ऑफ द इयर’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. सध्या रिया युनिसेफच्या मदतीने जगभरातील पीडित मुलींचे आयुष्य सुंदर कसे बनवता येईल आणि असे हल्ले कसे थांबवता येतील, यासंदर्भात संशोधन करत आहे. अशा या रियाताईच्या कामामुळे आज असंख्य सुंदर पीडित महिला सन्मानाने जगत आहेत.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/