हिंदू हिताय : भाग २ - हिंदूंचे घटते संख्याबळ, चिंतेची बाब

    दिनांक  11-Jan-2019   


 


इतिहास आम्हाला ओरडून सांगतो की, हिंदूंनो तुमचे राज्य एक असले पाहिजे, तुमची केंद्रीय सत्ता बळकट असली पाहिजे, छोट्या-छोट्या राज्यात तुम्ही विभाजित राहू नका, ही छोटी राज्ये स्वार्थ भावनेची खाण आहेत. मी मोठा की तू मोठा, असल्या निरर्थक वादाला जन्म देणारी आहेत. या स्थितीत तुम्ही राहाल, तर तुमच्या मानेवर तलवार चालल्याशिवाय आणखी काही होणार नाही.

 


आमचे संख्याबळ इतिहास काळापासून का घटत चालले आहे? या प्रश्नाचे उत्तर जर नीट पाहिजे असेल तर वाचकांनी स्वातंत्र्यवीरांची काही पुस्तके किंवा लेख वाचले पाहिजेत. एवढेच काय पण, ज्यांना सर्वसामान्यपणे हिंदूविरोधक समजले पाहिजे, त्या पूज्य डॉ. बाबासाहेबांनीदेखील अत्यंत परखड शब्दांत घटत्या हिंदू संख्याबळाची मीमांसा केली आहे. ती त्यांच्या ‘पाकिस्तान’ या पुस्तकात किंवा ‘बहिष्कृत भारत’ या अग्रलेखात वाचायला मिळेल. म्हणून त्या कारणांच्या मीमांसेत येथे जात नाही. हिंदूंचे संख्याबळ घटण्याचे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे ज्याला इंग्रजी भाषेत स्टेट म्हणतात किंवा आपल्या देशी भाषेमध्ये राज्य अथवा देश म्हणतात, त्याच्या शक्तीचा आणि संघटनेचा जेवढा विचार करायला पाहिजे, तेवढा विचार आपल्या पूर्वजांकडून झाला नाही. आपला देश सातत्याने लहान-लहान राज्यांत विभागलेला देश राहिला. सर्वांची संस्कृती एक, पूजापद्धतीच्या नियमांत समानता, परंतु राजकीयदृष्ट्या विभाजित. राजकीय विभाजन अतिशय घातक असते, कारण ते पूर्ण देशाला दुर्बळ करते. एका राज्याची सैन्य ठेवण्याची संख्या मर्यादित असते. त्याच्याकडे साधने मर्यादित असतात, त्याचे उत्पन्न मर्यादित असते. त्यामुळे तो संघटित आक्रमकांपुढे टिकत नाही. छोटी-छोटी राज्ये आपापसांत भांडत राहतात, लढाया करतात, राजे एकमेकांचे शत्रू होतात, दुसऱ्या शत्रूला मारण्यासाठी ते तिसऱ्याची मदत घेतात. तिरस्कार, असूया, घृणा इत्यादी दोष राज्यव्यवस्थेचे भाग बनतात. जसा राजा तशी प्रजा. प्रजेतही ते गुण येतात. एकमेकांशी शत्रुत्व करणारे आणि परस्परांचा द्वेष करणारे लोक स्वतः तर दुर्बळ राहतातच, परंतु त्याचवेळी ते आपल्या देशालाही दुर्बळ करतात.

 

भौगोलिकदृष्ट्या भारत एक, सांस्कृतिकदृष्ट्या भारत एक, परंतु राजकीयदृष्ट्या भारत शतखंडित. हा आपला इतिहास आहे. महम्मद बीन कासीमने सिंधवर स्वारी केली. राजा दाहिराने त्याच्याशी लढाई केली. त्याच्या मदतीला ना राजपूत गेले, ना अयोध्यावासी गेले, ना मगधवासी गेले, तो मारला गेला. पुढे गजनीचा मोहम्मद आला. त्याने सोमनाथवर १७ वेळा स्वाऱ्या केल्या. त्याला अडविण्यासाठी ना दक्षिणेतील राज्ये आली, ना मराठे गेले, तो लूट करीत बसला आणि आज आपण त्याच्या कथा इतिहासाच्या पानावर वाचत बसतो. पद्मिनीला अपमानित होऊन जोहार करावा लागला. त्याचा तसाच सूड घेऊ, अल्लाउद्दीनच्या देशात जाऊन त्याच्या देशाचा नायनाट करू, ही भावना आमच्यात निर्माण झाली नाही. त्या पद्मिनीवरील चित्रपट बघायला जायला आम्हाला लाजही वाटत नाही. आपल्याच अपमानाचा चित्रपट मी कशाला बघू? ही भावना आमच्यात निर्माण होत नाही. इतिहास आम्हाला ओरडून सांगतो की, हिंदूंनो तुमचे राज्य एक असले पाहिजे, तुमची केंद्रीय सत्ता बळकट असली पाहिजे, छोट्या-छोट्या राज्यात तुम्ही विभाजित राहू नका, ही छोटी राज्ये स्वार्थ भावनेची खाण आहेत. मी मोठा की तू मोठा, असल्या निरर्थक वादाला जन्म देणारी आहेत. या स्थितीत तुम्ही राहाल, तर तुमच्या मानेवर तलवार चालल्याशिवाय आणखी काही होणार नाही. इतिहासाची ही आर्त हाक तरुण शिवाजीच्या कानावर गेली आणि हा तरुण जागा झाला. मी स्वराज्य निर्माण करीन, मी माझे राज्य निर्माण करीन, सर्व भारत मी एका केंद्रसत्तेच्या ताब्यात आणीन, अशी भव्य महत्त्वाकांक्षा उरात बाळगून शिवाजीराजे कामाला लागले आणि ते छत्रपती शिवाजी झाले. दुर्दैवाने अकाली गेले. परंतु, त्यांनी जागवलेली चेतना लढण्याचा अग्नी धगधगीत ठेवून गेली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अखिल भारतीय ध्येयवाद हळूहळू क्षीण होत गेला आणि पुन्हा हिंदू त्याच्या डबकीय कोषात गेला. छोट्या-छोट्या संस्थानात विभाजित झाला. त्याच्या लहान-लहान रियासती झाल्या. इंग्रजांनी आपल्या तोफांखाली त्यांना नमवित आणले आणि त्यांना आपले गुलाम करून टाकले. इतिहासाने हा आम्हाला दिलेला धडा आहे. परीक्षेसाठी आपण शाळेत धडा गिरवतो. समाजजीवनाच्या परिक्षेत इतिहासाचे धडे विसरतो. आपले शत्रू कोण, आपले मित्र कोण, आपले हितरक्षक कोण, आपले अहित करणारे कोण, याचा विवेकही आपण करीत नाही. इतिहासाचा आम्हाला पहिला धडा असा आहे की, आम्हाला मजबूत केंद्र सरकार पाहिजे आणि हे केंद्र सरकार हिंदू हिताशी कोणतीही तडजोड न करणारे हवे. पुन्हा येथे हिंदू हित म्हणजे काय, हे सांगावे लागेल. हिंदू हित म्हणजे आमच्या सर्वसमावेशक संस्कृतीचे हित, आमच्या निसर्गपूजक संस्कृतीचे हित, आमच्या मूल्यजीवनाचे हित, हिंदू संख्याबळ घटणार नाही, हे पाहणे म्हणजे आमचे हित. आपल्या संविधान सभेत ९ डिसेंबर, १९४६ रोजी पं. नेहरू यांनी उद्देशक ठराव मांडला. तेव्हाची संविधान सभा अखंड भारताची होती. त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून पं. नेहरूंनी घटक राज्यांना स्वायत्तता देण्याचा विचार मांडला. त्याला विरोध करताना बाबासाहेब म्हणाले की, “आज देशाला सर्वाधिक प्रबळ केंद्रीय सत्तेची आवश्यकता आहे. प्रादेशिक स्वायत्तता मला मान्य नाही.” डॉ. बाबासाहेबांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. त्यांनी निर्माण केलेली राज्यघटना देशाला प्रबळ केंद्रीय शासन देते. राज्यांना मर्यादित स्वायत्तता आहे. इतिहासाचा धडा शिवाजी महाराजांप्रमाणे बाबासाहेबांनाही उत्तम समजलेला आहे. राजकीयदृष्ट्या तुम्ही विभाजित राहा आणि नंतर लाथा खात राहा किंवा राजकीयदृष्ट्या तुम्ही केंद्रीभूत राहा, लाथा मारण्याची ताकद तुमच्यात येईल.

 

छोट्या-छोट्या राज्यांत विभक्त राहण्याची स्थिती आणि तिचे तोटे याचे आकलन अमेरिकेतील राजधुरंधरांना अतिशय लवकर झाले. मुळात त्यांचा इतिहास १७७६ पासून सुरू होतो. यावर्षी जेफर्सनचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा प्रकाशित झाला आणि स्वातंत्र्याचे युद्ध सुरू झाले. भारताप्रमाणे विभक्त राज्यात राहण्याचा अमेरिकेचा पूर्वेतिहास नाही. स्वातंत्र्ययुद्ध करताना १३ वसाहती एकत्र आल्या आणि त्यांनी संयुक्त राज्य निर्माण केले, सैन्य उभे केले आणि इंग्रज सैन्याचा पराभव केला. १७८३ साली अमेरिका स्वतंत्र झाली. तेरा राज्ये स्वायत्त राज्ये झाली. ती आपापसात भांडू लागली. एकमेकांच्या हितसंबंधांना बाधा येईल, अशा प्रकारच्या उचापती करू लागली. एका राज्यात तर लोकांनी हत्यारांच्या कोठारावरच हल्ला केला. सैन्याला त्यांच्यावर गोळीबार करावा लागला. सैन्याला पगार न मिळाल्यामुळे एका तुकडीने संसदेवरच हल्ला केला. जीव वाचविण्यासाठी सर्व खासदार पळून गेले. अमेरिकेत असे घडले, हे आज कुणाला सांगितले तर खरे वाटणार नाही. देशाचा विचार करणाऱ्या लोकांच्या मनात चिंता सुरू झाली. अशी स्थिती राहिल्यास यादवी होईल. युरोपातील स्पेन, पोर्तुगाल, इंग्लंड, फ्रान्स या महासत्ता आपल्यावर हल्ला करून पुन्हा गुलाम करतील. यातून वाचायचे असेल तर आम्हाला एक झाले पाहिजे, नेक झाले पाहिजे आणि प्रबळ केंद्रसत्ता आपल्याला उभी केली पाहिजे. त्यासाठी पहिली गोष्ट करावी लागेल, ती म्हणजे आपल्या वसाहतीच्या अस्मितांना गवसणी घालावी लागेल, सर्वांना बांधून ठेवेल असा कायदा करावा लागेल, त्या कायद्याचे आपणहून पालन करावे लागेल, प्राण गेला तरी युरोपातील कोणत्याही महासत्तेशी स्वतंत्रपणे कुणीही काहीही करार करता कामा नये. अगोदर या सर्व गोष्टी समाजाचे नेतृत्त्व करणाऱ्या लोकांनी मान्य केल्या आणि नंतर लोकांनी त्या मान्य केल्या. हा सर्व जो काही घटनाक्रम आहे, त्याला अमेरिकेचा संवैधानिक इतिहास म्हणतात. हा इतिहास ज्यांनी घडविला त्यांची नावे आहेत - जॉर्ज वॉशिंग्टन, बेंजामिन फ्रँकलिन, जेम्स मॅडिसन, अलेक्झांडर हॅमिल्टन. १३ वसाहतीत विभक्त असलेली अमेरिका आज ५० राज्यांचा संघ झालेली आहे. अमेरिकेच्या सामर्थ्याचे वर्णन करून सांगणे म्हणजे वाचकांना काही समजत नाही, असे सांगण्यासारखे आहे. अमेरिकेला हे शहाणपण, अमेरिका नावाचे बाळ जन्माला येत असतानाच, जन्माच्या प्रसववेदना चालू असतानाच आले. आपल्याकडे जन्मतःच ज्ञान घेऊन येणाऱ्या महापुरुषांच्या कथा आहेत. आद्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर, गुलाबराव या नावांचा यात समावेश करावा लागतो. आपल्याला कानाखाली वाजवून इतिहास शतकामागून शतके हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण आपण असे आहोत की, एक वेळ आम्ही तिरडीवर जाऊन झोपू, पण ज्ञान घेणार नाही, असे वागणारे आहोत. यासाठी हिंदू जातीचा अत्यंत गंभीरपणे विचार करणारे तेवढाच गंभीर इशारा देतात की, १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य ही नियतीने हिंदू जातीला आत्मरक्षणासाठी दिलेली शेवटची संधी आहे. या संधीची माती करायची की, सोने हे आपल्याला ठरवायचे आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/