अयोध्याप्रकरणी २९ जानेवारीला सुनावणी

10 Jan 2019 13:36:36

 

 
 
 
 
 
नवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सुनावणी २९ जानेवारीपर्यंत टळली आहे. ५ न्यायाधाशींच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. या ५ न्यायाधीशांपैकी न्या. उदय लळित यांनी या सुनावणी दरम्यान स्वत: ला घटनापीठापासून वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नव्या घटनापीठाचे गठण करावे लागणार आहे. घटनापीठामध्ये ५ न्यायाधीशांचे असणे आवश्यक असते. असे मत देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी व्यक्त केले. आता २९ जानेवारी रोजी नव्या घटनापीठासमोर सुनावणीची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. घटनापीठापुढे सुनावणी सुरु होत असताना मुस्लिम संघटनेचे वकील राजीव धवन यांनी न्या. उदय लळित यांच्या घटनापीठातील उपस्थितीवर आक्षेप नोंदवला.
 

१९९४ मध्ये राममंदिर आंदोलनाशी संबंधित एका प्रकरणी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचे वकीलपत्र न्या. उदय लळित यांनी घेतले होते. त्यामुळे त्यांनी घटनापीठातून वेगळे व्हावे. अशी विनंती धवन यांनी केली होती. दरम्यान, न्या. लळित यांच्या घटनापीठातील उपस्थितीवर हरकत नसल्याचे ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी म्हटले. ज्येष्ठ वकील हरिश साळवे हे राम मंदिराच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणार आहेत. दरम्यान, न्या. लळित यांनी घटनापीठापासून वेगळे व्हावे. यासाठी आपण हा मुद्दा उपस्थित केला नसून माहितीसाठी हा मुद्दा उपस्थित केला असल्याचे धवन यांनी सांगितले. परंतु न्या. लळित यांनी घटनापीठापासून वेगळे होण्याची इच्छा व्यक्त केली. न्या. लळित यांनी ही इच्छा व्यक्त केल्यामुळे आता त्यांनी या सुनावणीमध्ये सहभागी होणे हे उचित ठरणार नाही. असे मत घटनापीठातील अन्य न्यायाधीशांचे आहे. असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले. त्यामुळे पुढील सुनावणी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या प्रकरणी नवीन घटनापीठाचे गठण केले जाणर असून त्यामध्ये न्या. लळित यांच्याजागी नवीन न्यायाधीशांचा समावेश केला जाणार आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
Powered By Sangraha 9.0