जागतिक अर्थव्यवस्थेतील ‘गीता’

    दिनांक  10-Jan-2019   
 

१९९० मध्ये चंद्रशेखर सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारला सोने गहाण ठेवावे लागले होते. ही बातमी वाचून त्यांना धक्का बसला होता, त्यांनी यानंतरच अर्थतज्ज्ञ होण्याचा निर्णय घेतला होता.

 

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) या संस्थेच्या मुख्य अर्थतज्ज्ञपदावर भारतीय वंशाच्या गीता गोपीनाथ यांची नियुक्ती झाली, ही भारतासाठी अभिमानाची बाब आहेच मात्र, तितकीच महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीनेही आहे. २७ डिसेंबर, १९४५ रोजी स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख पदावर रुजू होणार्‍या गीता गोपीनाथ या दुसर्‍या भारतीय जरी असल्या तरीही या मोठ्या पदावर नियुक्त होणार्‍या पहिल्या महिला आहेत. पदभार स्वीकारण्यापूर्वी हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील अभ्यासक आणि अर्थशास्त्र प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत होत्या. गीता गोपीनाथ यांचा जन्म ८ डिसेंबर, १९७१ रोजी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे झाला. तर म्हैसूरमध्ये त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाअंतर्गत येणार्‍या श्रीराम महाविद्यालयात बीएचे आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून एमएचे पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. सूक्ष्म अर्थशास्त्र विषयात प्राविण्य मिळवल्यानंतर गीता यांनी २००१ मध्ये प्रिन्सटन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पीएचडी पूर्ण केली. त्यानंतर २००१ मध्ये त्या शिकागो विद्यापीठात सहायक प्राध्यापकपदावर रूजू झाल्या. २००५ मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र विषय शिकवण्यास सुरुवात केली. २०१० पासून त्यांनी पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून काम पाहणे सुरू केले. भारतीय शिक्षणपद्धतीला दोष देत व्यवस्थेच्या नावाने बोटे मोडणार्‍यांना चपखल उत्तर देईल, असा त्यांचा थक्क करणारा हा प्रेरणादायी प्रवास आहे. माणसाने मनातून दृढनिश्चय केल्यास कोणतेही यशाचे शिखर सर करणे कठीण नसते, याचे योग्य उदाहरण म्हणजे गीता गोपीनाथ यांची शैक्षणिक वाटचाल.

गीता गोपीनाथ यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी अर्थतज्ज्ञ सल्लागारकेनेथ रोगॉफ यांच्यासहइंटरनॅशनल इकॉनॉमिक्स’ हे पुस्तकही लिहिले. जागतिक अर्थशास्त्राविषयीचा त्यांचा अभ्यास आणि अनुभवही तितकाच दांडगा आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय आर्थिक संशोधन केंद्राच्या सहसंचालक, फेडरल रिझर्व्ह ऑफ न्यूयॉर्कच्या आर्थिक सल्लागार मंडळावर सदस्य, फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ बोस्टनच्या अतिथी संशोधक सल्लागार, जी-२० परिषदेसाठी भारताच्या अर्थमंत्रालयाच्या सल्लागार मंडळाच्या सदस्य, अमेरिकन इकॉनॉमिक्स रिव्ह्यूच्या सहसंपादक, रिव्ह्यू ऑफ इकॉनॉमिक स्टडीजच्या व्यवस्थापकीय संपादक आदी महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम पाहिले आहे.

सध्या जागतिक अर्थव्यवस्थेवर आलेले मंदीचे सावट, ब्रेग्झिट आणि व्यापारयुद्धाचे परिणाम अशी आव्हाने जगासमोर आहेत. ही आव्हाने पेलण्यासाठी गीता गोपीनाथ सक्षम असल्याचे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून दिसते. कारण, नियुक्त झाल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर आणि इतर चलनमूल्य यांचा सखोल अभ्यास आवश्यक असल्याचे म्हटले आहे. जागतिकीकरणापासून लांब जाणार्‍या देशांचेही आव्हान माझ्यासमोर आहे, असे त्या म्हणाल्या. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मला मात करायची आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. जागतिक अर्थव्यवस्थेवर संशोधन करत असताना चलन विनिमय दर, व्यापार आणि गुंतवणूक, मौद्रीक धोरण, कर्जे आणि जगासमोरील आव्हाने यांवर ४० शोधनिबंधही त्यांनी सादर केले आहेत. जगातील आर्थिक घडामोडींवरही त्यांनी अचूक टिप्पणी केली आहे. केंद्र सरकारने केलेल्या आर्थिक सुधारणांमधल्या जीएसटीचे त्यांनी कौतुक केले होते.

२०१७ मध्ये त्यांची नियुक्ती केरळ सरकारने वित्तीय सल्लागार म्हणून केली होती. मात्र, डाव्या विचारसणीच्या आणि केरळ सरकारच्या स्वपक्षीयांनीही त्यांना विरोध केला. आर्थिक सुधारणांमुळे त्यांना डावी विचारसरणी गुंडाळून ठेवावी लागणार, अशी भीती असल्यानेच हा विरोध सुरू झाला होता. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी मात्र ठाम राहत त्यांची निवड योग्य असल्याचे म्हटले होते. सध्या त्यांच्या निवडीचा सर्वच भारतीयांना अभिमान आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून देण्यात आलेली जबाबदारीही खूप महत्त्वाची मानली जात आहे. आयएमएफचा संशोधन विभाग हा जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर संशोधन करून आयएमएफ सदस्यांसाठी रणनीती ठरविण्यास मदत करतो. याशिवाय काही महत्त्वपूर्ण घडामोडींवरही संशोधन केले जाते. जगातील १८६ देश आयएमएफचे सदस्य असून यात भारताचाही सामावेश आहे. आर्थिक स्थिती सुरक्षित करणे, आर्थिक प्रगतीचा आलेख उंचावणे, गरिबी कमी करणे, रोजगाराला चालना देणे यांसह आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणे, अशी प्रमुख कामे आयएमएफच्या अजेंड्यावर आहेत. गीता गोपीनाथ यांच्या नियुक्तीचा काही अंशी फायदा भारतालाही होईल, असे मत अर्थतज्ज्ञांनीही व्यक्त केले आहे.

गीता यांचे आई-वडील केरळमध्ये राहतात. त्यांचे वडील उद्योजक आहेत. गीता यांचे पती इक्बालसिंह धाडीवाल हे अर्थतज्ज्ञ आहेत. तसेच त्यावेळच्या आयएएस बॅचमध्ये सर्वोत्तम कामगिरीही त्यांनी केली आहे. १९९० मध्ये चंद्रशेखर सरकार सत्तेत आल्यानंतर आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने सरकारला सोने गहाण ठेवावे लागले होते. ही बातमी वाचून त्यांंना धक्का बसला होता, त्यांनी यानंतरच अर्थतज्ज्ञ होण्याचा निर्णय घेतला होता. तिथून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जगातील सर्वोच्च अर्थसंस्थेच्या प्रमुख पदापर्यंत येऊन पोहोचला आहे, हे भारतासाठी अभिमानास्पद आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/