शब्दांचा सिकंदर, अभिनयाचा बादशहा

    दिनांक  01-Jan-2019   

 


 
 
अभिनेता, संवाद लेखक, दिग्दर्शक, गायक, शिक्षक, अभियंता अशा एक नाही, तर अनेक भूमिका साकारणारे कादर खान दि. ३१ डिसेंबर रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी कालवश झाले. त्यांच्याविषयी...
 

"जिंदगी मे दोहीच टाईम आदमी इतना जलदी भागता है, ऑलिम्पिक का रेस हो, या पुलीस का केस हो,” हा संवाद वाचल्यानंतर खरंतर ‘अमर अकबर, अ‍ॅन्थोनी’ चित्रपटातला अमिताभ आपल्या डोळ्यासमोर येईल. पण, या संवादाचे श्रेय जाते ते विनोदी अभिनेते कादर खान यांना. त्यांच्या लेखणीतून त्यांनी एकाहून एक असे दिलखेचक संवाद लिहिले आणि ते संवाद अगदी अजरामर झाले. मग त्यात ‘दिवार’मधील “मेरा नाम विजय दिनानाथ चौहान” हा संवाद असो किंवा कादर खान यांचाच ‘मुकद्दर का सिंकदर’ चित्रपटातील “सुख तो बेवफा है, चांद दिनो के लिए आता है, और चला जाता है” अशा एकापेक्षा एक भारदस्त संवादांनी अनेक चित्रपटात जीव ओतला. अशा या विनोदाचे बादशाह असा ‘लेबल’ लागलेला हा संवाद लेखक आज आपल्यात नाही. अभिनेता, संवाद लेखक, दिग्दर्शक, गायक, शिक्षक, अभियंता अशा एक नाही, तर अनेक भूमिका साकारणाऱ्या कादर खान वर्षाअखेरीस दि. ३१ डिसेंबर रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी कालवश झाले आणि एका अजरामर युगाचा अंत झाला.

 

१९३७ मध्ये कादर खान यांचा जन्म अफगाणिस्तानातील काबूलमध्ये झाला. आई पाकिस्तानची आणि वडील अफगाणिस्तानचे असल्यामुळे अर्थातच, त्यांचे उर्दूवर हुकूमी वर्चस्व. आपल्या विनोदी चित्रपटात अगदी वडिलांची भूमिका केली तरी, लहान मुलासारखी मस्ती आणि तो अल्लडपणा खऱ्या आयुष्यात मात्र कादर यांना अनुभवता आला नाही. काबूलमध्ये ज्या परिसरात त्यांचे बालपण गेले, तो परिसर मुळात दारुड्यांचा होता. त्यामुळे कादर यांनी शहरात जावे, अशी त्यांच्या आईची इच्छा होती. मात्र, घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे त्यांना ते जमले नाही. त्यांचे वडील रोज दारू पिऊन आईला मारहाण करायचे. त्यामुळे कादर यांना त्यांच्या वडिलांविषयी एकप्रकारे प्रचंड चीड निर्माण झाली. एकेदिवशी कादर यांच्या डोळ्यांदेखत आईची इच्छा नसताना त्यांच्या वडिलांनी आईचे दुसरे लग्न आपल्याच मित्राशी लावून दिले. त्यामुळे लहानपणापासूनच कादर यांनी कुणाच्या ना कुणाच्या दबावाखाली आपले जीवन काढले. ते नेहमी म्हणायचे, “जर कुणाला खरंच चित्रपट काढायचा असेल, तर माझ्या जीवनावर काढा. माझं जीवन म्हणजे परिपूर्ण चित्रपट आहे.” अखेर फाळणीनंतर कादर खान मुंबईत आले आणि त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. या शिक्षणामुळे त्यांच्या जीवनात चित्रपटाचा दूरदूरवर संबंध आला नाही. नंतर त्यांनी काही काळ शिक्षकी पेशा स्वीकारला.

 
याचदरम्यान महाविद्यालयामधील एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या मित्राच्या सांगण्यावरून अभिनय केला आणि योगायोगाने त्याच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप कुमार उपस्थित होते. त्यांना कादर खान यांचा अभिनय खूप आवडला. पण, त्याहीपेक्षा त्यांना कादर खान यांची भाषा आवडली. त्यांनी कादर खान यांना आपल्या ‘जवानी दिवानी’ या चित्रपटासाठी संवाद लिहिण्यास सांगितले आणि कादर यांचा चित्रपटातील प्रवास सुरू झाला. पण, एक अभिनेता म्हणून कादर खान यांनी १९७३ मध्ये ‘दाग’ या चित्रपटातून या मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिले नाही. जवळजवळ चार दशकांमध्ये ३०० चित्रपटात काम केल्यानंतरही कादर खान यांची संवाद लिखाणाची आवड काही विरली नाही. त्यामुळे त्यांनी अभिनयाबरोबरच लिखाणही सुरूच ठेवले आणि तब्बल २५० चित्रपटांसाठी त्यांनी संवादलेखन केले. तरी त्यांना नेहमी एका गोष्टीची कायम सल राहिली, जी त्यांनी आपल्या शेवटच्या मुलाखतीत सांगितली. कादर खान म्हणतात, “मला सध्या संवादांमध्ये जी हिंदी भाषा वापरली जाते, तिचा राग येतो, चीड येते आणि दु:ख होते की, मी याबद्दल काहीही करू शकलो नाही. उर्दू ही एवढी मधुर भाषा असताना, त्या भाषेचा मान आजचे संवाद लेखक ठेवत नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
 

मनमोहन देसाई-कादर खान या जोडीने लिहिलेले ‘अमर, अकबर, अ‍ॅन्थोनी,’ ‘रोटी,’ ‘कुली,’ ‘ज्वालामुखी,’ ‘शराबी,’ ‘लावारिस,’ ‘मुकद्दर का सिकंदर’ हे चित्रपट प्रचंड गाजले. पण, १९९० चा काळ हा खऱ्या अर्थाने ‘कादर’काळ ठरला. हा काळ गाजवला तो कादर खान, गोविंदा आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी. गोविंदाने आपल्या मुलाखतीत मान्य केले होते की, “मला खऱ्या आयुष्यात कादर खान माझे वडील म्हणूनही चालले असते.” कादर खान-गोविंदा या जोडीने लोकांना कधी मुलगा-वडील म्हणून, तर कधी जावई-सासरा म्हणून खूप हसवलेआपल्या ४५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत कादर खान यांनी दिग्दर्शक डेव्हिड धवन आणि गोविंदासोबत सर्वाधिक काम केले. ‘साजन चले ससुराल,’ ‘हिरो नंबर १,’ ‘कुली नंबर १,’ ‘दुल्हे राजा,’ ‘हसीना मान जायेगी’ असे अनेक सुपरहिट चित्रपट तिघांनी केले. कादर खान यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर तीन वेळा ‘फिल्मफेअर’, तर २०१३ मध्ये त्यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल ‘साहित्य शिरोमणी’ पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांनी काहीकाळ चित्रपटात काम करणे बंद केले. कादर खान यांना ‘प्रोग्रेसिव्ह सुपरन्युक्लिअर पाल्सी’ या आजाराने ग्रासले होते. त्यामुळे ते चालू किंवा फिरू शकत नव्हते. याकरिता गेली दोन वर्षे ते कॅनडातच उपचार घेत होते. अखेर सोमवारी कॅनडात कादर खान यांनी शेवटचा श्वास घेतला. कादर खान यांचा ‘मुकद्दर का सिकंदर’मधला ‘जिंदगीका अगर सही लुफ्ज उठाना हो, तो मौत से खेलो,’ हा संवाद खूप गाजला. अशा या अजरामर अभिनेता, लेखकाला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून मानवंदना...

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/