चर्चेविना गती खुंटली...

    दिनांक  01-Jan-2019   

 

 
 
 
दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यंदाही उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग ऊनने नववर्षाचे औचित्य साधून देशवासीयांना संबोधित केले. त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आगामी वर्षातील आव्हानांवरही मात करण्याचे आश्वासन किमने दिले.
 
 
या आव्हानांमध्ये समावेश होतो तो देशावरील ऊर्जाटंचाईच्या गडद संकटाचा आणि बेरोजगारीची वाढती समस्या सावरण्याचा. ही दोन्ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी उ. कोरिया एकटा तितकासा समर्थ, स्वावलंबी नाही. तेव्हा, आर्थिक स्थैर्यासाठी शेजारी देशांशी संबंध सुधारणे आणि मुख्यत्वे अमेरिकेशी सामोपचाराने घेणे हे क्रमप्राप्तच. खरंतर किम काय बोलणार, याकडे द. कोरियासह अमेरिका, चीन यांचेही लक्ष लागले होतेच. कारण, उ. कोरियाच्या अण्वस्त्रीकरणाला पूर्णविराम देण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि उ. कोरिया यांचे एकमत झाले असले तरी त्याबाबत अजूनही दोन्ही देशांत तितकीशी स्पष्टता नाही. उ. कोरियाने ट्रम्प यांच्या सिंगापूरमधील जून २०१८ च्या भेटीनंतर तरी अण्वस्त्रप्रयोग केलेले नाही. पण, दुर्देवाने यासारख्या संवेदनशील विषयांवर दोन्ही बाजूंना ज्या गांभीर्याने चर्चा होणे अपेक्षित होते, ते २०१८ च्या अखेरपर्यंत तरी झालेले नाही. किम यांनी यापूर्वीही ट्रम्प यांना परत भेटण्याची तयारी दर्शविली होतीच. परंतु, याबाबत अमेरिकेकडून मिळालेल्या थंड प्रतिसादामुळे किम-ट्रम्प यांची दुसरी भेटही अशीच रखडली. या नववर्षात तरी हे दोन्ही नेते एकत्र भेटून एक सुवर्णमध्य काढतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग ऊन या दोन्ही नेत्यांचे स्वभाव पाहता, हेकेखोरपणा हे त्यातील वैशिष्ट्य प्रामुख्याने अधोरेखित करावे लागेल. कारण, वर्षाअखेरच्या आपल्या भाषणात किम यांनी अमेरिकेने उ. कोरियावर निर्बंध लादण्याचा, त्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तर उ. कोरियाच्या सार्वभौमत्वासाठी आणि सुरक्षिततेसाठी आम्हाला नवीन मार्गांचा विचार करावाच लागेल, असा धमकीवजा इशाराच देऊन टाकला. तेव्हा, किम यांनी ट्रम्प यांना दिलेल्या या सूचक इशाऱ्यावर ‘व्हाईट हाऊस’चे पुढचे पाऊल काय असेल, ते पाहावे लागेल.
 

खरं तर बलाढ्य अमेरिकेसमोर चिमुकल्या ठरणाऱ्या उ. कोरियाने ‘मूर्ती लहान, पण कीर्ती महान’ या उक्तीने आतापर्यंत सहा अणुचाचण्या घेतल्या. आज उ. कोरियाकडे अशी क्षेपणास्त्रे आहेत, जी अमेरिकेच्या कुठल्याही शहरावर अगदी सहजपणे मारा करू शकतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणे एकेकाळी ‘द लिटिल रॉकेट’ म्हणून ट्रम्प यांनी हिणवलेल्या किम जोंग ऊनला गांभीर्याने घेण्याशिवाय शेवटी अमेरिकेसमोर कुठलाही पर्याय उरला नाही. कारण, अमेरिकेने डिवचून, डोळे वटारून, प्रसंगी धाकही दाखवून पाहिला, पण किमचे मनसुबे अमेरिकाही डळमळीत करू शकला नाही. एवढेच नाही, तर अमेरिकेच्या उ. कोरियावरील एकांगी निर्बंधांच्या प्रयत्नांना किमने थेट ‘गँगस्टर’ची उपमा देऊन फेटाळून लावले. त्यामुळे एकूणच आतापर्यंत या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चर्चांच्या गुऱ्हाळातून दोन्ही देशांच्या हाती ठोस असे काहीही आलेले नाही, असेच खेदाने म्हणावे लागेल. ही बाब निश्चितच कोरियन द्वीपकल्पासाठी सकारात्मक ठरणारी नाही. कारण, प्रश्न एकट्या उ. कोरियाचा नाही, तर द. कोरिया आणि चीन यांचेही हितसंबंध यामध्ये तितकेच गुंतले आहेत.

 

अमेरिका हा द. कोरियाचा अगदी नैसर्गिक मित्र. अमेरिकन सैन्यही आजघडीला द. कोरियात तैनात आहे. त्यावरही किम यांचा आक्षेप आहेच. म्हणजे, पुढेमागे भविष्यात किमने आक्रस्ताळेपणा करत अमेरिकेवर कुठलाही शस्त्रप्रयोग केला, तर अमेरिकी सैन्याला उ. कोरियात प्रवेश करायला तासाभराचाही अवधी लागणार नाही. त्यामुळे अफगाणिस्तानमधून तसेच इतरत्र सैन्य मागे घेणाऱ्या अमेरिकेने द. कोरियातून सैन्याला माघारी बोलविण्याचा निर्णय घेतलेला नाही आणि आगामी काळातही ट्रम्प यांच्याकडून अशा मोठ्या निर्णयाची अपेक्षा करणे अतिशयोक्तीच ठरू शकते. पण, अमेरिका आणि उ. कोरियाच्या या सुप्त संघर्षामध्ये मधल्या मध्ये भरडला जातोय तो द. कोरिया. ट्रम्प-किमच्या चर्चेचे भिजते घोंगडे जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत किमही द. कोरियाच्या भेटीवर जाण्यास उत्सुक नाहीत. तेव्हा, ट्रम्प आणि किम, दोघांनाही परस्पर सहकार्य आणि सामंजस्याने देशहितासाठी, शांती आणि स्थैर्यासाठी चर्चेचा वेग वाढविण्याशिवाय गत्यंतर नाही.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/