वृक्षपूजा भाग १

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Sep-2018   
Total Views | 


गेली हजारो वर्षे वड, पिंपळ, बेल, तुळस, आघाडा, कदंब, पारिजातक, चंदन, रुद्राक्ष, आंबा, अशोक, रुई, शमी, आपटा अशा झाडांचं अस्तित्व टिकविण्यात या झाडांप्रती असलेल्या धार्मिक भावनांचा मोलाचा वाटा विसरून चालणार नाही. धार्मिक भावनांमुळेच या झाडांचं अस्तित्व आणि त्यांचा माणसाशी असलेला संबंध पिढ्यानपिढ्या टिकून राहिला आहे.


भारतीय संस्कृतीत गाय, नाग असे काही प्राणी आणि वड, पिंपळ, औदुंबर असे काही वृक्ष यांना देवत्व बहाल करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे.जे जे भेट भूत ।तया मानिजे भगवंतही आपली संस्कृती! आधुनिक काळातील काही तथाकथित विज्ञानवादी आणि बुद्धिवादी (की सावरकरांच्या भाषेत ‘बुद्धिवेडे’?) लोक अशा परंपरांना ‘अंधश्रद्धा,’ ‘बुरसटलेले विचार’ वगैरे उपमा देऊन त्याची हेटाळणी करतील. ज्या वृक्षांना आपल्या संस्कृतीत धार्मिकदृष्ट्या पवित्र वा पूज्य मानलं गेलं आहे, त्या वृक्षांचं वनस्पतिशास्त्र, त्यांचं परिसंस्थेतलं महत्त्व, त्यांचे औषधी उपयोग हे सगळं विज्ञान आधुनिक काळात प्रत्येकाने समजून घ्यायलाच हवं. म्हणून लगेच या परंपरा कालबाह्य आणि टाकाऊ ठरतात, असं नाही. वनस्पतिशास्त्राचा विकास गेल्या शंभर वर्षांत झाला. पऱ्या वरणरक्षणाची गरज तर अगदी अलीकडे जाणवायला लागली. पण त्याआधी हजारो वर्षे वड, पिंपळ, बेल, तुळस, आघाडा, कदंब, पारिजातक, चंदन, रुद्राक्ष, आंबा, अशोक, रुई, शमी, आपटा, अशा झाडांचं अस्तित्व टिकवण्यात या झाडांप्रती असलेल्या धार्मिक भावनांचा मोलाचा वाटा विसरून चालणार नाही. धार्मिक भावनांमुळेच या झाडांचं अस्तित्व आणि त्यांचा माणसाशी असलेला संबंध पिढ्यानपिढ्या टिकून राहिला आहे.

 

‘वृक्षपूजे’चा (किंबहुना निसर्गपूजेचा) उगम हा कुतूहलातून आणि कृतज्ञतेच्या भावनेतून झाला आहे. वेगवेगळ्या वृक्षांच्या पानांचा, फुलांचा, खोडांचा, मुळांचा, फळांचा वा संपूर्ण झाडाचा माणसाला अन्नासाठी, आसऱ्या साठी, सुवासासाठी, औषधासाठी होणारा उपयोग ज्ञात झाल्यावर माणसाची त्यांच्याप्रती कृतज्ञता वाढली आणि त्यातून त्यांना धार्मिकदृष्ट्या पवित्र स्थान दिलं गेलं असावं. काहींच्या मते देव, दानव, गंधर्व, किन्नर, यक्ष, इ. दैवी व अतिमानवी योनीतील अद्भूत, अलौकिक कृत्ये करणाऱ्या शक्तींचा वास उच्च स्थानी व त्यातही प्राधान्याने वृक्षांवर असल्याची मानवाची कल्पना होती आणि या शक्तींविषयी पूज्यभाव व्यक्त करण्याचा प्रत्यक्ष पऱ्या य म्हणून वृक्षपूजा प्रचलित झाली असावी. प्राचीन काळी वृक्षांना अग्नीत आहुती देत. त्यांना कौल लावला असता ते कीर्ती, समृद्धी देतात अशी समजूतही होती. वृक्षांच्या फांद्यांना माळा घालून, त्यांच्याभोवती दिवे पाजळून व त्यांना नैवेद्य समर्पित करून लोक वृक्षोत्सव करीत, असं जातकात सांगितलं आहे. अश्वत्थाची (पिंपळाची) मुंज व तुळशीचं लग्न करण्याची प्रथा प्राचीन काळापासून आहे. काही वनवासींमध्ये मुलीचे लग्न प्रथम एखाद्या वृक्षाशी लावतात व नंतर वराशी लावतात. दोन वृक्षांचेही परस्परांशी विवाह करण्याची चाल काही समाजांमध्ये आहे. बृहत्संहितादी ग्रंथांतून वृक्षांचा उपयोग भूत-पिशाच्चांच्या निवासासाठी व जादूटोण्यासाठी असल्याचं सांगितलं आहे. एखादा वृक्ष तोडण्यापूर्वी त्यात वास्तव्य करणाऱ्या आत्म्याची क्षमा मागण्याची रितही पुष्कळशा जमातींमध्ये आढळते. शाक्तपंथी लोक काही विशिष्ट वृक्षांना आपले कुलवृक्ष मानतात आणि त्यांना वंदन केल्याशिवाय दिवसाच्या कामांना आरंभ करीत नाहीत. काही जमातींत विवाहप्रसंगी देवक म्हणून बेल, अंजीर, वड, शमी यांच्या संपर्ण शाखांचे पूजन करतात.

 

भारतीय पुराणांमध्ये आणि लोकसाहित्यातही वृक्षमहात्म्य भरपूर सांगितलं आहे. सिंहासन बत्तीशी’मध्ये एक संस्कृत सुभाषित आढळतं ते असं,

छायामान्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपे ।

फलन्ति च परार्थेषु नात्महेतोर्महाद्रुमा॥

 

अर्थ - महावृक्ष स्वतः उन्हात उभे राहतात आणि अन्यांना सावली देतात. ते दुसर्यांसाठी फळे धारण करतात, स्वतःसाठी नाही.

संत ज्ञानेश्वरमहाराजांनी सत्पुरुषाची लक्षणे सांगताना वृक्षांचा असाच गौरव केला आहे. ते म्हणतात,

 

जो खांडावया घावो घाली ।

का लावणी जयाने केली ।

त्या दोघा एकचि सावुली ।

वृक्ष दे जैसा ॥

 

अर्थ - वृक्ष हा तोडणाऱ्याला आणि लावणाऱ्याला सारखीच सावली देतो. भविष्योत्तर पुराणात वृक्षारोपणाचे महत्त्व सांगणारा श्लोक आढळतो तो असा,

 

अश्वत्थमेकं पिचुमन्दमेकं न्

यग्रोधमेकं दश चिंचिणीकं ।

कपित्यबिल्वामलकीत्रयं च

पंचाम्ररोपी नारकं न पश्येत ॥

 

अर्थ - जो एक पिंपळ, एक निंब, एक वड, दहा चिंचवृक्ष, तीन कवठाची, तीन बेलाची, तीन आवळीची व पाच आंब्यांची झाडं लावतो, तो कधीही नरक पाहत नाही.

 

एका वृक्षारोपणाचे महत्त्व दहा पुत्रांएवढे आहे, असं मत्स्यपुराणात सांगितलं आहे. स्कन्दपुराणाच्या मते विष्णूचं वास्तव्य वटवृक्षात, ब्रह्माचं पलाशवृक्षात, शक्तीचं आम्रवृक्षात, इंद्राणी व अन्य देवपत्न्या यांचं वास्तव्य लतावेलींमध्ये आणि उर्वशी आदी अप्सरा यांचं वास्तव्य मालती व तत्सम पुष्पवृक्षांत असतं. दक्षिण भारतातील शिवमंदिरांत विविध वृक्षांचे महात्म्य आहे. हे वृक्ष ‘स्थलवृक्ष’ या नावाने मान्यता पावले आहेत. मदुरेच्या मिनाक्षी मंदिरात मिनाक्षी-सुंदरेश्वराचा कदंब वृक्ष आणि त्रिचनापल्लीजवळच्या जम्बुकेश्वराचा जंबू वृक्ष ही त्याची दोन ठळक उदाहरणं आहेत. सिंधुखोऱ्या त सापडलेल्या शिक्क्यांवर व भाजलेल्या मातीच्या ताईतांवर वृक्षपूजेची चित्रे आढळतात. निरनिराळ्या शिलालेखांवरून कळतं की, प्राचीन काळी प्रत्येक गावांत एकेक पवित्र व पूजनीय वृक्ष असे. काही शिलालेखांमध्ये म्हटलं आहे की, अशा वृक्षांखाली न्यायदानाचं काम चाले. सूर्य एखाद्या पवित्र वृक्षावरून जात असता त्या वृक्षाला सन्मानाने भोजन दिले जाई. वैदिक यज्ञात पशु ज्या खांबाला बांधला जातो त्याला ‘यूप’ म्हणतात. युपासाठी झाडाची फांदी तोडण्यापूर्वी वृक्षाची पूजा करीत आणि तोडलेल्या जागी तुपाची आहुती देऊन हा वृक्ष परत शंभर पट वाढावा,’ अशी प्रार्थना करीत.

 
 

‘वृक्षपूजा’ ही केवळ भारतातच नव्हे, तर जगात पुष्कळ ठिकाणी आहे. ‘सर्व वृक्ष पवित्र होत’ असं जरथुश्त्राने म्हटलं आहे. ग्रीसमधील ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये विजयी झालेला वीर हा वृक्षदेवाचा मानवी प्रतिनिधी मानला जात असे. त्याच्या मुकुटाची सजावट पवित्र वृक्षाच्या कोवळ्या पानांनी आणि डहाळ्यांनी केली जात असे. नाताळाच्या सणात ख्रिसमसचे झाड उभे करतात, हाही वृक्षांबद्दलचा आदरभाव व्यक्त करण्याचाच प्रकार आहे. इजीअन कलाकृतीत झाडे पवित्र वेदीजवळ किंवा त्या वेदीतूनच विस्तार पावलेली दाखवतात. पश्चिमी संस्कृतीत ओक वृक्षाचे महत्त्व मोठे आहे. ग्रीक देवताविश्वातल्या देवांचा राजा ‘झ्यूस’ याची पर्जन्यदेव म्हणून पूजा करताना जो विधी केला जाई, त्यात ओक वृक्षाला महत्त्वाचे स्थान होते. इट्रुस्कन राजे हे ज्युपिटरचे राजे समजले जात. त्यांच्या मुकुटांवर ओक वृक्षांच्या पानांच्या सुवर्णाकृतींची सजावट दिसे. इजिप्तमध्ये ‘सिकॅमूर’ नावाच्या वृक्षाची पूजा प्रचलित होती.  वड, पिंपळ, औदुंबर, तुळस, बेल, कदंब, पारिजातक, रुई अशा काही निवडक वृक्षांची आणि वनस्पतींची पूजा करण्याच्या वेगवेगळ्या प्रचलित पद्धती पाहूया पुढच्या भागात.

संदर्भ -

1.भारतीय संस्कृतीकोश

2.मराठी विश्वकोश

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@