यावर्षी तरी शांततेचा श्रीगणेशा?

    दिनांक  09-Sep-2018    

ही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या जय्यत तयारीला सुरुवात झाली असली तरी, अजूनही काही गोष्टींची तयारी करायची खरं तर गरज आहे. ही तयारी करायची गरज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आणि घरगुती गणपतींनासुद्धा आहे. सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा उत्सव म्हणून साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाचे २० व्या शतकातच ब्रॅण्डिंग झाले आणि आपण त्याचे ‘भाविक’ नव्हे तर ‘ग्राहक’ बनत गेलो. सार्वजनिक गणेशोत्सवांची वाढती संख्या, त्याचबरोबर त्याचा वाढता व्याप, यामुळे ‘हाच तो मी सुरू केलेला उत्सव आहे का?’ असा प्रश्न टिळकांनाही पडावा, अशी सध्याची परिस्थिती. म्हणजे, दहा दिवस निखळ आनंद देणारा उत्सव म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या सणाचा बघता बघता ‘इव्हेंट’ झाला आणि त्यात राजकीय पक्षांच्या मध्यस्थीमुळे या सणाची पुरती दशा आणि दिशा बिघडली. आधीच घोषित दहीहंडी उत्सवात सर्व नियम धाब्यावर बसवल्यानंतर, आता येत्या गणेशोत्सवाकडून तरी थोड्या अपेक्षा आहेत. मुंबई, ठाणे आणि उपनगरांत घोषित शांतता क्षेत्रात कर्कश्श डॉल्बी आणि डिजेच्या नादात आधीच गणपतींचे आगमन सोहळे सुरू झालेच आहेत, अशाप्रकारे या उत्सवाच्या मुळावर दरवर्षी घाव घातला जातोच. मात्र, शहरातल्या लोकांना याची उपरती झाली नसली तरी, महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमध्ये २०१२ रोजी एका उपक्रमाची सुरुवात झाली. तो उपक्रम म्हणजे ‘एक गाव, एक गणपती.’ या उपक्रमाला गावोगावी चांगला प्रतिसादही मिळाला आणि मागच्या वर्षी जवळजवळ एक हजार गावांनी हा उपक्रम राबवला. या विपरीत परिस्थिती मुंबई आणि उपनगरांमध्ये, ‘जेवढ्या गल्ल्या तेवढे गणपती.’ म्हणजे सार्वजनिक गणपतींच्या नावावर सगळे ‘इव्हेंट’ करायला मोकळे. यावर्षी मुंबईत घोषित अशी ११० शांतता क्षेत्रे आहेत आणि ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर मुंबई महानगरपालिकेने एक लाख रुपये दंड आणि पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास, अशी कडक शिक्षाही जाहीर केली आहे. यासाठी शासनाने दिवसा ५० डेसिबल आणि रात्री ४० डेसिबल पातळीची मर्यादा घालून दिली असली तरी सार्वजनिक मंडळे दिवसा ७०-७५ डेसिबल एवढी पातळी सहज गाठतात. आता पालिकेच्या नियमांचंच विसर्जन होतंय की काय, हे येणाऱ्या काही दिवसांत कळेलच. तरी, निदान विसर्जनाच्या दिवशी तरी समाजभान आणि आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य मानून यावर्षी तरी शांततेच्या श्रीगणेशाचे आगमन व्हावे, एवढीच खुद्द श्रीगणेशाकडे प्रार्थना!
 

अफवांच्या बाजाराला चाप

 

खोट्या बातम्या आणि अफवा हे काही समाजमाध्यमं वापरणाऱ्यांसाठी नवीन नाही आणि सगळं माहीत असूनही डोळसपणे अजूनही हेच मजकूर पुढे फॉरवर्ड केले जातात. पण, या सगळ्याचा वाढता दुरुपयोग पाहता अखेर या सर्व अफवा रोखण्यासाठी महाराष्ट्रासह १० राज्यांत व्हॉट्सअॅपने जनजागृती करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारची जनजागृती समाजमाध्यमांना करावी लागते, कारण गेल्या वर्षभरात प्रकारच तसे घडले. खोटी माहिती पसरवून देशातील काही भागांमध्ये गेल्या महिन्याभरात अनेक मारहाणीचे प्रकार घडले. निरपराध लोकांना ठार मारण्याच्या घटना घडल्या, परिणामी अफवांचा प्रसार रोखण्यासाठी काहीतरी करा, असे म्हणून शासनाने या समाजमाध्यमांचे कान उपटले. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या या समाजमाध्यमांनी रेडिओच्या माध्यमातून बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही जनजागृती मोहीम २९ ऑगस्टपासून सुरू केली. हे सगळं सुरू असताना आता मात्र अशा घटना घडल्या तर, समाजमाध्यमं हाताळणाऱ्या कंपनींच्या उच्चाधिकाऱ्यांनाही उत्तर द्यावे लागू शकते, अशी शिफारस आता करण्यात आली आहे. शासनाने अशा घटनांवर आळा बसावा यासाठी एक समिती नेमली आणि त्या अंतर्गत, जर यापुढे तुम्ही कोणत्याही अफवा, फेक न्यूज, अश्लील मजकूर फेसबुक वा व्हॉट्सअॅपच्या माध्यमांतून पसरवत असाल तर, कडक शिक्षाही भोगाव्या लागतीलगेल्या एका वर्षात देशांत नऊ राज्यांमध्ये जमावाकडून ४० मारहाणीच्या घटना घडल्या. त्यामुळे आपण पाठवलेला एखादा मजकूर कुणाच्या तरी जीवावर बेतू शकतो, याचा विचार न करता केवळ, आपण या समाजमाध्यमांचा भाग आहोत, म्हणून डोळे झाकून काहीही पुढे फॉरवर्ड करणं बंदच केलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर या मुद्द्यावर एक समिती गठीत केली गेली. यातील ५० टक्के घटना प्रामुख्याने व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमांतूनच पसरणाऱ्या अफवांमुळेच घडल्याचे समोर आले. यामध्ये मुले पळवून नेणारी टोळी, प्राण्यांची तस्करी करणारी टोळी अशा आशयाचे मेसेज व्हायरल होत होते. या अफवांना बळी पडत जमावाकडून अनेकांना मारहाण करीत ठार करण्यात आले. या सगळ्यावरून मनुष्य हा सर्व प्राण्यांपेक्षा हुशार प्राणी आहे, हीसुद्धा अफवा आहे की काय, असं वाटायला लागलं तर आश्चर्य वाटायला नको.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/