सन्मार्गाचे वस्त्र देणारा ‘निर्वस्त्र संत’

    दिनांक  08-Sep-2018   

 

 
तरुण सागरजी महाराज आपल्या प्रवचनातून गहन तत्त्वज्ञान सांगत बसत नसत. ते जैन होते आणि महावीराचे स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे. त्याला ‘अनेकांतवाद’ म्हणतात. सामान्य माणसाला तत्त्वज्ञानात फार रूची नसते. त्याला व्यावहारिक जीवन, धर्माच्या आधारे कसे जगायचे हे सांगावे लागते. मरेपर्यंत तरुण सागरजी हेच काम करत राहिले. त्यांच्या कडव्या प्रवचनांच्या पुस्तकात तत्त्वज्ञानांची चर्चा आपल्याला आढळणार नाही, परंतु तत्त्वज्ञान जगायचे कसे, याची मात्र पानोपानी रेलचेल दिसेल.
 

सन्मार्गाचे वस्त्र देणारा ‘निर्वस्त्र संत’ भारतभूमीचे वर्णन करताना स्वामी विवेकानंद म्हणाले की, “ भारत ही धर्मभूमी आहे. धर्म भारताचा आत्मा आहे. भारतातून धर्म काढून घेतला, तर काहीही उरणार नाही. “ विवेकानंदांच्या या विवेचनाचे प्रत्ययांतर भारतात सदोदीत येत असते. प्रत्येक संप्रदायात साधू-संत, महात्मे, यांचा जन्म होतो आणि ते समाजाला आपापल्यापरिने धर्मदर्शन घडवित जातात. यात कुठे खंड पडल्याचे दिसत नाही. राष्ट्रसंत रामदास स्वामी म्हणतात, “ धर्मसंस्थापनेचे नर। ईश्वराचे अवतार। झाले आहे पुढे होणार। देणे ईश्वराचे॥” मध्यकाळात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत संताची मांदियाळी दिसते. ब्रिटिशांच्या काळातदेखील देशभर अनेक संत आणि सत्पुरूष झाले. रामकृष्ण परमहंस, स्वामी रामतीर्थ, स्वामी विवेकानंद, शिर्डीचे साईबाबा, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, अशी अनेक नावे आपण घेऊ शकतो. स्वातंत्र्यानंतरही हा प्रवाह थांबलेला नाही. आताच्या काळात श्री श्री रवीशंकर, माता अमृतानंदमयी, रामायण कथाकार मोरारी बापू, गोविंदगिरी महाराज अशी अनेक नावे घेता येतात. यातीलच एक नाव नुकतेच दिवंगत झालेले जैन मुनी तरुण सागरजी महाराज यांचे घ्यावे लागते. ज़ैन मुनी तरुण सागर इतर संतापेक्षा थोडे वेगळे होते. ते दिगंबर पंथाचे जैन मुनी होते. ते निर्वस्त्र राहत. प्रवचनकर्त्यांची भाषा मधुर आणि रसाळ असते. तरुण सागर यांच्या प्रवचनांना ‘कडवे प्रवचन’ असे म्हटले जाते. त्यांच्या कडव्या प्रवचनांचे आठ खंड आहेत. प्रत्येक खंड साधारणत: १७५ पानांचा असून प्रत्येक पानावर दहा ते वीस ओळींचे एक प्रवचन आहे. तुम्ही कडवे प्रवचन का देता? असे त्यांना कुणी विचारले असता, त्यांनी उत्तर दिले की, प्रारंभी मी गोड भाषेत बोलत असे. माझे बोलणे ऐकण्यासाठी तीस-चाळीस वयस्क माणसे यायची. त्यातील अर्धी झोपायची. त्यानंतर मी कडव्या भाषेत प्रवचने द्यायला सुरुवात केली, ती ऐकायला समाज येऊ लागला. त्यात केवळ जैन असत असे नाही. समाजाच्या सर्व स्तरातील माणसे प्रवचनासाठी येत.

 

तरुण सागरजी महाराज आपल्या प्रवचनातून गहन तत्त्वज्ञान सांगत बसत नसत. ते जैन होते आणि महावीराचे स्वतंत्र तत्त्वज्ञान आहे. त्याला ‘अनेकांतवाद’ म्हणतात. सामान्य माणसाला तत्त्वज्ञानात फार रूची नसते. त्याला व्यावहारिक जीवन, धर्माच्या आधारे कसे जगायचे हे सांगावे लागते. मरेपर्यंत तरुण सागरजी हेच काम करत राहिले. त्यांच्या कडव्या प्रवचनांच्या पुस्तकात तत्त्वज्ञानांची चर्चा आपल्याला आढळणार नाही, परंतु तत्त्वज्ञान जगायचे कसे, याची मात्र पानोपानी रेलचेल दिसेल. तसेच त्यांनी जे काही सांगितले ते नवीन होते, यापूर्वी कोणी सांगितले नव्हते असेही नाही. संत कबीरांची दोह्यांची भाषादेखील कडवीच आहे. उदाहरणार्थ, दगडाची पूजा करून देव मिळतो काय? त्यापेक्षा जात्याची पूजा करा, ते निदान पीठ तरी देते. संत तुकारामांची भाषादेखील फटकळ आणि काही वेळा शिवराळ आहे. जैन मुनी तरुण सागर यांनी हीच परंपरा आजच्या काळात पुढे नेली. विषय मांडायची त्यांची स्वत:ची खास शैली होती. मशीनगनमधून गोळ्या याव्यात तसे त्यांच्या तोंडातून शब्द येत आणि चिमटा काढणारी वाक्य मोठ्या आवाजात येत. त्याचवेळी हातांची आणि बोटांची हालचाल अत्यंत मार्मिक होत असे. ऐकणाऱ्याच्या डोक्याला आणि मनाला कडवे प्रवचन स्पर्श करून जाई. प्रवचनात त्यांना कोणताही विषय वर्ज्य नसे. सामान्यत: साधु-संत राजकारणावर बोलत नाहीत, तरुण सागरजी यांना राजकारण विषय अस्पृश्य नव्हता. ते म्हणतात,” राजकारणावर धर्मच नियंत्रण ठेवू शकते. जर धर्म पती असेल, तर राजनीति पत्नी आहे. पत्नीला सुरक्षा देणे हे पतीचे कर्तव्य आहे आणि पत्नीचा धर्म पतीच्या अनुशासनाचा स्वीकार करणे. राजनीति आणि धर्मामध्ये असेच नाते असायला पाहिजे.” असेच त्यांचे दुसरे कडवे प्रवचन, “ जगाला धनाशी कर्तव्य असते. जगाला ध्यान नको, धन हवे. भजन नको, भोजन हवे. सत्संग नको, रागरंग हवा.”

 

तत्त्वज्ञानाचा विषयदेखील फार सोप्या आणि मार्मिक भाषेत सांगण्याची त्यांची शैली होती. प्रत्यक धर्म सांगतो की, शाश्वत असे जगात काही नाही. पैसा, संपत्ती, धन-दौलत, आपल्या बरोबर येत नाही. अंतिम प्रवास ज्याचा त्याला करावा लागतो. तरुणजी म्हणतात,” आजच्या जगात प्रत्येकाला आपल्या सुंदर रुपाची चिंता आहे. त्यासाठी स्त्री-पुरूष काय करत नाहीत. परंतु त्यांना समजले पाहिजे की, रुपाचे स्वरूप फार काळ टिकत नाही, ते नश्वर आहे. स्व-रुप शाश्वत आहे. रुप बाहेरून दिसते, स्व-रुप आतमध्ये असते. रुप अनेक प्रकारात दिसते, परंतु स्व-रुप एकच असते. रुप बदलते, स्व-रुप कधी बदलत नाही. म्हणून व्यक्तीने आपल्या रुपाची चिंता करण्याऐवजी आपल्या स्व-रुपाची चिंता केली पाहिजे.” ज़ीवनात मृत्यू हा शाश्वत असतो, हे सांगताना मुनीजी म्हणतात,” वियोग म्रिय आहे. संयोग नाही. या जगात आपल्याला कायमचे राहायचे नाही, मग मृत्यू काय आहे तर ‘रिटर्न तिकीट.’ जन्माबरोबर मृत्यू म्हणजे प्रवास करत असताना काढलेले ‘रिटर्न तिकीट’ आहे.”

 

देशापुढील स्त्री भ्रूणहत्या, भ्रष्टाचार, आंतकवाद, यावरदेखील त्यांनी आपले स्पष्ट आणि परखड मत कोणाचीही भीड मुरवत न ठेवता मांडली आहे. कन्या भ्रूणहत्येविषयी ते म्हणाले, “ ज़्याला मुलगी नसेल त्याला निवडणूक लढविण्याचा अधिकार देता कामा नये. ज्या घरात मुलगी नसेल, त्या घराशी नातेसंबंध जोडू नयेत आणि साधु-संतांनी अशा घरातून भिक्षा मागू नये. आंतकवाद्यांना कोणता धर्म नसतो. जो धर्म आंतकवाद्यांना जन्मास घालतो, तो धर्मच नव्हे. जर आपण आपल्या जीवनात देशाला प्रथम स्थान दिले तर विकासाच्या मार्गावर देश खूप मोठी उंची गाठेल. राजकारणाविषयी ते सांगून गेले,” राजकारणाची विषवेल राष्ट्राच्या पूर्ण वृक्षाला आच्छादून गेली आहेत. त्यात आनंद न मानणारे फार थोडे लोक आहेत. राजनीति सिद्धांतहीन झालेली आहे. ती आपल्या चारित्र्याला सुधारू शकत नाही, तर देशाचे चारित्र्य ती कसे सुधारणार? देशाच्या राजनीतित सुधारणा घडवून आणायची असेल, तर जेवढे म्हणून भ्रष्ट राजनेता आहेत, त्यांना अल्पकाळासाठी वेड्यांच्या रुग्णालयात पाठविले पाहिजे.” तरुण सागरजी महाराज तरुण वर्गामध्ये खूप लोकप्रिय झाले. त्यांना संपत्तीची कसलीच हाव नव्हती. ते कोणत्याही मठाचे मठाधिपती झाले नाहीत. मठाच्या नावाने जमीन किंवा स्थावर जंगम मालमत्ता त्यांनी गोळा केली नाही. पैशाचा कसलाही मोह नसल्यामुळे ते कोणाच्याही कसल्याही बंधनात नव्हते. खऱ्या अर्थाने मुक्त होते. त्यामुळे त्यांची कडवी प्रवचने कुणालाही लागत नसत. कारण ते सत्य सांगत. सत्य सांगण्यासाठी सांगणाऱ्याकडे फार मोठे नैतिक बळ असावे लागते. तत्त्वज्ञान तर सगळेच सांगतात. ते जे काही सांगत ते लोकांना माहीत नव्हते असंही नाही. परंतु ते सांगण्याच्या मागे त्यांचे जे नैतिक बळ होते, ते अतुलनीय होते. म्हणून त्यांच्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त होत असे. राजस्थान विधानसभेत त्यांना सन्मानाने बोलावून प्रवचनाचा कार्यक्रम करण्यात आला. विधानभवनात वस्त्रहीन साधू हे काही पुरोगाम्यांना खटकले. त्यांनी त्यावर टीका केली. तरुणजींचे यासंबंधीचे जे मत आहे, ते असे की, स्तुती आणि निंदा कसाचाही माणसाने विचार करू नये. तो ज्या परिस्थितीत आहे, त्या परिस्थितीत त्याने आनंद मानावा. एका साधुचे उदाहरण देऊन त्यांनी सांगितले की, त्यांनी एका दुष्ट माणसाला किती वाजले? असे विचारले. त्या दुष्ट माणसाने साधूच्या डोक्यात काठी मारून एक वाजला असे सांगितले. साधू हसायला लागले. शिष्य म्हणाला, “तुम्ही न रागविता हसता का?” साधू म्हणाले, “बरे झाले मी त्याला एका तासापूर्वी विचारले नाही, नाही तर बारा वेळा काठ्या खाव्या लागल्या असत्या.”

 

तरुण सागरजी यांच्या प्रवचनातून भारतीय परंपराच आणि विचारधारेचे दर्शन होत असे. जैनमुनी म्हटले की, तो अहिंसक. सागरजीदेखील अहिंसाच सांगत. परंतु त्यांना रामायण, महाभारत, गौतम बुद्ध, कुणीही वर्ज्य नव्हते. प्रवचनात त्यांची उदाहरणे देत. दुर्योधनाला सगळेच वाईट दिसतात, तर युधिष्ठिराला कुणीच वाईट दिसत नाही. ज्याची जशी मनोवृत्ती तसे त्याला जग दिसते, असे ते सांगत. संतवचनांचादेखील ते मार्मिक उपयोग करीत. कबीराला एकाने विचारले,” सत्य आणि असत्य यात किती अंतर आहे? कबीर म्हणाले ‘चार इंच.’ कबीराचे हे वचन सांगून तरुणजी म्हणतात, “ज़े प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतो, ते सत्य असते, आम्ही फक्त कानाने चाललेलो आहोत. ज्या कुणाविषयी आपण काही ऐकतो तेच खरे मानतो, सत्य जाणून घेण्यासाठी आपण कधी डोळ्यांचा उपयोग करीत नाही.” नर्म विनोद हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. पती-पत्नी जात होते. झाडावर एक माकड बसले होते. त्याच्याकडे बोट दाखवून पती म्हणाला, “तो बघ तुझा नातेवाईक बसला आहे.” पत्नी म्हणाली, “त्याला मी काय करू, लग्नानंतर ते माझे नातेवाईक झाले.” भारत ही धर्मभूमी आहे, म्हणजे भारत भोगभूमी नाही, ही त्यागभूमी आहे. आध्यात्मिक साधनेत वस्त्रहीन राहणे, हा सर्वोच्च त्यागाचा आदर्श असतो. शरीर झाकण्यासाठी वस्त्राची मालकीदेखील नको. तरुण सागरजी यांच्याकडे एक मयूरपंख आणि कमंडलू एवढीच संपत्ती होती. अमेरिकन संस्कृतीविषयी ते म्हणाले, “अमेरिकेचा सिद्धांत आहे, खा-प्या-मजा करा. रहो हॉटेल में, मरो हॉस्पिटल में। आमचा सिद्धांत आहे जगा आणि जगू द्या, रहो घर में, मरो तपोवन में। मरा पण असे मरा, ज्यावेळी तुमच्या नात्यात नसलेली माणसेदेखील तुमच्या आठवणीने डोळ्यांतून पाणी काढतील. एक पैची दक्षिणा न घेणारा आणि समाजात राहूनही सर्व मोहांपासून अलिप्त असलेला हा संत समाजाला ऐकायला कटू पण परिणामी गोड वचने ऐकवून वयाच्या एकावन्नाव्या वर्षी सर्वांच्या डोळ्यांत पाणी आणून निजधामाला गेला आहे. ‘रिर्टन तिकिटा’ने त्यांचा प्रवास पुन्हा सुरू होईल. तो कुठे, केव्हा, कसा असेल, हे आपण नाही सांगू शकत.

 

त्यांच्या मृत्यूवर शोक प्रकट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “त्यांच्या अकाली निधनाने मी खूप दु:खी झालो आहे. त्यांच्या समृद्ध आदर्शांबद्दल तसेच सहानुभूती आणि समाजासाठी त्यांनी जे भरीव काम केले, याबाबतीत आम्हाला त्यांचे सदैव स्मरण राहील. त्यांचे श्रेष्ठ मार्गदर्शन लोकांना नेहमीच प्रेरणा देत राहील. त्यांच्या अगणित शिष्यांसोबर आणि जैन समाजासोबत मी मनाने आहे.” राष्ट्राध्यक्ष रामनाथ कोविंद म्हणतात, “ज़ैनमुनी तरुण सागरजी महाराज यांच्या निधनाचे वृत्त ऐकून तीव्र दु:ख झाले. आपल्या कडव्या प्रवचनाद्वारे त्यांनी शांतीचा आणि अहिंसेचा संदेश समाजात दिला. आपला देश एका आदरणीय, आध्यात्मिक नेत्याला मुकला आहे.” दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनीदेखील आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/