५०० बांगलादेशी मुलींची भारतात विक्री

08 Sep 2018 13:31:19



 

 

मुंबई : नोकरीचे आमिष दाखवून बांगलादेशी मुलींना भारतात आणून विकणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद सैदुल शेख असे या आरोपीचे नाव आहे. त्याने गेल्या वर्षभरात एकूण ५०० मुलींना भारतात आणून वेश्याव्यवसायात ढकलले. या प्रकरणी आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
 

सैदुलने बांगलादेशात आपले एजंट नेमले होते. हे एजंट तेथील अल्पवयीन मुलींना कधी नोकरीचे आमिष दाखवून तर कधी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना सैदुलकडे आणायचे. सैदुल त्यांना छुप्या मार्गाने बांगलादेशातून भारतात आणायचा. त्यांनतर त्यांना भारतातील विविध भागात विकले जायचे. मुलगी अल्पवयीन असेल तर तिच्या बदल्यात १ लाख रुपये घेतले जायचे. इतर तरुणींचा सौदा ५० ते ६० हजारांत व्हायचा. तसेच कुंटणखान्यात पाठवलेल्या काही मुलींच्या मोबदल्यात त्याला दरमहा ५ हजार रुपये मिळायचे.

 

गेल्यावर्षी एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यात त्यांनी चार मुलींची सुटका केली होती. या मुली बांगलादेशी होत्या. त्यावरून हा प्रकार उघडकीस आला. गेल्या वर्षभरापासून पोलिस सैदुलचा तपास करत होते. अखेर वसईच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना सैदुल शेख याला अटक करण्यात यश आले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0