गणेशोत्सवासाठी जिल्ह्यातील सर्व पालिका सज्ज

07 Sep 2018 22:14:11




ठाणे : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका सज्ज झाल्या आहेत. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजविण्यात आले पाहिजेत, असे सांगताना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सवाला गालबोट लागणार नाही याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घेण्याचे निर्देश दिले. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर म्हणाले.

 

गणेशोत्सवापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या कायदा सुव्यवस्थाविषयक बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, तसेच कल्याण-डोंबिवली पालिका आयुक्त गोविंद बोडके, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आयुक्त मनोहर हिरे, मीरा-भाईंदर पालिका आयुक्त बालाजी खतगावकर, उल्हासनगर पालिका आयुक्त गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील आदींची उपस्थिती होती. दरम्यान, गणेशोत्सव, मोहरम हे सण एकाच कालावधीत येत असून पोलीस तसेच इतर यंत्रणांनी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी. हे दोन्ही सण जिल्ह्यात नेहमी शांततेत व एकोप्याने पार पडले आहेत, तसे याहीवर्षी व्हावे. वीज मंडळाच्या अधिकाऱ्या नी या सणांच्या काळात वीज खंडित होणार नाही याची पुरेपूर दक्षता घ्यावी असे निर्देशही पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले.

Powered By Sangraha 9.0