अंबरनाथमध्ये कंपनीच्या जेवणातून विषबाधा

07 Sep 2018 16:12:15



आठ कर्मचारी खासगी रुग्णालयात दाखल


अंबरनाथ : कंपनीच्या जेवणातून कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ आनंद नगर औद्योगिक वसाहतीमधील 'व्हर्टीव्ह एनर्जी प्रा. लिमिटेड या कंपनीत हा प्रकार घडला आहे. आठ कर्मचारी सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असून दहा कर्मचाऱ्यांना उपचार करून घरी सोडून देण्यात आले आहे. रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.

 

अंबरनाथच्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीमध्ये ही कंपनी असून या कंपनीत जवळपास ६०० कामगार काम करतात. या कामगारांना कंपनीच्या कँटीनमध्ये जेवण दिलं जातं. काल (६) दुपारी जेवल्यानंतर अचानक यातील १८ लोकांना उलट्या, जुलाब आणि पोट दुखण्याचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने कंपनीत प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. त्यातील दहा जणांना उपचार करून घरी सोडून देण्यात आले तर आठ जणांना येथील संजीवन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

हा प्रकार अन्नातून किंवा पाण्यातून जंतुसंसर्ग झाला असल्याचं संजीवनी रुग्णालयाचे डॉ. हेमंत चिटणीस यांनी सांगितले. असा जंतू संसर्ग कोणालाही कुठेही होत असतो. अन्नातून विष आले असे म्हणता येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. काल सायंकाळी साडेसात ते नऊ या कालावधीत हे रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नाही असेही डॉ. हेमंत चिटणीस यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0