नवी दिल्ली : केंद्र सरकारने जगातील सर्वात मोठी आर्थिक व्यवहार करण्याची यंत्रणा असलेली जनधन योजनेबाबत बुधवारी दि. ६ रोजी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. या योजनेतून मिळणारे लाभ आता दुप्पट केले जाणार आहेत. या खात्यार्तंगत मिळणार्या विम्याची रक्कम ही दुप्पट केली जाणार आहे, त्यासह ओव्हर ड्राफ्टची (ओडी) मर्यादा दुप्पट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दि. ५ रोजी नवी दिल्लीत आयोजित केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री जन धन योजनेतील बदलांसह, योजना पुढे सुरू ठेवायला मंजुरी देण्यात आली आहे.
या योजनेत काही मुलभूत बदल करण्यात आले आहेत. दि. १४ ऑगस्ट नंतरही वित्तीय समावेशनासाठी ‘प्रधानमंत्री जनधन योजना’ चालू राहणार आहे. सध्याच्या ओव्हर ड्राफ्ट मर्यादेत पाच हजार रुपयांवरून दहा हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या योजनेत दोन हजार रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्टला कोणतीही अट लागू होत नाही. ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेण्याच्या वयोमर्यादेत १८ ते ६० वर्षांवरून १८ ते ६५ वर्षे असा बदल करण्यात आला आहे. प्रत्येक घरातील प्रत्येक प्रौढाला संरक्षण देण्याच्या दृष्टीने २८ ऑगस्ट २०१८ नंतर प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते सुरू करणार्या रुपये कार्ड धारकांना दिल्या जाणार्या अपघात विमा संरक्षणात १ लाख रुपयांवरुन २ लाख रुपयांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.
ही योजना सुरू राहणार असल्याने देशातील प्रत्येक घरातील प्रत्येक प्रौढाचे बँक खाते उघडले जाईल, असा केंद्र सरकारचा विश्वास आहे. याद्वारे त्यांना इतर वित्तीय सेवा, सामाजिक सुरक्षा योजना आणि दहा हजार रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेता येईल. त्यामुळे अशा सर्व नागरिकांना वित्तीय सेवांच्या मुख्य प्रवाहात आणणे शक्य होईल तसेच विविध सवलत योजनांचे लाभ, संबंधित लाभार्थींच्या खाती थेट हस्तांतरीत करता येतील.
प्रधानमंत्री जनधन योजनेची वैशिष्ट्ये
* ३२ कोटी ४१ लाख जनधन बँक खाती
* ८१ हजार २०० कोटी रुपयांच्या ठेवी
* ५३ टक्के महिला खातेधारक
* ८३ टक्क्यांहून अधिक सक्रीय जनधन खाती
* २४ कोटी ४ लाख रुपे कार्डधारक
* ७.५ कोटींहून अधिक खातेधारकांचे थेट हस्तांतरण
* दीड हजार घरांपर्यंत बँकींग सेवा
* प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेतून १३ कोटी ९८ लाख सदस्यांचे ३८८.७२ कोटी रुपयांचे दावे निकाली
* प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेच्या ५.४७ कोटी सदस्यांचे २२०६.२८ कोटी रुपये मूल्याचे १.१० लाख दावे निकाली
* १ कोटी ११ लाख अटल पेन्शन योजनेचे सदस्य
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/