कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी !

06 Sep 2018 17:16:38



 

 

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच बाप्पाच्या दर्शनासाठी कोकणात आपापल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना राज्य सरकारने आनंदवार्ता दिली आहे. मुंबईतून कोकणाकडे जाणाऱ्या गाड्यांना दि. ११ ते १४ सप्टेंबरदरम्यान टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतले आहे. यामुळे प्रवासातील खर्चात बचत होणार असून टोलदरम्यान होणारी वाहतूककोंडीदेखील टळू शकणार आहे.
 

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. कोकणातून मुंबईत येऊन स्थानिक झालेले हजारो, लाखो ‘चाकरमानी’ प्रतिवर्षी गणेशोत्सवानिमित्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांतील आपल्या मूळ गावी जातात. रेल्वे, एसटी व खासगी बसेससह स्वतःचे वा खासगी वाहन घेऊन हा प्रवास करणाऱ्यांचीही संख्या यावेळी मोठी असते. मुंबई-गोवा महामार्गासह हल्ली कित्येकजण मुंबई-पुणे-बंगळूरू महामार्गाने जाऊन कराड, कोल्हापूर आदी ठिकाणांहून कोकणात उतरणे पसंत करतात. यामुळे अलीकडे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरही गणेशोत्सव काळात अभूतपूर्व वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे हा टोल माफ करण्याचा निर्णय ही वाहतूककोंडी नियंत्रणात आणण्यासाठी उपयोगी ठरणार असून प्रवाशांचा खर्चही मोठ्या प्रमाणावर वाचू शकणार आहे. दि. ११ ते १४ सप्टेंबर या काळात कोकणाकडे जाणाऱ्या मार्गांवर छोट्या चारचाकी गाड्यांना टोलमधून वगळण्यात आले असून प्रवाशांना कोल्हापूर मार्गेही ‘टोल-फ्री’ प्रवास करता येणार आहे.

 

गणेशोत्सवासाठी कोकणात पुणे व कोल्हापूरमार्गे जाणाऱ्या वाहनांना दि. १० ते १३ सप्टेंबर या काळात व त्याच वाहनांना गणेश विसर्जनानंतर दि. २३ सप्टेंबरपर्यंत पथकर नाक्यावर पथकरातून सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत एसटी बसेसनाही लागू असेल. कोकणात जाणाऱ्या वाहनांना गणेशोत्सव-२०१८ कोकण दर्शनअसे लिहिलेले स्टिकर्स पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येतील. मुंबई प्रवेशद्वारापाशी वाशी पथकर नाक्यावरही पथकरातून सवलत देण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याखेरीज या चाकरमान्यांचा परतीचा प्रवासदेखील टोलमुक्तच असणार असल्याचेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0