गुरू, गुरुजी, शिक्षक, मास्तर...

    दिनांक  05-Sep-2018   


 
 
 
 
जो आपल्याला शाळा-कॉलेजला शिकवितो तो आपला गुरूच असतो, असे अजीबातच नाही. खरेतर क्रमिक अभ्यासक्रम शिकविण्याचे काम ज्यांनी मासिक मोबदल्यात स्वीकारलेले असते ते काही गुरू नसतातच. आता तर ती सेवा नाही, पेशा नाही, तर नोकरी झालेली आहे. त्यात वाईट असे काहीच नाही. आपल्या नोकरीच्या कर्तव्याशीही अनेक जण प्रामाणिक असतात. जे बेईमान असतात त्यांना बोल लावण्यात काही अर्थ नाही. अगदी शिक्षक असूनही असा वागतो, असे म्हणत उगाच त्यांची असभ्य अशी संभावना करण्यातही काही अर्थ नाही. तीही आपल्यासारखीच माणसे असतात. आपण व्यवसाय करतो, कारकुनी करतो, अगदी कलावंतही असतो... पण, प्रत्येकाचे पाय मातीचेच असतात आणि ही माती कुणालाच टाळता येत नाही. शिक्षकाची नोकरी स्वीकारली म्हणून त्यांचे पाय चंदनाचेच असावेत, अशी अपेक्षाही भंपक आहे. तुम्ही जसे असाल तसेच तुमचे समाजजनही असतील, हे वास्तव आहे.
 
 
एक मात्र नक्की की, शिक्षकांचा गुरू होण्याचा प्रवास अगदी सहज सुरू होऊ शकतो. ते त्या वाटेवर असतात तसं गुरू आणि आई या व्यक्ती नाहीतच. त्या समष्टी आहेत. त्या कुठेही आणि कशाही, कुणाच्याही रूपात प्रकट होऊ शकतात. गोठ्यातच बाळंत झाल्यावर पान्हाही फुटत नसताना गोठ्यातल्या गायीला त्या नवजात अर्भकाच्या भुकेल्या टाहोने पान्हा फुटल्याच्या उदाहरणांचे आपण चष्मदीद की काय म्हणतात तसे गवाह आहोत. अगदी पहिल्या वर्गापासून अनेक शिक्षक, शिक्षिका प्रत्येकाच्याच वाट्याला येतात. त्यातल्या काहींचे तर स्मरणही राहात नाही. स्मरणात तेच राहतात जे शिक्षकाचे काम करताना कधीकधी गुरू होतात. पहिल्या वर्गात पांढरकवड्याला असताना आमचे मनोहर बडे सर होते. पहिली ते चौथी आम्हाला शिकवायला होते. उंच, सडपातळ.
 
 
धोतर, टोपी, मनिला, त्याला मोठा खिसा अन् त्याला लावलेला पेन... बडे सर असे आठवतात. आखाडा वार्डात राहायचे सर. त्यांचे विटा-सिमेंटचे घर नव्हते. शाळेत जाताना त्यांच्या विद्यार्थ्यांना हाका देत जायचे. त्या काळात पटसंख्येची अशी काही आजच्यासारखी भानगड नव्हती. विद्यार्थ्यांची चणचण नव्हती अन् विद्यादानाची वानवाही नव्हती. सर मात्र सार्यांच्या आधी शाळेत पोहोचलेले असायचे. थंडी, ऊन, पाऊस काहीही असले तरीही बडे सर साडेपाचला शाळेला निघालेले असायचे. शाळा सातची असायची. म्हणजे प्रार्थना सात वाजता व्हायची. सर शाळेच्या शिपायाकडून सारी शाळा नीट स्वच्छ करून घ्यायचे... शाळेचा अखेरचा तास म्हणजे प्राण लावून कान शिपायाच्या अखेरच्या घंटीगजराकडे असायचे. त्या वेळी बडे सर कविता शिकवीत असायचे. ‘बालभारती’तल्या कवितांना त्यांनी त्यांच्या चाली लावलेल्या होत्या. कमालीच्या जिवंत व्हायच्या कविता त्यांच्या म्हणण्यातून. ‘धरू नका ही बरे, फुलांवर उडती फुलपाखरे’ ही कविता म्हणता म्हणता ते वर्गातील, खेडेगावातून येणार्या विद्यार्थ्यांच्या दफ्तरातून सोनपाखरं काढायचे अन् मग अत्यंत गहिवरत्या स्वरात विचारायचे, ‘‘यांनी काय बिघडवले होते ते तुझे? तुला असा डबीत कोंडून ठेवला तर कसे वाटेल?’’ अभ्यासक्रमाच्या काळ्या अक्षरांच्या धवल अवकाशात जे अव्यक्ताच्या पातळीवर असायचे ते बडे सर आम्हाला सगुण-साकार करून दाखवायचे. ‘अरूपाचे रूप दावीन मी’ हा ज्ञानेश्वरमाउलींचा दावा ते खरा करून दाखवायचे. शिक्षकाचे कर्तव्य बजावताना रोजच ते असे गुरू व्हायचे.
 
 
एकदा शाळेत टिळकांची जयंती होती. कुणीतरी विद्यार्थ्याने भाषण द्यावे, असे सरांना वाटत होते. कुणीच नावे दिली नाहीत. सर मला म्हणाले, ‘‘तू दे भाषण...’’ घाबरलेला पाहून ते म्हणाले, ‘‘तू देऊ शकतोस. चांगला बोलतोस तू. कारण अनेकदा तू वर्गात गोष्टी सांगत असतोस अन् त्या मी ऐकत असतो...’’ सर वर्गात नसताना कधीमधी मी त्यांची नक्कल करायचो. ती त्यांनी पाहिली होती. मी त्या दिवशी ऐनवेळी टिळकांवर बोललो अन् मग आत्मविश्वास आला. कधीच केले नाही, त्याची कधीतरी सुरुवात होत असते, हे गुरुतत्त्व त्या दिवशी त्यांनी मला दिले...
 
 
आमच्या अयाचित बाई होत्या. पाचव्या वर्गापासून आठव्या वर्गापर्यंत मराठी शिकवीत होत्या. खूपच मायाळू बाई. ताडउमरीची काही पाडावरची मुलं आमच्या शाळेत होती. सणवारीच त्यांच्या घरी गव्हाच्या पोळ्या व्हायच्या. बाई म्हणाल्या होत्या, ‘‘अरे, आपल्याकडे सणाला पुरणपोळ्या होतात अन् त्यांच्याकडे त्या दिवशी पक्वान्न म्हणून गव्हाच्या पोळ्या होतात...’’ बाई त्या मुलांसाठी रोज डबा आणायच्या. शिकविताना तल्लीन व्हायच्या. त्यांच्या चेहर्यावर पाझरणारे ते सारेच भाव विलक्षण जिवंत असायचे. ते न्याहाळताना बर्याचदा शब्द हरवून जायचे अन् त्यांचा भावार्थाने डबडबलेला चेहराच काय तो लक्षात राहायचा. ताडउमरीच्या त्या मुलांना जेवू घालताना त्यांच्या चेहर्यावरची स्नेहमय कृतार्थता मी अनेकदा टिपली होती. त्यावर एकदा मी लिहून काढले. ते टिपण त्यांना एका माझ्याच मित्राने मुद्दाम दाखविले. त्याचा उद्देश हाच की, कधीकधी बाई कान पिरगाळायच्या द्वाड मुलांचा. त्या माझाही कान लाल करतील... बाईंनी ते वाचले अन् त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू ओघळू लागले. आपल्या समोर आरसा धरतो, तो गुरू असतो. बाई त्या अर्थाने गुरू झाल्या होत्या.आमचे शेख सर होते. ठेंगणे, काळेसे. अंगापिंडाने दणकट. कधी पहिलवान असावेत. हिंदी शिकवायला होते, आठवी ते दहावी.
 
 
हिंदीतल्या अनेक चांगल्या लेखकांची पुस्तके ते विद्यार्थ्यांना वाचायला देत. ज्यांचा धडा आहे त्यांची पुस्तके हमखास देत. दहावीला त्यांनी मण्टो वाचायला दिला होता. ‘‘त्यांच्या कथा वाचताना जे नाही कळले ते सोडून दे, कारण ते कळावे असे तुझे वय नाही.’’ ही टीपही दिली. लाडका विद्यार्थी होतो मी त्यांचा. एकदा वर्गात ते शिकवीत असताना त्यांना कुणी भेटायला आले होते. त्यांच्या समोर त्यांनी वर्गात एक प्रश्न विचारला. कुणीच हात वर केला नाही उत्तरासाठी. त्यांनी माझ्याकडे पाहिले. मी बसल्या जागेवरूनच उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘खडे रहो!’’ आवाज दरडावल्यागत होता. मी उभा राहिलो. त्यांनी खाडकन् कानाखाली वाजविली. ‘‘क्लासमे सवाल पुछा जाए तो खडे रहके बात करना... जबतक बैठनेको नही कहा जाए तबतक बैठना नही... अदब की बात हैं.’’ असे म्हणाले. डबडबलेले माझे डोळे स्वत:च्या रुमालाने पुसत म्हणाले, ‘‘मारना नही था तुम्हे...’’ व्यक्त शब्दांच्या पलीकडे ते व्यक्त झाले होते अन् गुरू झाले होते.
आमच्या लतडे बाई होत्या. जाड भिंगाचा चष्मा होता त्यांचा. रोडच होत्या. कृश म्हणाव्या इतक्या रोड. बांबूला साडी गुंडाळल्यागत वाटायच्या. गणित शिकवायच्या सातवीला. पाढे पाठ करण्यासाठी खूप रागवायच्या. ‘‘गणित तुझा विषय नाही पेठकर!’’ असे म्हणायच्या त्या वेळी, माझा विषय नेमका काय आहे, याचा शोध त्या घेत असल्यागत वाटायचे. एकदा दोन-तीन दिवस मी शाळेतच गेलो नाही. त्यांनी मला त्याबद्दल जाब विचारला. मी त्यांना सिमिंग्ली नॅच्यरलस्टिक पद्धतीने सांगत सुटलो. सकाळी घरची सारीच कामे असल्याने आलो नाही... त्यांचे डोळे विस्फारले. कामे म्हणजे? मग काय सांगायचे? भांडी घासतो. धुणी धुतो, फरशा पुसतो... आणि काय काय. घाबरल्याने रडायलाही आले होते. त्यांनी जवळ घेतले. म्हणाल्या, ‘‘मला माहिती नव्हते, तुझी आई सावत्र आहे...’’ नंतर आमच्याच कडे हळदीकुंकवाला आल्या असताना त्यांना खरा प्रकार कळला. आई चिडली. वडील रागावले. बाई म्हणाल्या, ‘‘चूक झालीय् त्याच्याकडून, मात्र माझेही चुकलेच ना... त्याला खोटं बोलायला मीच उद्युक्त केले... अन् बघा ना, त्याने किती खरे वाटावे असा अभिनय केला. अभिनय करताना मनात काय भाव असावेत, यावरही बोलल्या. पुढे ‘थँक्यू मिस्टर ग्लाड’मधला गफ्फूर करताना बाई आठवल्या. अभिनयाचे पदक स्वीकारताना जाणवले, लुतडे बाई आपल्या या क्षेत्रातल्या गुरू आहेत!