नेट परीक्षाही होणार ऑनलाईन

05 Sep 2018 12:40:00




पुणे: वरिष्ठ महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) घेतली जाते. हि परीक्षा आता ऑनलाईन स्वरूपात घेतली जाणार आहे. नेट ही परीक्षा पूर्वी माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएससी) घेतली जात होती, मात्र आता ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेतली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही मनुष्यबळ विकास मंत्रालयाची स्वायत्त संस्था आहे.

 

नेट परीक्षेसाठी अर्ज भरण्याची मुदत १ सप्टेंबरपासून सुरु झाली असून त्याची अंतिम मुदत ही ३१ सप्टेंबरपर्यंत आहे. या परीक्षेमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि जुनिअर रिसर्च फेलोशिप या दोन्ही पदांचा समावेश आहे. ९ डिसेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल, असे एनटीएतर्फे सांगण्यात आले आहे.

 

काही महिन्यांपूर्वी, विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे नेट परीक्षेच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात आले होते. त्यानुसार ३५० गुणांसाठीच्या ३ पपेरचे रूपांतर दोन पपेरमध्ये करण्यात आले आहे. त्यानुसार पहिला पेपर १०० गुणांचा, तर दुसरा पेपर २०० गुणांचा असेल. पूर्वी ही परीक्षा एकाच दिवसामध्ये घेण्यात येत होती. मात्र आता ही परीक्षा पंधरा दिवसांमध्ये दोन सत्रांमध्ये घेण्यात येईल. दोन सत्रांमध्ये होणाऱ्या या परीक्षेत सकाळच्या सत्रात सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत १०० गुणांचा पहिला पेपर तर सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत २०० गुणांचा दुसरा पेपर घेण्यात येईल. दुपारच्या सत्रात दुपारी दोन ते तीन पहिला पेपर व साडेतीन ते साडेपाच या वेळेत दुसरा पेपर घेतला जाईल. या परीक्षेसाठी खुल्या वर्गासाठी ८०० रुपये, ओबीसी वर्गासाठी ४०० रुपये, एससी आणि एसटी वर्गासाठी २०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. या संदर्भातील अधिक माहितीसाठी 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी'च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0