जगण्यासाठी संघर्षापेक्षा शिकणे महत्त्वाचे

    दिनांक  04-Sep-2018   

 

 
 
 
मुंबई महानगरातील पालिकेच्या 1 हजार 214 शाळांमध्ये एग्माटेल कंपनीच्या माध्यमातून डिजिटल प्रक्रिया प्रमुख शेखर खैरमोडे काम पाहतात. त्यांच्या शून्यातून निर्माण झालेल्या अस्तित्वाविषयी...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
इयत्ता आठवीत शिकत असलेल्या शेखरला घरातून सांगितले गेले की, “घरातील जबाबदारीला हातभार लाव. शिकूनबिकून कोणाचं भलं झालयं?” परिस्थिती तशीच होती. कांदिवलीच्या पोयसरमध्ये दहा बाय दहाच्या घरामध्ये शेखरचे वडील राजेंद्र, आई पुष्पा, भाऊ, चार काका, दोन आत्या राहत असत. शेखरचे वडील रेल्वेमध्ये चतुर्थ श्रेणी कामगार. त्यामुळे घरात कायम आर्थिक ओढाताण. शेखर कायम छोटीमोठी कामे करून शिकू लागला. केटरींग दुकानात वेटर म्हणून काम कर, इतर काही उचलपाचल कर, अशी कामे करून पुढे कसेबसे दहावी पास झाले. भाकरीचा चंद्र शोधण्याच्या नादात दिवस जात होते. सुट्टीमध्ये ते एका पेपरप्रेसमध्ये कामाला जाऊ लागले. रात्री 10 ते सकाळी 4 पर्यंत तिथे काम करत असताना पहिल्यांदा शेखरला जाणवले की, आयुष्यात कष्ट महत्त्वाचे आहेत. पण, कष्टासोबत शैक्षणिक गुणवत्ताही महत्त्वाची असते.
 

शेखरने अकरावी वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. अकरावीचा निकाल लागला. पण त्यांना निकाल मिळाला नाही. कारण, त्यांनी कॉलेजची फी पूर्ण भरली नव्हती. त्यामुळे गुणपत्रक मिळाले नाही. त्या दिवशी शेखर खूप रडले. आईने कुठूनतरी व्याजावर कर्ज काढले आणि महाविद्यालयाची फी भरली. त्यानंतर खूप खटाटोप करून शेखरने जातप्रमाणपत्र काढले. पुढे काम करता करता बी.कॉम झाले. शेखरने ठरवले की, नोकरी करता करता स्पर्धा परीक्षा द्याव्यात. तयारीसाठी पुण्याला जायचे. परंतु, घरातल्यांनी, शेजाऱ्यांनी सांगितले की, “तुझ्या वयाचे पुरुष घर सांभाळतात. तुला काय म्हातारे होईपर्यंत शिकायचे आहे का?” पण, शेखर ठरल्याप्रमाणे स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याला गेले. पण, संपर्क कमी आणि त्यात नवीन शहर. कित्येक दिवस तर बिस्कीटांवर राहावे लागले. सर्वच आघाड्यांवर प्रतिकूल परिस्थिती होती. शेखरला उमजून आले की, केवळ नुसती स्वप्न पाहून ती पूर्ण होत नसतात, तर स्वप्नांना अनुकूल परिस्थिती तयार केल्यावरच स्वप्न पूर्ण होतात.

 

आर्थिक स्थैर्य येण्यासाठी, त्यांनी मग इतर परीक्षा द्यायला सुरुवात केली. पीएसआयची लेखी परीक्षा ते उत्तीर्ण झाले, पण मैदानी चाचणीत त्यांना यश मिळाले नाही. हाती आलेली नोकरी गेली. तरीही शेखरनी प्रयत्न सुरू ठेवले. रेल्वेची स्टेशन मास्तर ग्रेडची परीक्षा उत्तीर्ण झाले. दिवस पालटतील म्हणून घरात, समाजात, चाळीत आनंदीआनंद झाला. मेडिकल झाले की, कामाला रूजू व्हायचे होते. मेडिकल झाली आणि रिपोर्ट आला. मात्र, तो धक्कादायक होता. शेखर यांना रंगांधळेपणा आहे. ते रंग ओळखू शकत नाहीत. शेखरची नोकरीची आशा मावळली. त्यातही शेखरच्या मनाला एक गोष्ट खूप लागली की, ‘रंग ओळखू शकत नाही, हे मला समजायलाही कधी वेळच मिळाला नाही.’

 

‘आपल्याच नशिबी असे का? सगळे सोडावे आणि जीव द्यावा का?’ पण, योगायोग म्हणा की आणखी काही, शेखरला एमपीएसी परीक्षेसाठी वाचलेले स्वातंत्र्यवीर सावरकरांचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र आठवले. सावरकरांना जन्मठेप झाली होती, तीसुद्धा काळ्यापाण्याची. पण त्याही परिस्थितीत त्यांनी आशावाद सोडला नाही. बाबासाहेबांना तर इतके शिकूनही बडोद्याला एका शिपायाने पाणी नाकारले. तरीही ते थांबले नाहीत. त्यांनी क्रांती केली. शेखरना वाटले, इतक्या प्रतिकूल, संपलेल्या क्षणांत या थोरांनी इतके मोठे कार्य केले. ‘मला तर स्वातंत्र्य आहे. मी काही तरी करायला हवे.’ त्याक्षणी शेखर पुण्याहून पुन्हा मुंबईला आले. शाळेत नोकरीला लागले.

 

इथेच शेखर यांना आयुष्याचा अर्थ गवसला. समाजातील अत्यंत निम्नस्तरातून येणारे विद्यार्थी. त्यांच्यामध्ये शेखरना त्यांचे दु:ख दिसले. ते 2014 साल होते. दामुनगर वनखात्याच्या अखत्यारीतील जागेवर झोपड्यांत राहणारी मुले. झोपड्यांमध्ये आजही वीज नाही. त्यामुळे या मुलांसाठी त्यांनी रात्री अभ्यासिका सुरू केली. गरीब विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम सुरू केले. लोक त्यांच्याकडे इतरही समस्या घेऊन येऊ लागले. आतापर्यंत शेखरची आर्थिक घडी बसली होती. लोकांचे प्रश्न मार्गी लागावे म्हणून शेखरने एलएलबी केले. गरीबांना कायद्याची मदत विनाशुल्क मिळू लागली. पुढे महानगरपालिकेच्या शाळांचे संगणीकरण होत असताना शेखर स्वत:हून पुढाकार घेऊ लागले. महानगरपालिकेच्या शिक्षणव्यवस्थेत बदल होत होता. संगणक प्रणाली शाळांमध्ये बसवण्यासाठी महानगरपालिकेने निविदा प्रक्रियेद्वारे एका कंपनीला काम दिले. अर्थातच, त्या कंपनीला मुंबईच्या महानगरपालिकेच्या वस्तीपातळीवरील शाळांचे समन्वयक म्हणून शेखर खैरमोडे योग्य व्यक्ती वाटली. फी भरली नाही म्हणून निकाल मिळत नव्हता, त्यामुळे रडणारा शेखर नावाचा मुलगा आज महानगरपालिकेच्या 1 हजार 214 शाळांचा संगणकीय व्यवस्थापक झाला आहे. याबद्दल बी.कॉम, एम.ए, इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि एलएल.बी, मास्टर इन फोटोग्राफीसह विविध छोटे मोठे कोर्सेस शिकलेले शेखर म्हणतात, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा.’ पण ‘शिका’ हा मंत्र विसरून फक्त संघर्षाकडे आम्ही वळलोय की काय असे चित्र आहे? जिथपर्यंत मी पोहोचेन तिथपर्यंत समाजाला पुन्हा बाबासाहेबांनी सांगितलेल्या ‘शिका’ या मूलमंत्राकडे वळवळे, हेच माझे ध्येय आहे. कारण जगण्यासाठी संघर्षापेक्षा शिकणे महत्त्वाचे आहे.”

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/