शांत झोप आवश्यकच!

    दिनांक  04-Sep-2018   


 


रात्री पाच तास वा त्यापेक्षा कमी वेळ झोपणाऱ्या पुरुषांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, आळस आणि निद्रानाशाची समस्या आहे. या अभ्यासातून हे स्पष्ट होते की, झोप ही आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे आणि पुरेशी झोप न घेणे हे आपल्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

 

नवी आयुष्यात झोपेचे महत्त्व किती आहे, हे आपल्याकडील आयुर्वेदापासून ते आधुनिक वैद्यकशास्त्रापर्यंत सर्वांनीच वेळोवेळी सांगितले आहे. आधुनिक काळातील धकाधकीच्या जीवनात मात्र झोपेपेक्षा अन्य कामे वाढली आणि माणसाचे झोपेकडे दुर्लक्ष होऊ लागले म्हणजे माणूस झोप घेतो नाही असे नाही, पण नैसर्गिकरित्या जितकी झोप आणि ज्यावेळी आवश्यक असते तशी तो घेत नाही. त्यामागे निश्चित अशी कारणे आहेतच, जसे की, दिवसरात्र चालणाऱ्या कंपन्यांमुळे शिफ्ट ड्युटी, मोबाईल-कॉम्प्युटर-टीव्ही, रात्रीच आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्या आदी अनेक कारणांमुळे माणूस आता जवळपास निम्मी रात्र सरल्यावरच झोपू लागला, तर बऱ्याचदा अशीही वेळ आली की, मध्यरात्री कधीतरी झोपलेला माणूस पुन्हा लगोलग तीन-चार तासानंतर उठूही लागला. एकतर रात्रीची झोप मध्यरात्रीनंतर सुरू झाली आणि नंतर पुन्हा झोपेचा काळही कमी झाला. यामुळे माणसाला कित्येक व्याधींनाही सामोरे जावे लागले.

 

आधुनिक काळात तर मानवी झोप, अपुरी झोप, अवेळी झोप या कारणांमुळे होणाऱ्या आजार, विकारांवर कितीतरी संशोधकांनी संशोधन केले असून त्याचा अहवालही प्रकाशित केला आहे. नुकत्याच झोपेसंबंधी केलेल्या एका संशोधनानुसार रात्री कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात धोक्याची घंटा वाजण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाच तासांपेक्षा कमी वेळ झोप घेणाऱ्या प्रौढ पुरुषांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका दुपटीने वाढतो, असे या संशोधनात म्हटले आहे. वरील निष्कर्षावरून हे सिद्ध होते की, मानवी आयुष्यात झोप किती महत्त्वाची आहे. झोपेचे महत्त्व ते किती असेल? माणसाला जिवंत राहण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी योग्य प्रमाणात अन्नाची जितकी गरज असते, तितकीच झोपेचीही गरज असते. अतिजास्त अन्न खाल्ले आणि सोबतच अतिजास्त झोपही घेतली तर माणूस जाडजूड, स्थूल होतो. पण अतिकमी प्रमाणात अन्न खाल्ले आणि अतिकमी झोप घेतली तर माणूस अशक्त, कृश होतो. अतिजास्त प्रमाणात झोपणे किंवा अतिकमी प्रमाणात झोपणे किंवा वेळी-अवेळी झोपणे, या सर्वच सवयी मानवी आयुष्याची हानी करणाऱ्या एखाद्या काळरात्रीसारख्याच आहेत. म्हणून उत्तम आरोग्य आणि आयुष्याची इच्छा धरणाऱ्या माणसाने या गोष्टी टाळायलाच हव्यात.

 

झोप आणि त्याच्यासंबंधीचे वरील संशोधन नुकतेच झाले असून याआधी केलेल्या अभ्यासात कमी झोपेमुळे प्रौढ पुरुषांना हृदयविकाराच्या झटक्याचा धोका दुपटीने अधिक असतो, या निष्कर्षाला पुष्टी मिळाली नव्हती किंवा कमी झोपेचा याच्याशी काही संबंध असेल, असेही समोर आले नव्हते. आता मात्र नव्या संशोधनात ५० वर्षे वयाच्या पुरुषांना यासंबंधीचा धोका कितपत आहे, त्याचा अभ्यास करण्यात आला. स्वीडनमधील गोथेनबर्ग विद्यापीठाच्या मोआ बेंगटसन यांनी याबाबत सांगितले की, “आपल्या कामात अतिशय व्यस्त राहणाऱ्या लोकांसाठी कदाचित झोप घेणे ही वेळेचा अपव्यय करण्याजोगी गोष्ट असू शकते, पण आमच्या अभ्यासानुसार कमी झोप घेणाऱ्या लोकांना भविष्यात हृदयविकार होण्याचा धोका अधिक असतो, हे स्पष्ट झाले आहे.” १९९३ साली या अभ्यासात भाग घेण्यासाठी १९४३ मध्ये जन्मलेल्या आणि गोथेनबर्गमध्ये राहणाऱ्या पुरुषांच्या ५० टक्के संख्येला निवडले गेले होते. यासंबंधीचे संशोधन करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या १४६३ लोकांपैकी ७९८ (५५ टक्के) लोकांनी या अभ्यासात भाग घेण्याचे मान्य केले. जवळपास २१ वर्षे या लोकांच्या रोजच्या झोपेच्या कालावधीचे, वेळेचे अध्ययन करण्यात आले. या काळात या लोकांना चार गटांमध्ये विभागण्यात आले होते. पाच तासांपेक्षा कमी, सहा तास, सात ते आठ तास आणि आठ तासांपेक्षा जास्त झोप घेणाऱ्यांचा यात अभ्यास करण्यात आला. ७९८ पैकी अखेरपर्यंत ७५९ लोक टिकले व त्यानंतर काही निष्कर्ष काढण्यात आले. या अभ्यासात अशी माहिती समोर आली की, रात्री पाच तास वा त्यापेक्षा कमी वेळ झोपणाऱ्या पुरुषांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थूलता, आळस आणि निद्रानाशाची समस्या आहे. या अभ्यासातून हे स्पष्ट होते की, झोप ही आपल्यासाठी अतिशय आवश्यक आहे आणि पुरेशी झोप न घेणे हे आपल्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/