सुवर्णपदकाची गुरूदक्षिणा!

    दिनांक  04-Sep-2018   


 

 

आज शिक्षक दिन, त्यानिमित्ताने एका मराठमोळ्या प्रशिक्षकाने आशियाई स्पर्धेत इराणच्या महिला कबड्डी संघाला मिळवून दिलेल्या सुवर्णपदकाची कहाणी...

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

गुरूसाक्षात परब्रह्म’ असं आपण म्हणतो. कारण, आपल्या पुराणांमध्ये, कहाण्यांमध्ये गुरूला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला सर्वोच्च स्थान दिले जाते, ते काही उगाच नाही. गुरू-शिष्याच्या असंख्य कथा आपण सगळेच लहानपणापासून ऐकत आलो आहोत. अशाच एका मराठमोळ्या गुरूने आपले शिष्यांबरोबरचे नाते ‘सुवर्णमय’ केले.

 

आशियाई स्पर्धांची सांगता आणि भारतानं केलेली पदकांची कमाई याची चर्चा सर्वत्र होत असताना, एका मराठमोळ्या गुरूंचं नाव सगळीकडे गाजलं ते वेगळ्या कारणासाठी. ‘शैलजा धोपडे-जैन’ हे त्यांचं नावं. कदाचित याआधी आपण हे नाव ऐकलं असेलसुद्धा किंवा नसेल; पण या नावाने एका देशातील महिलांना ‘सुवर्णविजया’ची चव चाखायला लावली. तो देश म्हणजे ‘इराण.’ एका बंदीस्त चौकटीत राहणं, हेच काय ते इथल्या महिलांच्या नशिबी. पण काळाने इथली ही परिस्थिती बदलली आणि यावर्षीच्या आशियाई खेळात कबड्डीत इराणच्या महिलांनी सुवर्णपदक पटकावले. ऐकायला, वाचायला सोप्या वाटणाऱ्या पण तेवढ्याच कठीण अशा या प्रवासात त्यांना गुरू म्हणून लाभल्या त्या ‘शैलजा धोपडे-जैन.’ गेली जवळजवळ दीड वर्ष शैलजा या इराणी महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षका म्हणून कार्यरत आहेत. मूळच्या विदर्भातील असलेल्या शैलजा लग्नानंतर नाशिकमध्ये स्थायिक झाल्या. त्यांच्यासाठी ‘कबड्डी’ हा केवळ खेळ नव्हता, तर त्यांचं जीवन होतं. राष्ट्रीय कबड्डीत त्यांनी विदर्भाचं प्रतिनिधीत्वही केलं. नंतर नाशिकच्या ‘रचना क्लबच्या मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली आणि भारताला भक्ती कुलकर्णी आणि निर्मला भोई यांच्यासारखे अनेक उत्तम खेळाडू दिले. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी कबड्डी प्रशिक्षक म्हणून राज्य शासनाच्या सेवेत रूजू झाल्या खऱ्या , पण त्यांना हवं होतं ते अजूनही त्यांना मिळत नव्हतं. त्यांना भूक होती ती पदकांची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षक म्हणून खेळाडू घडवायची. अखेर त्या राज्य शासनाच्या सेवेतून २०१६ साली निवृत्त झाल्या. त्यांची या खेळाशी नाळ काही तुटली नव्हती. म्हणूनच २०१६ ला त्यांनी केनियासारख्या छोट्या देशातील महिलांना कबड्डीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांना एक दर्जा मिळवून दिला आणि कबड्डीविश्वात ‘शैलजा जैन’ या नावाला प्रसिद्धी मिळाली. याच दरम्यान त्यांना इराणच्या महिलांना प्रशिक्षण देण्याची संधी आली, पण इराणसारख्या देशात आपण काय शिकवणार? तिथे जाऊन करणार काय? असे प्रश्न त्यांना पडू लागले. बुरख्यात राहिलेल्या या महिला खरंच बंधनं झुगारून काही करू शकतील का? अशी शंका त्यांच्या मनात निर्माण झाली. मात्र, त्यांच्या पतीने त्यांना गुरूंचं महत्त्व सांगितलं. “एक चांगला गुरूच शेकडो चांगले विद्यार्थी घडवू शकतो आणि बंधनं मुळासकट उपटून काढायची असतील, तर एका स्त्रीनेच दुसऱ्या स्त्रीला मदत केली पाहिजे,” आपल्या नवऱ्या ने दिलेल्या प्रोत्साहनाच्या बळावर शैलजा यांनी ही जबाबदारी स्वीकारली. पण हा प्रवास सोपा नाही, हे त्यांना माहीत होतं. इराणला पोहोचल्या तेव्हा त्या आपल्या विद्यार्थिनींना भेटल्या. या विद्यार्थींनींनी आपल्या गुरूला एकच सांगितलं की, “आम्हाला सुवर्णपदक मिळवायचे आहे बस्स... रौप्य, कांस्य या पदकांवर आमचा विश्वास नाही,” हे ऐकून शैलजा यांना भरून आलं. कदाचित हीच ती संधी होती, ज्याची त्या वाट पाहत होत्या. बुरखा घातलेल्या त्या मुली फक्त झगडत होत्या, त्या स्वतःच्या अस्तित्वासाठी, सुवर्णपदकासाठी.

 

शैलजांचा योगविद्येला खूपच विश्वास आहे म्हणून त्यांनी खेळाडूंची मनःशांती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी आधी प्राणायाम आणि योगासनं शिकवली. मात्र, इराणमध्ये गेल्या गेल्या त्यांना दोन संकटांना समोर जावं लागलं, एक म्हणजे जेवण आणि दुसरं म्हणजे भाषा. इराणमध्ये पूर्णतः मांसाहारी जेवण. त्यामुळे त्यांनी कित्येक दिवस घरून नेलेल्या लोणची, मेतकूट यांवर काढली आणि भाषेचं म्हणाल, तर इराणमध्ये पर्शियन भाषा सोडून इतर कोणतीही भाषा बोलली किंवा समजली जात नाही. अगदी इंग्रजीसुद्धा नाही. यासाठी शैलजा या आधी पर्शियन भाषा शिकल्या. तरीही त्यांची संकटे संपली नव्हती. इराणच्या महिला कबड्डी संघाला शैलजा याच पहिल्या प्रशिक्षिका असल्यामुळे त्यांना अ,ब,क,ड, पासून कबड्डीतलं सगळं शिकवावं लागलं आणि याचं फळ त्यांना मिळालं जेव्हा त्यांनी याच खेळाडूंची आशियाई स्पर्धातली खेळी पाहिली तेव्हा. उपांत्य फेरीपर्यंत सर्व सामने जिंकल्यानंतर शैलजा यांचं आव्हान वाढलं. इराणचा अंतिम सामना होता भारताशी. ही अशी द्विधा स्थिती निर्माण होईल, याची त्यांना जाणीव होती; पण त्यांच्या शब्दात “अंतिम सामन्यात खेळाडूंपेक्षा मीच घाबरले होते. पोटात गोळा होता पूर्ण वेळ. समोर भारताचे खेळाडू आहेत म्हणून नाही, तर मीच घडवलेले काही खेळाडू आहेत, त्यामुळे मी घाबरले होते.” पण अखेर शैलजा यांच्या प्रयत्नांना यश आलं. कितीतरी वर्षांनी इराणच्या महिलांना आपल्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि शैलजांना आपल्या शिष्यांकडून मिळाली सुवर्णपदकाची गुरूदक्षिणा!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/