वृक्षपूजा : भाग २ अश्वत्थ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Sep-2018   
Total Views |‘अश्वत्थ वृक्ष’ म्हणजे पिंपळाचं झाड. भारतीय संस्कृतीतील पूजनीय वृक्षांमध्ये हा सर्वोच्च स्थानी आहे. ‘अश्वत्थम् जलं अस्य अस्ति, मूले सिक्तत्वात ।’ अर्थात, मुळात शिंपडल्यामुळे ज्याचे पाणी दुसऱ्या दिवशी टिकत नाही असा वृक्ष म्हणजे ‘अश्वत्थ’ होय, अशी या वृक्षाची व्याख्या केली गेली आहे. अश्वत्थाची एक उत्पत्ती तैत्तिरीय ब्राह्मणात दिली आहे ती अशी, एकदा अग्नी देवांपासून निघाला व त्याने अश्वरूप धारण केले. तो त्या स्वरूपात एक संवत्सर अश्वत्थ वृक्षावर राहिला, म्हणून त्या वृक्षाला ‘अश्वत्थ’ म्हणू लागले.

 

‘अश्वत्थ’ म्हणजेच पिंपळाचं झाड. हे वेदपूर्वकाळापासून पूज्य ठरत आलेलं आहे. ऋग्वेदात व वेदोत्तर वाङ्मयात याचे पुष्कळ उल्लेख आढळतात. या वृक्षाला ‘वैबाध’ असंही नाव आहे. कारण हा दुसऱ्या वृक्षांवर आपली मुळे रुजवून मूळ वृक्षाची पाळंमुळं नाहीशी करतो. अश्वत्थाचे ‘पिप्पल’ हे नाव सूत्रवाङ्मयात आढळतं. त्यावरूनच आज त्याचं ‘पिंपळ’ हे नाव प्रचलित झालं असावं. अथर्ववेद आणि छांदोग्य उपनिषदानुसार तिसऱ्या स्वर्गात ‘अश्वत्थ’ हे देवसदन मानलं आहे. वेदपूर्वकाळात भारतात नांदत असलेल्या सिंधू संस्कृतीमध्ये ‘अश्वत्था’ला निर्मितीचं प्रतीक मानलेलं पाहायला मिळतं. तिथे सापडलेल्या एका मुद्रेत एक देवता ‘अश्वत्था’च्या दोन फांद्यांमध्ये उभी असलेली दिसते. दुसऱ्या एका मुद्रेत पिंपळाचं एक रोप वर येत असून दोन एकशृंग देवता त्याला लपेटून त्याचं रक्षण करत आहेत, असं चित्र आहे. ‘महिषमुंड’ ही सिंधूजनांची श्रेष्ठ देवता असून ती ‘अश्वत्थ’ निवासिनी होती, अशी आख्यायिका आहे. ऋग्वेदात ‘अश्वत्था’ला यम व पितर यांचं निवासस्थान मानलं आहे. यामुळेच गयेसारख्या क्षेत्रात पिंपळाच्या झाडाखाली पिंडदान करण्याची पद्धत पडली असावी. गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली म्हणून बौद्धधर्मियांनी पिंपळाच्या झाडाला ‘बोधिवृक्ष’ म्हटलं आहे. पुराणकाळात या वृक्षाला महत्त्व मिळालं. श्रीकृष्णाने गीतेत अश्वत्थ: सर्ववृक्षणाम।’ म्हणजेच, ‘सर्व वृक्षांमध्ये मी ‘अश्वत्थ’ आहे,’ असं म्हटलं आहे. चातुर्मासमाहात्म्य, कार्तिक व श्रावण महात्म्यं, व्रतराज, व्रतकौमुदी इ. ग्रंथांतून ‘अश्वत्थ’ वृक्षाची व्रतं वर्णिलेली आहेत.

 

‘अश्वत्थ’ माहात्म्याची एक कथा पद्मपुराणात दिली आहे ती अशी, धनंजय नावाचा एक विष्णुभक्त ब्राह्मण होता. त्याची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी विष्णूने त्याला दरिद्री केले. त्यामुळे त्याच्या आप्तेष्टांनी त्याचा त्याग केला. एकदा शेकोटीसाठी लाकडे तोडीत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली. त्या क्षणी विष्णू तिथे प्रकट झाला. त्याने ब्राह्मणाला सांगितलं की, “तू पिंपळावर कुर्हाड चालवलीस, त्यामुळे माझ्या सर्वांगी जखमा झालेल्या आहेत.” ब्राह्मणाला ते ऐकून दुःख झालं. तो कुर्हाडीने स्वतःचं मस्तक तोडायला निघाला. तेव्हा विष्णू प्रसन्न होऊन त्याला म्हणाला, तू नित्य ‘अश्वत्थपूजा’ करीत जा. ब्राह्मण त्या दिवसापासून ‘अश्वत्थपूजा’ करू लागला व कुबेराने त्याचं दारिद्रय नष्ट केलं.

 

पुढील श्लोक अश्वत्थमाहात्म्य विशद करतो,

 

अश्वत्थ: सर्ववृक्षणां राजा ब्राह्मणवर्णक: ।

अश्वत्थ: पूजितो येन सर्व संपूजितं भवेत॥

 

अर्थ- ‘अश्वत्थ’ वृक्ष सर्वांचा राजा असून, तो ब्राह्मण वर्णाचा आहे. ज्याने ‘अश्वत्थ’ वृक्षाचे पूजन केले, त्याने सर्व काही पूजले असे होईल.

 

‘अश्वत्थ’ हा प्रथम सृष्टिकर्त्या प्रजापतीचे प्रतीक होता. पण पुढे तो विष्णुरूप मानला गेला. कन्येला वैधव्य येऊ नये, म्हणून प्रथम तिचा ‘अश्वत्था’शी विवाह करावा, असं संस्कारप्रकाशात सांगितलं आहे. स्त्रिया संतानप्राप्तीसाठी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. नष्ट झालेली वस्तू वा व्यक्ती परत मिळावी म्हणूनही ‘अश्वत्था’ला प्रदक्षिणा घालण्याची परंपरा आहे. संत ज्ञानेश्वरांची आई आपला परागंदा झालेला पती परत यावा, म्हणून ‘अश्वत्था’चीच उपासना करीत होती, असं त्यांच्या चरित्रात लिहिलं आहे. पिंपळाची पूजा करण्यापूर्वी त्याला सूत गुंडाळण्याची परंपराही फार पुरातन आहे. ‘अश्वत्था’ची मुंज लावतात व त्याचं तुळशीशी लग्नही लावतात. खास करून श्रावणातील शनिवारी ‘अश्वत्थपूजा’ करतात. बंगाली स्त्रिया वैशाख महिन्यात ‘अश्वत्थपट’ नावाचं एक व्रत करतात. यामध्ये पिंपळाच्या झाडाची विधीपूर्वक पूजा केली जाते. या व्रताप्रमाणेच ‘अश्वत्थप्रदक्षिणा व्रत’ आणि ‘अश्वत्थसेचन व्रत’ ही व्रतेही भारताच्या विविध भागांत प्रचलित आहेत. चार महिने नित्य घडाभर पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी घालणं हा ‘अश्वत्थसेचन’ व्रताचा विधी आहे. याचा मंत्र असा,

 

सिंचामि अश्वत्थ ते मूलं मम संततीवृद्धये ।

अश्वत्थरुपो भगवान प्रीयतां मे जनार्दन: ॥

 

अर्थ: हे अश्वत्था! माझ्या संतानवृद्धीसाठी मी तुझे मूळ शिंपीत आहे. अश्वत्थरूपी भगवान मजवर प्रसन्न होवो.

 

याचप्रमाणे पिंपळाचं झाड लावून आठ, ११ किंवा १२ वर्षं झाल्यावर त्याच्याभोवती पार बांधून विधीपूर्वक त्याचं उद्यापन करतात. याला ‘अश्वत्थोद्यापन’ म्हणतात. या उद्यापनाने श्रीकृष्ण प्रसन्न होतो असं सांगितलं आहे. पिंपळाच्या छायेत खोटं बोलू नये असा संकेत आहे. पाणवठ्याजवळ उगवलेल्या बहुतांश पिंपळाच्या झाडांखाली गणपती व नाग यांच्या मूर्ती ठेवलेल्या असतात. श्रावण महिन्याच्या वद्य त्रयोदशी, चतुर्दशी आणि अमावस्या या दिवशी पिंपळाच्या मुळात पाणी घातल्याने पितरांची तहान भागते असं सांगितलं आहे. भगवान श्रीकृष्णाने पिंपळाखालीच देहत्याग केला. एखाद्या जलाशयाजवळ वड, पिंपळ व उंबर एकत्र वाढले, तर दत्तगुरू वास्तव्य करतात, असं मानतात. भूतयोनीतील मुंज्या पिंपळावर राहतो अशी समजूत आहे. वनवासी पिंपळाच्या वृक्षाला वृक्षांच्या राज्यातील द्वाररक्षक मानतात; कारण आपल्या सळसळीने तो सतत जागल्याचे काम करत असतो. बृहत्संहितेत घराच्या पश्चिमेस पिंपळाचं झाड लावणं शुभ मानलेलं असून घरबांधणीत मात्र त्याचं लाकूड वापरू नये असं सांगितलं आहे. पिंपळाचं झाड तोडू नये असं म्हणतात. हा वृक्ष मुळासकट जरी तोडला जात नसला तरी पिंपळाच्या सर्व अवयवांचा काही ना काही धार्मिक वा औषधी उपयोग आहे. पिंपळाच्या लाकडाच्या नौका बनवीत असल्याचा उल्लेख ऋग्वेदात आहे. यज्ञात अग्निमंथन करण्यासाठी उत्तरारणी अश्वत्थाची करीत. सोमरसाची अनेक पात्रे अश्वत्थापासून तयार करीत. आयुर्वेदातही पिंपळाची साल ही शीतल, वेदनाशामक म्हणून सांगितलेली आहे. भारतीय तत्त्वज्ञानात ‘सृष्टिरूप वृक्ष’ अशी एक कल्पना केली गेली आहे आणि या सृष्टिरूप वृक्षालाच ‘अश्वत्थ’ असं म्हटलं गेलं आहे. या सृष्टिरूप वृक्षाच्या ज्ञानानेच मोक्ष मिळतो असं म्हटलं आहे. ऋग्वेदात याला वारूणिच्या लोकातील वृक्ष म्हटलं आहे. भगवद्गीतेत ‘अश्वत्थ’ वृक्षालाच संसारवृक्ष मानून त्याचं सविस्तर वर्णन केलं आहे. कठोपनिषदात याला ‘ब्रह्मवृक्ष’ म्हटलं आहे.

 

अशाप्रकारे पिंपळाचं झाड हे भारतीय संस्कृतीतलं एक पूज्य दैवत आहे. कोणी याला श्रद्धा म्हणोत वा कोणी अंधश्रद्धा, परंतु पिंपळाचे जे काही जुने वृक्ष आज थोड्याफार प्रमाणात टिकून आहेत, ते त्यांच्याप्रती असलेल्या धार्मिक भावनांमुळेच हे निर्विवाद!

 

संदर्भ- १. भारतीय संस्कृतीकोश,

      २. मराठी विश्वकोश

@@AUTHORINFO_V1@@