पूर्वोत्तरही पुराच्या विळख्यात

    दिनांक  03-Sep-2018    

 

अतिवृष्टी आणि महापुराने थैमान घातलेल्या केरळातील जनजीवन सामान्य होत असतानाच तिथे साथीच्या रोगांच्या उपद्रवाची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे केरळमध्ये अतिवृष्टी आणि महापुराने थैमान घातल्यानंतर आता देशाच्या पूर्वोत्तर भागातही जलप्रलयाला सुरुवात झाल्याचे दिसते. मात्र, ज्या प्रमाणात आणि ज्या वेगात केरळमधील महापुराची माहिती देशासमोर आली, तशी पूर्वोत्तरातील जलप्रलयाची माहिती समोर आली नाही. यामागची कारणे काहीही असली तरी सध्या पूर्वोत्तरातील कितीतरी भाग पुराच्या पाण्याखाली गेले असून तिथले जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. पूर्वोत्तरातील पुराचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या राज्यांना फक्त पावसाच्या पाण्याचाच धोका नसतो, तर चीनने सोडलेल्या पाण्याचाही धोका असतो. कारण, या भागातली सर्वात मोठी नदी असलेल्या ब्रह्मपुत्रेवरील मोठमोठी धरणे चीनमध्येच आहेत. इथल्या महापुरात याच धरणांतील चीनने सोडलेले पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. चीनने याबाबत असेही स्पष्टीकरण दिले की, जास्तीच्या पावसामुळे ब्रह्मपुत्रेवरील धरणांतून यंदा अतिरिक्त पाणी सोडले जात आहे, पण यामुळे आसाम, अरुणाचल प्रदेश आणि नागालँडचे कितीतरी भाग पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे अशा महापुरातून वाचण्यासाठी या राज्यांना मदतीची नितांत आवश्यकता आहे, मात्र ती पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाही. जशी मदत केरळमधील पूरग्रस्तांना केंद्र व राज्य सरकारांनी केली, तशाच मदतीची गरज पूर्वोत्तरातील राज्यांनाही आहे. कारण, आसाम, नागालॅँड आणि अरुणाचल प्रदेशातील कित्येक भागातील पूरस्थिती भयानक झाली असून सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे. शिवाय आधीपासूनच रस्ते आणि खाद्यपदार्थांची कमतरता असल्याने आता तर महापुराने इथली परिस्थिती जणू काही एखाद्या काळरात्रीसारखीच झाली आहे. यातून सावरण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपल्याकडून मदतकार्य करत असून पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी, पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्नही करत आहेत. पण अजूनही प्रसारमाध्यमांत व समाजमाध्यमांत इथल्या पुराची पुरेशी दखल घेतल्याचे दिसले नाही. खरे म्हणजे याआधीच्या कित्येक वर्षांत देशातील बहुतांश भागांनी पूर्वोत्तराला सावत्रपणाची वागणूक दिली, तिथल्या लोकांना ‘नेपाळी’ वगैरे म्हणूनही संबोधले पण आताच्या परिस्थितीत पूर्वोत्तराला मदत केल्यास त्यांनाही देशाबद्दल आपलेपणा वाटेल.
 

नालेसफाई नव्हे, तिजोरीसफाई!

 

भ्रष्टाचारमुक्त राजकारणाची हाकाटी पिटत सत्तेवर आलेल्या दिल्लीतील केजरीवाल सरकारने बदमाशपणाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्याचे देशाला वेळोवेळी दिसले. गेल्या काही दिवसांत केजरीवालांच्या पक्षातून राजीनामा देत बाहेर पडलेल्या नेत्यांच्या आदळआपटीवरूनही आम आदमी पक्ष चर्चेत आला, पण आताचा मुद्दा वेगळाच आहे. इकडे मुंबईत ‘करून दाखवले’, ‘करून दाखवले’च्या आरोळ्या ठोकत सत्तेवर बसलेल्यांनी इथल्या नालेसफाईत घातलेला घोळ आपल्याला दिसतोच. पण, असाच घोळ तिकडे दिल्लीच्या सत्तेवर बसलेल्या केजरीवालांनी ‘करून दाखवला’ आहे. दिल्ली सरकारमधील नालेसफाईचा घोटाळा नुकताच उघडकीस आला असून यात सरकारी खजिन्यातील कोट्यवधी रुपये साफ केल्याचे म्हटले जात आहे. सध्या दिल्लीची अवस्था बिकट झाली असून थोडासा जरी पाऊस पडला तरी इथला प्रत्येकच नाला ब्लॉक होत आहे. नाले ब्लॉक झाल्याने पाणी रस्त्यावरच अडत असून कित्येक ठिकाणी मोठमोठ्या बसेसदेखील पाण्याखाली बुडताना दिसत आहेत. दिल्लीची ही अवस्था झाल्यानेच इथला नालेसफाई घोटाळा खरे म्हणजे समोर आला. केजरीवाल सरकारने दिल्ली विधानसभेमध्ये कितीतरी वेळा सरकारच्या पीडब्ल्यूडी विभागाने दिल्लीच्या सर्वच नाल्यांच्या स्वच्छता कामाची माहिती व अहवालही दिलेनालेसफाईसाठी कितीतरी लोकांना कंत्राटेही दिली आहेत आणि सरकारने त्यासाठी पैसाही खर्च केला. पण आता पाऊस पडला रे पडला की, सगळेच नाले तुंबल्याचे दिसते. यावरून हेच स्पष्ट होते की, दिल्लीतली नालेसफाई कधी झालीच नाही अन् जी काही नालेसफाई झाली ती फक्त कागदावरच. या कागदावरच्याच नालेसफाईमुळे आज दिल्लीतले सर्वच मोठे रस्ते पाण्याखाली गेल्याचे तर दिसतेच, पण सोबतच नालेसफाईसाठी ओतलेले कोट्यवधी रुपयेही वाहून बुडाल्याचे स्पष्ट होते. शिवाय केजरीवालांनी नालेसफाईच्या नावाखाली आपल्या पसंतीच्याच लोकांना ही कंत्राटे दिली आणि सर्वसामान्यांचा पैसा उडवत तिजोरीचीच स्वच्छता केली. केजरीवाल सरकारने केलेला हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असून त्यांनी चतुरपणे दिल्ली सरकारच्या पैशांवरही डल्ला मारला. खरे म्हणजे दिल्लीकर जनतेने केजरीवालांचा स्वच्छ प्रतिमेमागचा खरा चेहरा ओळखून जसे महापालिका निवडणुकीवेळी त्यांना नाकारले तसेच पुढेही केले तरच त्यांना चांगले सरकार मिळू शकते; अन्यथा नाही.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/