पालघरमध्ये पावसाची सरासरी मागच्या वर्षीच्या तुलनेत कमीच

    दिनांक  29-Sep-2018खानिवडे: जुलै व ऑगस्ट महिन्यात मुसळधार बरसलेल्या पावसाने नंतर अचानक दडी मारली. याचाच फटका पालघर जिल्ह्यातील भातशेतीला बसला आहे. येथील ग्रामीण भागातील भातशेती करपायला लागली असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात यावर्षी सर्वत्रच कमी पाऊस पडला. त्यामुळे याचा थेट फटका शेतीला बसणार आहे. जुलै महिन्यात धुवांधार बरसणाऱ्या पावसाने नंतर अधूनमधून हजेरी लावत आता दडीच मारली आहे. आताही काही ठिकाणी अधूनमधून पडणाऱ्या तुरळक सरी येत असल्या तरी हा पाऊस शेतीला पुरेसा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, आता पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांच्या हातातून भात व अन्य पिके निसटून जाण्याची भीती आहे .

 

जिल्ह्यातील यावर्षीच्या पावसाची आतापर्यंत सरासरी गेल्यावर्षीच्या तुलनेत ५०० मिमी इतकी कमी असून वाडा तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत ७८८ मिमी, तर मोखाड्यात ७८९ मिमी, तलासरीत ७०१ मिमी व डहाणूत ६४६ मिमी इतका पाऊस कमी झाला आहे. पालघर ४३७ मिमी, जव्हार ४६७ मिमी, विक्रमगड ४९३ मिमी, इतका कमी आहे. वसई तालुक्यात पावसाची गतवर्षीची सरासरी २,२२५ मिमी होती. ती या वर्षी आतापर्यंत १,९६८ मिमी इतकी झाली आहे. जिल्ह्यात मागील वर्षी आतापर्यंत २८४८.८ मिमी पाऊस झाला होता. तो चालू वर्षी २३१३.५ मिमी इतका झाला आहे. मात्र, जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी, कवडास तसेच केळवे माहीम, देवखोप, मनोर, डहाणूमधील रायतळे, विक्रमगडमधील डोम, वसईतील पेल्हार, हत्तीपाडा आदी धरणे पूर्ण भरली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/