‘स्पॉटलाईट’ केरळच्या जोगिणींच्या शोषणावरही!

    दिनांक  26-Sep-2018   

 
 
कलाकृती तीच सर्वोकृष्ट असते, जी एकाच वेळी काळजावर आणि मेंदूवर प्रभाव टाकते. चित्रपटाच्या वाट्याला हे भाग्य अनेकदा येण्याची शक्यता यासाठी असते की, चित्रपट हे सर्वच कलांचा छेदनिंबदू असतात. एखाद्या दृश्यात सेट आणि कलावंतांच्या कपड्यांच्या रंगसंगतीचाही परिणाम प्रेक्षकांच्या मनावर होत असतो. इतर वेळी सर्वच कला समांतर निघून जाऊ शकतात. चित्रपट, नाटकांत मात्र त्या एका ठिकाणी मिळतात. त्यांचा संगम होतो आणि मग त्यातून एक वेगळाच परिणाम साधला जात असतो. तो मन आणि मेंदू या दोन्हीवर परिणाम करणारा असतो. मग तिथे क्लास आणि मास असे काही उरत नाही. भाषेचीही समस्या नसते. अशाच चित्रपटांना अभिजात असण्याचा दर्जा मिळत असतो. तिथे समीक्षक, परीक्षक आणि सामान्य म्हणवला जाणारा प्रेक्षक यांची बैठक जमत असते. कारण साखर, सम्राटाच्या तोंडीही गोडच लागते अन् मजुराच्या तोंडीही... या निमित्ताने ‘दी स्पॉटलाईट’ हा चित्रपट आठवला. 2016 चे ऑस्कर या चित्रपटाला होते. ऑस्कर होते म्हणून हा चित्रपट चांगलाच आहे, असे नाही. तो चांगला होता म्हणून त्याला नाइलाजाने ऑस्कर द्यावा लागला. असे म्हणण्याचे कारण हेच की, तो ज्या सत्य कथानकावर बेतला होता त्याला अमेरिकन समाजातही विरोध झाला होता.
 
 
ख्रिश्चन धर्मगुरूंनी बालकांच्या केलेल्या लैंगिक शोषणावर बोस्टन ग्लोब नामक वृत्तपत्राने मालिका केली होती. त्या वेळी त्यांना सर्वच स्तरातून विरोधाचा सामना करावा लागला होता. ते प्रकरण खूप गाजले आणि त्यावर ‘द स्पॉटलाईट’ हा सिनेमा बेतण्यात आला. लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ मानल्या जाणार्या वृत्तपत्राच्या निर्भीड आणि निष्पक्ष पत्रकारितेचा अन् त्यातही शोधपत्रकारितेचा एका प्रकरणाच्या निमित्ताने प्रवास या चित्रपटात दाखविण्यात आला आहे. बोस्टन भागात केलेले बाललैंगिक शोषण याविषयी जी शोधपत्रकारिता केली गेली त्यासाठी ‘द ग्लोबला’ त्या वर्षीचा पब्लिक सर्व्हिस या क्षेत्रातील पुलित्झर पुरस्कार देऊन गौरवलं गेलं होतं. अर्थात, त्या आधी ही वृत्तमालिका प्रकाशित होऊ नये, यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होता. इतका की त्यांचे वृत्तपत्रच बंद पडेल की काय, अशी भीती होती.
 
 
असा सिनेमा लिहिणे तसे कठीण असते. फार निसरडी वाट असते अशा लेखनाची. मूळ घटनाक्रमातून व्यक्त होणारा आशय जास्त रंगरंगोटी न करता नीट मांडला जाणं अत्यंत आवश्यक असतं. अशा चित्रपटात नेमका लेखक त्याच्या भावना आणि विचारांच्या दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि मग घटना आणि प्रसंग लाऊड होण्याची शक्यता असते. त्यातून नैसर्गिक पद्धतीने प्रवाहित झालेला आशय करपून जाण्याची साधार भीती असते. आपल्या भारतीय चित्रपटांच्या बाबत अनेकदा असे झाले आहे. अलीकडेच आलेल्या ‘उडता पंजाब’च्याबाबत नेमके हेच झाले आहे. व्यवसायिकतेच्या नावाखाली गल्लाबारीवर नजर ठेवून सत्य प्रक्षिप्त केले जाते. तसे या या चित्रपटाच्या बाबत झालेले नाही. जॉश सिंगर आणि टॉम मकार्थी यांनी या चित्रपटाची पटकथा इतकी सुरेख बांधली आहे की धर्म, व्यवस्था आणि न्याय याबाबत घटनांतून भाष्य होत जातं आणि ते प्रेक्षकांच्या मनात उमटतं. या चित्रपटातील संवादही इतके उत्तम आहेत की, ते जगातील कुठल्याही अशा घटनेच्या बाबत लागू पडतात. बालकांच्या लैंगिक शोषणाचे हे प्रकरण वृत्तपत्रांतून बाहेर पडू लागतं, तेव्हा ते दाबण्यासाठी बोस्टन शहरात सगळ्यांच्या आदराचे स्थान असलेले कार्डिनल अत्यंत संभावित असा चेहरा करून त्या वृत्तपत्राच्या संपादकाला सांगतात, ‘‘शहराची भरभराट तेव्हाच होऊ शकते जेव्हा सगळ्या सामाजिक संस्था एकत्र काम करतील...’’ त्यावर चेहर्यावरचे स्मित कायम ठेवत संपादक म्हणतो, ‘‘वृत्तपत्रानं एकटंच असलं पाहिजे तेव्हाच लिहिलेल्या आशयाला न्याय मिळू शकेल.’’
 
 
केरळात परवा जालंदरचा बिशप फ्रान्को मलक्कल याला अटक करण्यात आली. त्यानेही नेमके तेच केले होते जे बोस्टनच्या त्या धर्मगुरूने केले होते. धर्माधिष्ठित सत्तेचा गैरवापर करीत त्याने आपल्याच धर्माच्या प्रसारासाठी आयुष्य देणार्या जोगिणींचे शोषण केले होते. धर्मात सगळेच कसे पवित्र असते, हा भाबडा समज केवळ भारतातच आहे, असे नाही. तो अमेरिकेसारख्या, जगाचे नायकत्व सांभाळणार्या देशातही आहे. धर्मगुरूंनी असे शोषण केल्याची प्रकरणे ख्रिश्चन धर्मात काही केवळ भारतातच घडली आहेत असे नाही. मध्यपूर्वेत आणि आफ्रिकन देशांपासून सगळीकडेच हे घडले आहे आणि घडत आहे. काही महिन्यांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये असेच प्रकरण उघडकीस आले. फिलाडेल्फियामध्येही असेच प्रकरण उघडकीस आले आणि त्यानंतर प्रिस्टला पदच्युत करण्यात आले. आताही बिशप फ्रान्कोच्या प्रकरणात सत्याची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माध्यमांमध्ये या प्रकरणाचा आवाज निर्माण झाल्यावर पोप फ्रान्सिस यांनी मलक्कल याला चर्चच्या कामातून मुक्त केले. तसे करणे ही त्यांची अगतिकता होती. कारण पदावरील बिशपला पोलिसांनी लैंगिक शोषणाच्या आरोपात अटक केली असती, तर भारतात ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी ते बाधक ठरले असते. मात्र, हे खूप सरळ, साधेपणाने घडले नाही. त्याआधी धार्मिक पावित्र्य राखण्यासाठी काजळी पुसून टाकण्याचे प्रयत्न करण्यात आले. कोट्टायमच्या त्या जोगिणीने पहिल्यांदा जून महिन्यात तक्रार केली आणि त्याला पोलिसांनी दाद दिली नाही. केरळ हे तसे निधर्मी- सुधारणावादी अशी संभावना करण्यात येत असलेले राज्य. मुख्यमंत्री पिनाराई विजयन् हे डावे, पुरोगामी वगैरे. तरीही त्यांनी त्यांच्या या प्रतिमेला न शोभेल असे दुर्लक्ष केले. कारवाईत चालढकल करण्यात आली. त्यानंतर त्या जोगिणींच्या पाठीशी इतरही पीडित जोगिणी उभ्या राहिल्या. त्या जोगिणीच्या बहिणीने आंदोलनाचा इशारा दिला. पीडितेच्या चारित्र्यावरच आरोप करण्याचा अत्यंत घृणित प्रयत्न ख्रिश्चन धर्ममार्तंडांनी केला. त्यानंतर माध्यमांमध्ये हे प्रकरण गाजू लागल्यावर अगदीच नाइलाज झाला. तक्रारी वाढू लागल्या आणि घृणित कृत्यांचे गटारच बाहेर धोधो वाहू लागेल, असे दिसताच एका बिशपचा बळी देण्यात आला. त्याला बिशप पदावर असताना अटक होऊ नये, यासाठी वेळ काढण्यात आला आणि मग पोपनी त्याला पदावरून हटविले. धर्माचे भंपक पावित्र्य राखण्याचा हा लटका प्रयत्न आहे.
 
 
आता या सार्या प्रकरणात केरळातीलच नव्हे, तर देशातील सर्वच निधर्मी म्हणवून घेणारे विचारवंत(!) आता गप्प का आहेत, हा प्रश्न अगदी तटस्थ आहे. त्यात उजवी, डावी विचारसरणी वगैरे नाही. या विचारवंतांनी खरेतर केरळातील या धार्मिक स्वैराचारावर ताशेरे ओढायला हवे होते. हिंदू धर्माच्या बाबत असे घडले असते तर हे विचारवंत गप्प राहिले असते का, हा प्रश्न या ठिकाणी अप्रस्तुत ठरत नाही. तसेही माध्यमांत अन् खास करून इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांत हे प्रकरण म्हणावे तसे वाजविले गेले नाही. एक साधारण गुन्हेवार्ता यापलीकडे तिची दखल फारशी घेतली नाही. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या साट्यालोट्याची ही कहाणी आहे. धार्मिक अधिष्ठानाचा वापर आपले कुकृत्य झाकण्यासाठी केला जाण्याचा हा प्रकार आहे. त्यात गुन्हा करणारी व्यक्ती महत्त्वाची नसते, धर्म महत्त्वाचा असतो. त्या व्यक्तीच्या कृत्याने धर्म लांच्छित होणार असतो अन् ती दुकानदारी धोक्यात येणे कुणालाच परवडणारे नसते- अगदी राजसत्तेलाही. केरळातील निधर्मी म्हणवणार्या राजसत्तेलाही बिशपच्या या कृत्याकडे दुर्लक्ष करावे लागले ते यासाठीच.
 
 
आता पुन्हा एक प्रश्न कायम आहे. माध्यमांनी पूर्णपणे आपली भूमिका नीट पार पाडली का? एकतर ही स्टोरी काही माध्यमांनी बाहेर काढली नाही. त्या जोगिणीने तक्रार केल्यावर त्याची दखल माध्यमांनीही तत्काळ घेतली नाही. समाजमाध्यमांवर हे प्रकरण सर्वदूर पसरले आणि आटोक्याच्या बाहेर गेल्यावर माध्यमांनी त्याची दखल घेतली. तीही केवळ या एकाच प्रकरणाच्या बाबत. हे हिमनगाचे टोक असू शकते, त्याचा तळ शोधण्याचे माध्यमांचे काम माध्यमांनी अद्याप तरी केलेले नाही. ‘स्पॉटलाईट’ चित्रपटाकडे पुन्हा या निमित्ताने वळावेच लागेल. चित्रपटात 1976 च्या एका प्रकरणाचा शोध घेताना, त्या प्रांतात ख्रिश्चन धर्मगुरूंचे अश्लाघ्य कृत्य उघडकीस येते... केरळात शोधपत्रकारितेने हे खोदकाम केले तर केवळ एकच, मलक्कल असे कुकृत्य करतो आहे, हेच सत्य नक्कीच नसेल!