महासत्तेचे मागासलेपण

    दिनांक  26-Sep-2018   
 

अमेरिका म्हणजे स्वच्छ आरसा, अशी धारणा जे नागरिक बाळगतात, त्यांनी त्याची दुसरी बाजू समजून घेऊन स्वदेशाभिमान जोपासण्याची आवश्यकता आहे.

 

जागतिक पटलावर अमेरिका हा देश महासत्ता म्हणून आपली शेखी मिरविताना आपल्याला दिसून येतो. मात्र, या ‘महासत्ते’चेही विकसित चेहऱ्याआडही ‘मागासलेपण’ दडले आहे. कारण, येथील शहरांची स्थितीदेखील विदारक असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील अॅरिझोना, केंटकी आणि मिसीसिपी व अलबामा या राज्यांतील नागरीजीवनाची स्थिती अत्यंत दयनीय आहे. तेथील नागरिक सेवावस्तीमध्ये आपले जीवनमान व्यतीत करत आहेत. पिण्याचे किंवा दैनंदिन वापराचे पाणी नळाने न येता विहिरीतून उपसा करून काढावे लागते. जागतिक हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर तेथील भूजल पातळी आज कमालीची खालवली आहे. त्यामुळे मोठ्या शक्तीच्या पंपाच्या साहाय्याने तेथील पाण्याचा उपसा केला जातो. प्राप्त होणाऱ्या पाण्यात एक विचित्र रंगाचा एक द्रवपदार्थ आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ते पाणी प्यायल्याने तेथे आरोग्याच्या विविध समस्या आजमितीस उभ्या ठाकल्या आहेत. स्वच्छ पाण्याची कमतरता असल्याने तेथील नागरिकांना आंघोळीसाठीदेखील द्राविडी प्राणायाम करावा लागतो. कपडे-भांडी यांची स्वच्छता केल्यावर तेच पाणी झाडांना घातले जाते आणि बहुतांश वेळा तेच अस्वच्छ पाणी न्हाणीघर साफ करायलादेखील वापरात आणले जाते. या राज्यांच्या जवळपास अनेक खाणी आहेत. तेथील खाण कामगारांचे जीवन अधिकच विदारक आहे. त्यांना मिळणारे पिण्याचे पाणी हे पाणी आहे की, अजून कोणते द्रव्य, असा प्रश्न येथील खाण कामगारांना सतावत असतो. तसेच, उघड्या गटारांची समस्या हीदेखील ‘महासत्ते’च्या मागासलेपणाची साक्ष देते. या राज्यांत या उघड्या गटारांमुळे विकासाचा सुगंध न दरवळता, दारिद्र्याचा दुर्गंध पसरताना अनुभवास येतो.
 

नैमितिक समस्यांनी ग्रस्त जीवनमानामुळे मानवी जीवनाला प्रात:काळापासून अगतिकतेचा सामना करावा लागतो. त्यामुळे मानसिक अशांतता येथील नागरिकांचा स्थायीभाव झाला आहे. तेथील नागरिकांत त्यामुळे भविष्याची कोणतीही आस दिसत नाही. त्यामुळे ते जातीपंथांच्या राजकारणाकडे झुकतात. त्यातूनच अनेक युवक डाव्या विचारसरणीचे कडवे कार्यकर्ते म्हणून उदयास येतात. त्यातील काही उग्र राष्ट्रवादाच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यास सुरुवात करतात आणि सतत वर्तमानातील व भूतकाळातील व्यवस्थेला दोष देणारा व बहुसंख्याक नागरिकांची अस्मिता जागृत करणारा नेता शोधू लागतात. या सर्व प्रक्रियेतून डोनाल्ड ट्रम्पसारखे नेतृत्व जन्माला आले का, हा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो. राजकीय लाभासाठी असे मागासलेपण जरुरी आहे, असा विचार महासत्ताधीश करत आहे का, हाही प्रश्न यानिमित्ताने विकसनशील राष्ट्रातील जनतेला भेडसावत असणे साहजिक आहे. मग,आता प्रश्न असा आहे की, जर एवढे मागासलेपण अमेरिकेत आहे तरी ते विकसित राष्ट्र कसे? तर त्याचे उत्तर हे त्यांच्या उत्कृष्ट दर्जाच्या मूलभूत संशोधनात आहे. अलीकडच्या काळातील अनेकविध शोध हे अमेरिकेत लागले. तेथे संशोधन करणाऱ्या युवकांना प्रचंड वाव व मुबलक वित्ताचे पाठबळ तेथील शासन व्यवस्थेकडून सदैव प्राप्त होत असते. विशेष म्हणजे, या संशोधनामागे असतो तो भारतीय मेंदू. आपल्याला आजवर केवळ अमेरिकेची एकच बाजू बहुदा माहीत असावी. मात्र, ग्रामीण अमेरिकेचे वास्तव कोणत्याही प्रसारमाध्यमाने आजवर कदाचित दाखवले नसावे. त्यामुळे ‘महासत्ता’देखील गरिबीने विवंचित आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

 

अमेरिकेतील प्रसारमाध्यमांचा कल हा सत्य लोकांपर्यंत पोहोचविण्यामध्ये असतो. त्यामुळे तेथील सरकारला माध्यमांची गंभीर दखल घ्यावी लागते. हेदेखील ‘महासत्ते’च्या विकासाचे द्योतकच म्हणावे लागेल. आजमितीस, संपूर्ण जगभर विषमतेकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करून नवीन आर्थिक घडी बसविण्याचे प्रयत्न भारतासह जागतिक पटलावर होत आहेत. अशा परिस्थितीत जाती, धर्म, पंथ यांच्या नजरेतून आपण जगाकडे पाहिले, तर आपल्यातील अहंकार कदचित सुखावेल, मात्र त्यातून काहीही साध्य होणार नाही. याची जाणीव विकसित राष्ट्रांप्रमाणे विकसनशील राष्ट्रांनी ठेवणे आवश्यक आहे. अमेरिका म्हणजे स्वच्छ आरसा, अशी धारणा जे नागरिक बाळगतात, त्यांनी त्याची दुसरी बाजू समजून घेऊन स्वदेशाभिमान जोपासण्याची आवश्यकता आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/