वनवासींना ओळख देणारी ‘देहात’

    दिनांक  26-Sep-2018   डॉ. जितेंद्र चतुर्वेदी हे मूलभूत सोयी-सुविधांपासूनही वंचित असलेल्या जंगलप्रदेशातील नागरिकांना त्यांचे अधिकार मिळवून देणारे अग्रगण्य ठरावे, असेच व्यक्तिमत्व.

 

दुर्गम, डोंगराळ, घनदाट जंगलप्रदेशातील गावखेड्यांची नावे आपण नेहमीच ऐकतो. वर्तमानपत्रातून, वृत्तवाहिन्यांतून, रेडिओवरच्या बातम्यांतून कधी कधी येथील सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाची, समस्यांची, अडीअडचणींची आपल्याला माहितीही होते. शासन, प्रशासनाच्या माध्यमातून इथे राहणाऱ्या नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी तर गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्नही करण्यात येत आहेत. मात्र, तरीही देशातील अशी अनेक गावे आहेत, जिथे विकासाची, नवयुगाची बाराखडीही सुरू झालेली नाही. स्वयंसेवी संस्था-संघटनांचे कार्यकर्ते अशा ठिकाणी काम करतानाही दिसतात. सोबतच छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या गडचिरोली, चंद्रपूर, आंध्र प्रदेशातील जंगल क्षेत्र या भागात काही अपप्रवृत्तीदेखील स्थानिक नागरिकांना भडकावून सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्याच्या कारवाया अविरत करताना दिसतात. पण, चहुबाजूंनी गांजलेल्या, पिचलेल्या या भागातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी एखादाच माणूस तयार होतो, हेही खरे. डॉ. जितेंद्र चतुर्वेदीहे मूलभूत सोयी-सुविधांपासूनही वंचित असलेल्या जंगलप्रदेशातील नागरिकांना त्यांचे अधिकार मिळवून देणारे अग्रगण्य ठरावे, असेच व्यक्तिमत्व.

 

जंगल प्रदेशातील गावे नेहमीच आपल्याला सवय झालेल्या अनेक सोयी-सुविधांसाठी तरसत, तडफडत असतात. उत्तर प्रदेशातील बहराइच भागातील कतर्निया घाट जंगलात असेच हजारो लोक राहत होते. सात वनग्रामात राहणारे हे लोक कित्येक वर्षांपासून ओळख आणि सरकारी सुविधांपासून कोसो मैल दूर होते. या गावात ना वीज पोहोचली होती, ना रुग्णालये, ना शाळा आणि ना आपल्या जमिनीवर मालकी हक्काची जागृती. एवढेच नव्हे, तर कतर्निया घाट जंगलातील या गावातील लोकांकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्रदेखील नव्हते. आता मात्र येथील परिस्थिती बऱ्याच अंशी बदलली आहे आणि हा बदल आणला आहे डॉ. जितेंद्र चतुर्वेदीयांनी. पेशाने डॉक्टर असलेले चतुर्वेदी सांगतात की, “२२ वर्षांपूर्वी मी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि त्याचवेळी मी एक शपथही घेतली. शपथेमध्ये गरीब आणि अशा लोकांची मदत करण्याचे वचन असते, की ज्यांच्यापर्यंत वैद्यकीय सुविधा पोहोचलेल्याच नाहीत. होमिओपॅथीची पदवी घेतल्यानंतर याच शपथेने मला अशा जागी जाण्याची प्रेरणा दिली जिथे कोणीही आजपर्यंत गेलेले नाही.

 

२२ वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. जितेंद्र चतुर्वेदींनी शपथ पूर्ण करण्यासाठी सोयी-सुविधांपासून वंचित असलेल्यांचा शोध सुरू केला. अखेर त्यांचा शोध डॉ. जितेंद्र यांना घेऊन आला, तो बहराइचमधील कतर्निया जंगल प्रदेशात. इथे आल्यावर त्यांना दिसली, ती येथील लोकांची हलाखीची आणि बिकट-दयनीय अवस्था. येथील लोकांकडे कोणतीही ओळख नव्हती, तर होता तो रोजच गरिबी आणि भुकेशी होणारा संघर्ष. जंगलात राहणाऱ्या लोकांना ते कसत असलेली जमीन मिळावी म्हणून वन अधिनियम कायदा सरकारने मंजूर केला होता. पण, त्यानंतरही येथील लोकांना जमिनीवर अधिकार मिळालाच नाही. यासाठी या लोकांनी मोठा लढाही दिला, ज्याचे परिणाम आज आपल्याला पाहायला मिळतात. डॉ. जितेंद्र चतुर्वेदी सांगतात की, “मी इथे आलो तेव्हा या भागातील भानुमती नावाच्या एका महिलेला भेटलो, जिच्याकडे आपली स्वत:ची कोणतीही ओळखच नव्हती आणि त्याचवेळी मला याचीही माहिती मिळाली की, या गावात भानुमतीसारखे हजारो लोक आहेत, ज्यांच्याकडे आपली कोणतीही ओळख नाही. कतर्निया प्रदेशातील हे लोक समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जंगलात राहत होते. या लोकांना कोणत्याही सरकारी योजनाच लाभ मिळत नसे आणि त्यांची मुलेही शाळेत जाऊ शकत नसत. २००७ साली वनवासी आणि वन निवासी अधिनियम लागू होऊनही येथील लोकांना जमिनीवर मालकी हक्क मिळालाच नव्हता.

 

येथील लोकांना सर्वप्रकारच्या सरकारी योजनांचा लाभ मिळावा, मूलभूत अधिकार प्राप्त व्हावे, यासाठी डॉ. जितेंद्र चतुर्वेदी यांनी इथेच काम करण्याचे ठरवले आणि ‘देहात’ नावाची संस्था सुरू केली. कतर्निया प्रदेशातील वनवासींचे आयुष्य बदलण्याच्या दिशेने त्यांनी या माध्यमातून काम सुरू केले. चतुर्वेदी यांनी माहितीचा अधिकार, मानवाधिकार आणि मानव तस्करी या मुद्द्यांना प्राधान्य देत काम केले आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे या वनग्रामातील लोकांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात परिवर्तन आले. आता इथे चार प्राथमिक शाळा, दोन माध्यमिक विद्यालये सुरू झालेली पाहायला मिळतात. येथील रस्त्यांवर सौरऊर्जेवरील दिवे लावले आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवले जात आहे. बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून लसीकरणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत आणि लोकांना येथील जमिनीवर मालकी हक्कही मिळाला आहे. एवढेच नव्हे, तर नव्या युगाचे नवे तंत्रज्ञान म्हणजे इंटरनेट. येथील गावांमध्ये आता इंटरनेटची सुविधाही पोहोचली आहे. या प्रत्येक कामामागे आहे डॉ. जितेंद्र चतुर्वेदीयांनी केलेले श्रम आणि येथील लोकांना मूलभूत सुविधा मिळण्यामागची त्यांची तळमळ. बहराइचच्या कतर्निया प्रदेशात गेल्यावर आपल्याला याची प्रचिती येते. आज वनवासी, जंगल प्रदेशातील लोकांच्या आडून देशविघातक शक्ती आपली कुटील कारस्थाने पूर्णत्वास नेण्यासाठी दबा धरून बसलेल्या असतानाच डॉ. जितेंद्र चतुर्वेदींनी केलेले कार्य आदर्शवत ठरावे असेच आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/