पाणीटंचाईग्रस्तांच्या आयुष्यातील ‘उल्हास’

    दिनांक  25-Sep-2018   


 

‘पाणी’ आणि ‘पैसे’ या अशा दोन गोष्टी आहेत की, ज्या स्वत: साठवल्या तर त्याचा वापर पिढ्यान्पिढ्या करता येतो. पाणी वाचवले तर पैसा तयार होऊ शकतो, हे लक्ष देऊन काम करणारे उल्हास परांजपे.


कुणाच्या हातून कोणते सत्कृत्य होईल, हे कदाचित त्या व्यक्तीलाही माहिती नसते. पण, अचानक आकाशात वीज चमकावी आणि त्या एका शलाकेने वातावरणात अगणित बदल करावेत, तसेच माणसाच्या जीवनातही होते. तसेच उल्हास परांजपेंच्या बाबतीत झाले असे नक्कीच म्हणता येईल; नाहीतर सामाजिक आणि आर्थिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्याही उत्तम परिस्थिती लाभलेल्या उल्हास परांजपे यांना गावोगावी ‘पाणी वाचवा पाणी साठवा’ म्हणत प्रत्यक्ष कृती करण्याची तशी गरजच नव्हती. पण, तो प्रसंग घडलाच...

 

कोकणातील पालगडमधील त्यांच्या नातेवाईकाची गावात चांगली जमीन, पण ती ओस पडलेली. शेती केली, तर जमिनीचा उत्तम वापर होईल, असे सुचिन्ह. पण, त्या जागेवर नातेवाईक शेती का करत नाही? असा प्रश्न उल्हास परांजपेंना पडे. त्यामुळे नेहमी ते तो प्रश्न नातेवाईकांना विचारत असत. खूपदा नातेवाईक विषय टाळे किंवा दुर्लक्ष करे. पण एकेदिवशी त्यांनी गंभीरपणे उत्तर दिले, “अरे मुंबईत इंजिनिअर बनून मला शेतीभातीच्या गोष्टी सांगतोस. जमिनी तर भरपूर आहे. अंगात ताकद आणि मनात इच्छा पण आहे शेती करायची. पण, शेतीला पाणी आणू कुठून? इतकं बोलतोस तर पाणी आणून दे. देऊ शकतोस का? पाणी टिकतंच नाही. तर तू तरी कुठून देणार?” त्यांच्या या प्रश्नावर उल्हास निरूत्तर झाले; पण निराश झाले नाहीत. नातेवाईकाच्या प्रश्नामध्ये त्यांना पाणीटंचाईची भीषणता सोसणाऱ्या समाजाच्या प्रश्नाची उकल करण्याचे वेध लागले. तेथूनच सिव्हील इंजिनिअर असलेले उल्हास परांजपे पाण्याचे संवर्धन करणारे जलसंवर्धक बनले.

 

परांजपे कुटुंब हे मुळचे रत्नागिरीमधील दापोली तालुक्यातील शेरवली गावचे. साधारण १९४०च्या सुमारास मुकुंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी मालती परांजपे गावाहून मुंबईत आले. मुंबईमध्ये सातरस्त्याच्या मीलमध्ये मुकुंद काम करत. त्यांना चार मुलं आणि एक मुलगी. त्यापैकीच एक मुलगा उल्हास. मुकुंद यांना माहितीही नसेल की ज्या मुलाचे नाव ‘उल्हास’ ठेवले, तो पुढे पाण्याच्या दुर्भिक्ष्याने हतबल झालेल्या बळीराजाला पाणी वापराची जादू शिकवून त्यांच्या आयुष्यात ‘उल्हास’ आणेल. असो, उल्हास वयाच्या अकराव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. पुढे उल्हास सिव्हील इंजिनिअर झाले. बांधकाम व्यवसायात त्यांनी कारकिर्द केली. समाजामध्ये वावरताना त्यांना नेहमीच वाटे की निसर्गाने माणसाला भरभरून दिले आहे. कोकणचेच उदाहरण घेतले, तर कोकण निसर्गसंपन्न आहे. जमिनीचा वापर योग्य केला, निसर्ग साधनसंपत्ती नीट वापरली तर कोकणातील माणसाला चाकरमानी म्हणून गाव सोडावं लागणार नाही. त्यामुळे गावातल्या गावात एक व्यक्ती आणि त्याचे कुटुंब कसे संपन्न होईल यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. जो मागेल त्याला पाणी मिळवून देऊ असा त्यांचा मंत्र होता. या मंत्राचे तंत्र सोपे आहे. समजा, १ एकर म्हणजे चार हजार चौरस मीटर जमीन आहे. त्या जमिनीवर तीन मिमी पाऊस पडतो. म्हणजे ते चार हजार चौरस मीटर गुणिले तीन मिमी पाणी केले, तर जवळ जवळ १२ हजार घन मीटर म्हणजे एक कोटी २० लाख लीटर पाणी त्या जमिनीवर पडते. इतके पाणी जाते कुठे? गटारं, नद्या, नाल्यांत का समुद्रात? हे पाणी वापरले तर? हे पाणी साठवण्यासाठी जमिनीखाली किंवा जमिनीवर टाक्या बांधल्या, तर पाणी साचून राहील. शेतीसाठी ते उपयोगी ठरेल. त्यांनी लोकांना ‘पाणी साठवा पाणी वाचवा’ विषयी जागृती करण्यास सुरुवात केली. पण लोक दाद देत नव्हते.

 

पाऊस पाडणे हे देवाचे काम आणि पाणी पुरवणे हे सरकारचे काम, असे लोकांच्या मनात ठाम. पाणी साठवण्यासाठी टाकी बांधावी लागते. त्यासाठी पैसे लागतात. लोक पैसे खर्च करायला तयार नव्हते. उल्हास लोकांना सांगत, मुंबईमध्ये नळ सुरू केले की पाणी येते. यात काही जादू नाही. वर्षभर पाणीपुरवठा करता येईल इतके पाणी सात धरणांत साठवले जाते. वेगवेगळया जागी साठवले जाते. ते साठवलेले पाणी वर्षभर मुंबई पुरवून पुरवून वापरते. तुम्ही पण असे करू शकता. खर्च करण्याची ऐपत नसेल तर ५० टक्के खर्च मी उचलतो. पण बाबांनो, पाणी साठवा. नि:स्वार्थी भावनेने केलेली कळकळीची विनंती माणसाच्या हृदयाला भिडतेच. ठिकठिकाणी मग उल्हास यांनी ‘जलवर्धिनी’च्या माध्यमातून पाणी साठवण्याच्या टाक्या बांधल्या. शेकडो लोक पाणी साठवून शेती करू लागले. इतकेच नव्हे, तर गरजूंना पाणी वाचवण्याचे तंत्रही विनामूल्य शिकवले आणि त्यांच्या जीवनात ‘उल्हास’ आणला. उल्हास यांची या कार्यामागील प्रेरणा काय असावी, असे विचारले असता; ते म्हणतात, “संघाच्या शाखेत घडताना मला राष्ट्रपुरुषांची आयुष्ये समजत गेली. त्यापैकी एकनाथ रानडे. आयुष्यभर त्यांनी एकच ध्येय ठेवले. एक एक रुपया गोळा केला आणि कन्याकुमारीचे ते भव्य विवेकांनद स्मारक उभे राहिले. तीच प्रेरणा आहे. मीही पाणी संवर्धन हे आयुष्याचे लक्ष ठेवले आहे.” उल्हास यांनी जलसंवर्धनाचा विषय जनमानसात रूजवला, नव्हे पाण्याच्या दुर्भिक्ष्याने हतबल झालेल्यांच्या जीवनात या उल्हासने ‘उल्हास’ आणला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/