दृष्टी पलीकडची स्वप्नं...

    दिनांक  25-Sep-2018   

 

 

 
 
 
 
उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या अंकुरने थेट झेप घेतली ती पॅरा ऑलिम्पिकमध्ये. तो धावपट्टीवर धावायला लागला की, तो दिव्यांग आहे याचा त्याला आणि त्याला पाहणाऱ्यांनाही विसर पडतो.
 

लेहरोंसे डरकर नौका पार नही होती, कोशिश करने वालों की

कभी हार नही होती।

 

या हरिवंशराय बच्चन यांच्या पंक्ती आपण शाळेत जरी पाठ केल्या असल्या तरी, याच ओळी नकळत आपल्याला जगण्याचा अर्थ शिकवतात. मात्र, प्रत्येकाचा आपल्या आयुष्यातील संघर्ष, दृष्टिकोन वेगळा असतो. अशाच एका अविरत संघर्षांतून, आपल्या जीवनाचा शिल्पकार बनलेला अंकुर धामा हा दिव्यांग खेळाडू. आपण आजवर अनेक खेळाडूंच्या मुलाखती ऐकतो, त्यांच्या संघर्षगाथा वाचून थक्क होतो. मात्र, ज्या खेळाडूला दृष्टीच नाही, तो खेळाडू केवळ आणि केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर जर आपली ध्येये साध्य करत असेल, तर असा खेळाडू हा जगावेगळाच असतो. वयाच्या केवळ सहाव्या वर्षी अंकुर दृष्टीहीन झाला. एवढ्या लहान वयात आपल्या मुलाला अंधत्व आलं, या विचाराने त्याची आई घाबरली. पण म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. तसेच काहीसं अंकुरच्या बाबतीतही घडलं. आपली दृष्टी गेली हे त्याला त्या वयात पचणं अर्थातंच सोप्पं नव्हतं; पण त्याच्या वडिलांनी त्याला या प्रवासात मोलाची साथ दिली. आयुष्यात काहीही मिळवायचं असेल, तर फक्त कठोर परिश्रम कर, असा कानमंत्रही दिला, ज्याचे आजही अंकुर अगदी न विसरता मनोभावे पालन करतो.

 

याच परिश्रमाच्या जोरावर उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात जन्मलेल्या अंकुरने थेट झेप घेतली ती पॅरा ऑलिम्पिकमध्ये. तो धावपट्टीवर धावायला लागला की, तो दिव्यांग आहे याचा त्याला आणि त्याला पाहणाऱ्या सगळ्यांनाच विसर पडतो. कारण, तो धावताना फक्त जिंकण्याच्याच विचाराने धावतो. अंकुरने आतापर्यंत ४०० आणि ८०० मीटर स्पर्धेतभारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारताला अनेक पदं मिळवून देणाऱ्या या दिव्यांग खेळाडूचा प्रवास मात्र अतिशय खडतर होता. ‘अंत भला, तो सब भला’ तसं काहीसं अंकुरच्या आयुष्यातही झालं. नुकताच अंकुरला सरकारचा ‘अर्जुन’ पुरस्कार मिळाला. क्रीडाविश्वात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो. मात्र, अंकुरचा प्रवास हा फक्त ‘उल्लेखनीय’ म्हणता येणार नाही. अंकुर आपल्या दिव्यांगपणाला आपली जमेची बाजू समजतो. तो म्हणतो, “मी पाहू शकत नाही, हे लहान असताना मला सहन व्हायचे नाही, पण ठीक आहे ना. निदान मी माझ्या आई-बाबांनापाहिले आहे आणि तसंही दृष्टी फक्त डोळ्यात असते असं कोण म्हणतं, मेरे तो दिल मे आंखे है।” त्याच्या या दृष्टिकोनाचा हेवा वाटावा तेवढा कमी. त्यामुळे अंकुरला दृष्टीची साथ नाही, यावर अजिबात विश्वास बसत नाही.

 

लहानपणी जो सण सर्वांच्या आयुष्यात रंगाची उधळण करतो, त्या होळी या सणाने मात्र अंकुरच्या आयुष्यात कायमचा अंधार आणला. होळीच्या रंगांमुळे वयाच्या सहाव्या वर्षी त्याची दृष्टी गेली. त्याच्या शिक्षकांच्या सांगण्यावरून अंकुरला त्याच्या घरच्यांनी दिल्लीला दिव्यांगांच्या शाळेत टाकले. अंकुर शाळेत असल्यापासूनच खेळात आघाडीवर होता. शाळेत असतानाच त्याने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळांमध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली. २००८ साली झालेल्या ‘इंडियन ब्लाइंड्स असोसिएशन’च्या राष्ट्रीय स्पर्धेत ४०० आणि ८०० मीटरची स्पर्धा अंकुरने एक मिनीट आणि १० सेकंदांत पार करून विक्रम केला आणि हा विक्रम आजतागायत अंकुरच्याच नावावर आहे. २००९ साली त्याने प्रथम आंतरराष्ट्रीय युथ अॅण्ड स्टुडंट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. मात्र, २०१६ साली तीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत अंकुरसारख्या अंध खेळाडूने भारताचे प्रतिनिधीत्व केले आणि अंकुरचं नाव सगळ्या वर्तमानपत्रात झळकलं. आजही त्याच्या वडिलांनी ती सगळी वर्तमानपत्रे जपून ठेवली आहेत. मात्र, २०१६च्या या स्पर्धेत अंकुर दीड हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुसऱ्या स्थानी असूनही त्याला मूळ खेळात पात्र करता आले नाही. मात्र, आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याला प्रायोजक न मिळाल्याने कितीतरी स्पर्धांना मुकावे लागले. नंतर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सतपाल सिंह यांनी अंकुरच्या प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारली आणि मग त्यानंतर अंकुरने मागे वळून कधीच पाहिले नाही. तो आपल्या यशाचे शिखर चढत गेला.

 

२०१४ साली अंकुर हा पहिला दिव्यांग खेळाडू ठरला होता, ज्याने फुटबॉल या खेळातही भाग घेतला आणि त्याने एक गोलही नोंदविला. अंकुर आपल्या प्रवासाचे श्रेय आपल्या वडिलांना आणि त्याचे गुरू सतपाल सिंग यांना देतो. मात्र, एका गोष्टीची खंत त्याला आजही आहे, ती म्हणजे, “एखाद्या स्पर्धेत पदक मिळवल्यानंतर, आपल्या देशाचा राष्ट्रध्वज जेव्हा हळूहळू वर जात असतो, तो क्षण मात्र त्याला पाहता येत नाही. मात्र, राष्ट्रगीतातून प्रेरणा मिळते आणखी मेहनत करण्याची.” अंकुरची ही जिद्द आणि त्याचा आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन हा आताच्या पिढीतील तरुणांना नक्कीच स्फूर्ती देणारा आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/