फेसबुकवरही डेटिंग!

    दिनांक  24-Sep-2018   


 


प्रेम हे असं नियोजित नसतं. ते नैसर्गिक....निखालस...निर्मळ असतं. ते समोरच्या व्यक्तीच्या स्टेटसमध्ये नाही, तर तुमच्या समोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यातच दिसतं. तेव्हा, प्रेमासाठीची व्यर्थ धडपड नकोच, असे मनोमन ठरवलले बरे आणि त्यातही ऑनलाईन मैत्री, प्रेम, विवाह याच्या मायाजालात न अडकणे कधीही सोयीस्करच.

 

प्रेमाच्या पवित्र नात्याच्या रेशीमगाठी या स्वर्गात साक्षात देवच बांधून आपल्याला पृथ्वीवर पाठवतो, असे अगदी लडिवाळपणे बोलले जाते. पण, सध्या जमाना बदललाय. आजचा जमाना हा ऑनलाईन पिढीचा...लाईव्ह चॅटचा आणि ‘झट मंगनी पट विवाह’चा. सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर अशाप्रकारे आपला जोडीदार शोधण्यासाठी, डेटिंगसाठी हल्ली अगदी सर्रास केला जातो. डेटिंगसाठीच्या स्वतंत्र साईट्स आणि भरपूर मोबाईल अॅप्सही उपलब्ध आहेत. भारतातही या साईट्स, अॅप्सची चांगलीच चलती आहे. त्यात मॅट्रिमोनियल साईट्सही म्हणा अगदी आघाडीवर. तेव्हा, या सगळ्या गोतावळ्यात आता भर पडणार आहे, ती फेसबुकच्या डेटिंग फिचरची.

 

होय, फेसबुकने प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू केली आहे कोलंबिया या द. अमेरिकेतील देशामध्ये. कारण, कोलंबियामध्ये फेसबुक वापरकर्त्यांची संख्या जास्त आहेच, शिवाय कोलंबियाच्या नेटकरींचा डेटिंग साईटवर फारच जीव. कारण, एका सर्वेक्षणानुसार, कोलंबियामध्ये डेटिंग साईट्स आणि अॅप्सवर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या ही सर्वाधिक आहे. म्हणजे, जीवनाचा जोडीदार आपल्या भोवताली मिळेल, यापेक्षा तो या असल्या साईट्सवर ऑनलाईन असेल, यावर भुलणारे हे कोलंबियाचे नागरिक. एकट्या कोलंबियामध्ये फेसबुक वापरकर्त्यांची संख्या ही २१ दशलक्षच्या घरात आहेत, हे विशेष. त्यामुळे फेसबुक डेटिंगवर किती कोलंबियन्स भाळतात, हे आगामी काळात कळेलच. पण, हजारो डेटिंग साईट्स आणि अॅप्स असताना फेसबुकला असे स्वतंत्र फीचर सुरू करण्याची मुळी गरजच काय, असा प्रश्न पडतो. याचे उत्तर मार्क झुकेरबर्ग यांनी मे महिन्यातच यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला दिले होते. इतर डेटिंग साईट्सपेक्षा वापरकर्त्यांना फेसबुकच्या या विशेष डेटिंग फीचरवर विशेष सुरक्षा प्रदान करण्यात येईल. फेसबुकसोबतच हे फीचर वापरता येणार असले तरी फेसबुकवरील मित्रांची, नातेवाईकांच्या यादीची यामध्ये सरमिसळ होणार नाही, याची विशेष खबरदारीही घेतली जाईल. इतकेच नाही, तर तुमच्या आवडी-निवडींना अगदी ‘मॅच’ करणारे जोडीदारच तुम्हाला प्राधान्याने दिसतील. विशेष म्हणजे, कोणतीही अनोळखी व्यक्ती तुमच्या परवानगीशिवाय तुम्हाला कुठलाही फोटो किंवा व्हिडिओ पाठवू शकणार नाही, जेणेकरून फेसबुकच्या मते, फसवणुकीचे प्रकार होण्याची शक्यता कमी होते.

 

झुकेरबर्गच्या मते, हे फीचर फक्त टाइमपास म्हणून प्रेम शोधणाऱ्यांसाठी नाही, तर ज्यांना खऱ्याखुऱ्या आयुष्यात जीवनभराचा सोबती आहे, त्यांच्यासाठी विशेषत्वाने डिझाईन केले आहे. तसे झाल्यास उत्तमच! पण, सध्याचे ऑनलाईन डेटिंगचे विदारक चित्र पाहता, याकडे कितपत सकारात्मकतेने पाहावे, हाच खरा प्रश्न उपस्थित होतो. कारण, विक्षिप्त, समाजविघातक प्रवृत्ती अशा प्रकारे जोडीदार शोधणाऱ्यांना ऑनलाईन आपल्या जाळ्यात केव्हा फासतात, ते खुद्द त्यांनाही कळत नाही. त्यामुळे फेसबुकच्या डेटिंग सेवेने ऑनलाईन डेटिंग अगदी सुरक्षित, विश्वासार्ह होईल, असे अजिबात नाही. त्यामुळे तरुणाईने आपले प्रेम असे कीबोर्डच्या शब्दांत आणि सेल्फीच्या फोटोंमध्ये शोधत बसू नये, एवढेच. कारण, अखेरीस प्रत्येक व्यक्ती ही लोकांना मी कसा आवडेन, यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या प्रयत्नशील असतेच आणि ऑनलाईन ‘अवतारां’च्या आजच्या जमान्यात असे ढोंग करणारे तोतयेही फारच सोकावलेत. तेव्हा, भारतात फेसबुकचे हे डेटिंग फीचर येवो अथवा न येवो, भारतातही इतर डेटिंग साईटवर खरं प्रेम वगैरे शोधणाऱ्यांनी त्यापेक्षा आपला अभ्यास, आपलं करिअर याकडेच अधिक लक्ष द्यावं. कारण, प्रेम असं शोधून तर मुळीच सापडत नाही. त्यासाठी तुम्हाला चोवीस तास ऑनलाईन शोधाचीही गरज नाहीच मुळी. प्रेम हे असं नियोजित नसतं. ते नैसर्गिक....निखालस...निर्मळ असतं. ते समोरच्या व्यक्तीच्या स्टेटसमध्ये नाही, तर तुमच्या समोर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यातच दिसतं. तेव्हा, प्रेमासाठीची व्यर्थ धडपड नकोच, असे मनोमन ठरवलले बरे आणि त्यातही ऑनलाईन मैत्री, प्रेम, विवाह याच्या मायाजालात न अडकणे कधीही सोयीस्करच. कारण, स्क्रीनच्या पलीकडचा खरा चेहरा कसा असेल कोणास ठाऊक...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/