बाप्पा चालले गावाला

23 Sep 2018 11:04:51
 

 

मुंबई : आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत लाखो भाविकांनी मुंबईसह राज्यभरातील गणेश विसर्जनाला सुरुवात केली आहे. १० दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर रविवारी सकाळपासून नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. मुंबईतील गणेशगल्लीचा राजा, लालबागचा राजाची मिरवणूक वाजत-गाजत निघाली आहे.
 
 
 
दरम्यान, डीजेवरील बंदीमुळे यंदा ढोल-ताशा आणि बेंजोच्या तालावर विसर्जन मिरवणूका निघणार आहेत. विसर्जन स्थळांशिवाय लालबाग, काळाचौकी, परळ येथे मोठ्या संख्येने सकाळपासून गणेशभक्त जमा झाले आहेत. कॉटनग्रीनच्या राजानंतर मुंबईचा राजा गणेशगल्ली आणि त्यामागून लालबागचा राजा निघेल. याशिवाय टाळ्यांच्या तालावर शिस्तबद्धपणे निघणारी चिंचपोकळीच्या चिंतामणीची विसर्जन मिरवणूक नेहमीच आकर्षण ठरते. मुंबईच्या राजासह लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, काळाचौकीचा महागणपती या गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टीसाठी येथील श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाने भव्य अशी छत्रपती शिवाजी महाराजांसह रामदास स्वामींची प्रतिकृती तयार केलेली आहे. विसर्जन स्थळांवर कोणत्याही प्रकारची गडबड होणार नाही, तसेच येथील सुरक्षेसाठी हजारो पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महापालिकेनेही विसर्जनाचे नियोजन केले असून कोणत्याही प्रकारची अडचण भक्तांना होणार नाही यासाठी पोलीस, गृहरक्षक दल आणि मंडळांचे कार्यकर्ते सज्ज आहेत.
 
 
 
      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
 
Powered By Sangraha 9.0