महिला सुरक्षा बळकट करण्यासाठी सुरु केले २ पोर्टल्स

21 Sep 2018 16:06:30



मुंबई: केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत महिलांच्या सुरक्षेसाठी दोन वेगवेगळी पोर्टल्स सुरु केली आहेत. “cybercrime.gov.in” या पोर्टलवर लहान मुलांच्या लैंगिक शोषण, बलात्कार आणि सामूहिक बलात्कारासंबंधी ऑनलाईन आक्षेपार्ह मजकुराबाबत नागरिकांकडून तक्रारी स्वीकारण्यात येतील. यात तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाईल. लैंगिक गुन्हेगारांसंबंधी राष्ट्रीय डेटाबेस (एनडीएसओ) केवळ कायदा अंमलबजावणी संस्थांना वापरता येईल. यामुळे लैंगिक अपराधांचा शोध आणि तपास यात मदत होईल. या पोर्टलमुळे महिलांविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह ऑनलाईन मजकुराला आळा घालण्यास मदत होईल.

 

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांमधील अधिकाऱ्यांना संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, महिला आणि लहान मुलांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. गुरुवारी सुरु करण्यात आलेली दोन पोर्टल्स महिला आणि बालकांची सुरक्षा अधिक बळकट करण्याच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग आहे. या दोन्ही पोर्टल्सचा पूर्ण क्षमतेने वापर करून नियमितपणे माहिती अद्ययावत करावी असे आवाहन त्यांनी केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0