मासेमारीवरुन मारामारी

    दिनांक  20-Sep-2018   
आफ्रिका खंड हा उपासमारी आणि कुपोषण या दोन कारणांमुळेच सदैव चर्चेत असतो. पण, या खंडातील कितीतरी देश शेती, मासेमारी यांसारख्या पारंपरिक उद्योगांमध्येही अग्रेसर आहेत. आफ्रिका खंडातील कांगो आणि युगांडा या दोन देशांमध्ये सध्या युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तीही माशांमुळे.

 

जगात तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल, असं म्हटलं जातं. पण जगात खरंच, कितीतरी ठिकाणी आधीच या तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडली आहे. अशीच परिस्थिती आहे ती आफ्रिका खंडातल्या काही देशांची. आफ्रिका खंड हा उपासमारी आणि कुपोषण या दोन कारणांमुळेच सदैव चर्चेत असतो. पण, या खंडातील कितीतरी देश शेती, मासेमारी यांसारख्या पारंपरिक उद्योगांमध्येही अग्रेसर आहेत. पण कोणाला ठाऊक होते, हेच पारंपरिक उद्योग या खंडातील दोन देशांच्या जिवावर बेततील. आफ्रिका खंडातील कांगो आणि युगांडा या दोन देशांमध्ये सध्या युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तीही माशांमुळे. याआधी सीमावादामुळे युद्ध झाल्याचे आपल्या ऐकिवात आहे, पण या दोन शेजारी देशांमधील मासेमारीवरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही देशांतील सैनिकांनी एकमेकांवर गोळीबार केला. यात पाच जणांचा मृत्यूही झाला. मात्र, हा खरा वाद माशांचा नाहीच, तो आहे पाण्याचा. या दोन्ही देशांच्या सीमेवर एडवर्ड आणि अल्बर्ट नावाचे दोन तलाव आहेत. अगदी पूर्वीपासून दोन्ही देश या तलावांचा वापर मासेमारीकरिता करत आले आहेत. अगदी गुण्यागोविंदाने नांदणारे हे देश आता एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. सध्या या दोन्ही देशांमधले संबंध एवढे बिघडले की, त्याचे परिणाम युरोपातील देशांनाही भोगावे लागत आहेत. मात्र, एडवर्ड आणि अल्बर्ट या दोन्ही तलावांचा सर्वाधिक भाग कांगो देशाने व्यापलेला असल्यामुळे या तलावावर कांगोने आपला एकाधिकार गाजवायला सुरुवात केली. विशाल अशा या दोन तलावांमुळे या देशांतील परिस्थती इतकी चिघळली की, दोन्ही देशातील लष्कर आणि राजकीय पक्षांना हस्तक्षेप करावा लागला. या दोन्ही देशांच्या वादंगामुळे दोन सैनिक आणि तीन नागरिकांना यात आपला जीव गमवावा लागला.

 

मुळात या वादाला सुरुवात झाली ती, युगांडामध्ये दडी मारलेल्या पावसाने. त्यामुळे युगांडात माशांची कमतरता जाणवू लागली, याकरिता तिथल्या मासेमारांनी एडवर्ड आणि अल्बर्ट या तलावातून कांगोची परवानगी न घेता, बेकायदेशीररित्या मासेमारी करण्यास सुरुवात केली. याचा फटका बसला तो, कांगोतील मच्छिमारांना. या एकूणच गोंधळामुळे कांगोने तर सरळ या तलावांवर फक्त आमचा अधिकार आहे, असे परिपत्रकच युगांडाला पाठवले आणि तरीही जर बेकायदेशीररित्या मासेमारी चालू राहिली, तर त्याचे परिणाम वाईट होतील, अशी सोबत अप्रत्यक्ष धमकीही दिली आणि या धमकीत तथ्य आहे, हे दाखविण्यासाठीच कांगोच्या लष्कराने युगांडातील काही भागात छोटे हल्लेदेखील केले. या सगळ्यामुळे युगांडातील मच्छीमारांवर बेकारीची कुऱ्हाड तर कोसळलीच, पण काही निष्पाप नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आणि मग स्वाभाविकपणे शहरात माशांचा तुटवडा झाला. युगांडामधून माशांची मोठ्या प्रमाणावर निर्यातही होते. एवढेच नाही तर, युगांडाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात मत्स्य उत्पादनाचा हिस्सा सुमारे ३ टक्के आहे. या सगळ्यामुळे युगांडाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाला जबर फटका बसला. एडवर्ड आणि अल्बर्ट हे दोन्ही तलाव विविध प्रकारच्या माशांसाठी प्रसिद्ध आहेत. यात कॅटफिश, टिलापिया आणि नाइल पर्च यांसारखे मासे मोठ्या प्रमाणावर आढळतात. त्यामुळे युरोपियन देशात या माशांना बरीच मागणी आहे. युगांडातून या युरोपियन देशांना माशांची निर्यातही केली जाते. त्यामुळे मासेमारी करू न शकल्याने युगांडा देश मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. या दोन देशातील वादंगामुळे मासेमारीच्या निर्यातीमध्ये घट झाली आहे. आता या दोन्ही देशांनी या तलावांवर हक्क सांगत एकमेकांवर बंदुका रोखल्या. त्यामुळे आता हा पाणी प्रश्न सोडविणे अजून कठीण झाले आहे. या सगळ्यामुळे या दोन देशांतील आर्थिक, राजकीय परिस्थिती बदलली आहे. या सगळ्या वादात बऱ्याच घटकांचा समावेश असला तरी, खरी सुरुवात झाली ती पाण्यामुळेच. या पाण्यामुळेच दोन देशांमधील संबंध कलूषित झाले आहेत. तेव्हा, आगामी काळात हा वाद अधिकाधिक चिघळू न देता दोन्ही देशांना चर्चेतून, सामोपचाराने या समस्येतून मार्ग काढावा लागेल. तलावामध्येही सीमा अंकीत कराव्या लागतील. कारण, मासेमारीवरुन दोन देशांत होणारे वाद काही नवीन नाहीत. पण, याचा नाहक फटका मच्छिमारांना सहन करावा लागतो. बरेचदा सीमापार चुकून मासेमारी केल्यामुळे त्यांना अटक होते आणि वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडावे लागते. म्हणून कांगो आणि युगांडा या संदर्भात मध्यम मार्ग काढतील, अशी अपेक्षा.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/