राजकारणाची नजर आणि नजरेतलं राजकारण

    दिनांक  19-Sep-2018   

 
 
तशा निवडणुका अजून दूर आहेत. म्हटलं तर त्या पुढच्या वर्षी आहेत. मात्र आतापासूनच सारेच निवडणुकांच्या दृष्टीने कामाला लागले आहेत. राजकीय पक्ष आणि नेते, कार्यकर्ते कामाला लागणे किंवा त्यांनी वर्तमान घडामोडी व त्याचा नजिकच्या भविष्यावर होणारा परिणाम (अर्थात मतदारांच्या मानसिकतेवर) याचा अंदाज लावायला सुरुवात करणे, यात काही गैर नाही. सात-आठ महिन्यांवर सार्वत्रिक निवडणुका आल्या असताना हा काळ काही फार मोठा नाही. आम्ही तर ही निवडणूक झाली अन् नवे सरकार सत्तेवर आले की पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झालेली असते. ती सरकार स्थापन करणार्या पक्षाची नाही किंवा विरोधकांचीही नाही, तर जनताच आतापासून पुढच्या निवडणुकीचा विचार सुरू करीत असते. 2014 मध्ये नव्या विचारांचे आणि आचारांचेही सरकार जनतेने निवडून दिले आणि तेव्हाच जनतेत चर्चा सुरू झाली की 2019 मध्ये काय होणार? त्यामुळे आता 2019 हातातोंडाशी आले असताना ती चर्चा जोर धरणे अगदी लाजमी आहे.
 
 
मुळात आमचे सामान्य म्हणतात त्या आयुष्याचेच राजकीयीकरण झालेले आहे. यात समाजातील अन्य वरचे घटकही आलेच. प्रत्येक माणूस तो अगदी सरकारी अधिकारी असो, व्यापारी असो की उद्योगपती त्याची विचार करण्याची शैली राजकारणीच आहे. असे म्हणतात की, दोन माणसे एकत्र आलीत की राजकारण सुरू होते. वास्तवात माणूस एकटा असला तरीही त्याच्या मनाच्या रंगमंचावर राजकारणच सुरू असते. करणी कवटाळे करणारा कुणीच नाही भेटला तरच अगदी स्वत:च्या मुलावरही करणी करतो, असे म्हणतात. मंत्र-तंत्र, जारण-मारण आहे की नाही त्यावर वाद असू शकतात. आतावर तसा अनुभव आला नाही. एकदा जुन्या पिढीतील जाणत्यांना आणि आजोबांनाही विचारले होते. त्यांच्याही आयुष्यात त्यांना करणी, मंत्र, राजण-मारण असा काही अनुभव आलेला नव्हता. ज्यांना आला असेल त्यांना विरोध करण्याचे किंवा त्याचा प्रतिवाद करण्याचे काही कारण नाही. मी भूत पाहिले नाही, कारण वर्तमानच सांभाळता सांभाळेना अन् अजूनही भविष्य नीट दिसत नाही, अशा माणसाच्या वाट्याला भूत जात नसावे... विषय थोडा बदलला; असे वाटते की करनाटक्यासारखाच सामान्य माणूसही एकटाही असला की मग स्वत:शीच राजकारण करीत असावा. माणसं साधी राहू शकत नाहीत. चाली, प्रतिचाली, शह-काटशह असे सुरूच असते. सरळ झाडे कापली जातात तशीच सरळ माणसेदेखील कापलीच जात असतात. अनेकदा अपयशी माणसाची संभावना लोक ‘खूपच साधा माणूस’ अशी करतात. त्याला साध्या चालीही कळत नाहीत, म्हणून त्याची कीव करतात. त्याला अक्कल नाही, असेच खरेतर म्हणायचे असते.
राजकारण हा किमान भारतीय माणसाचा विरंगुळ्याचा विषय आहे. नव्हे; ती त्याची जगण्याची शैली आहे. तो कुठलीही कृती करण्याच्या आधी ती पोलिटिकली करेक्ट आहे का, याचा विचार करूनच करतो. त्याच्या या राजकारणी विचारात जात असतेच, धर्म असतो आणि इतर जे काय वर्गविग्रह करण्यासारखे विषय असतील, ते हमखास असतात. आपल्या हिताचा विचार त्यात अनुस्यूत असतो. आता या ‘आपल्या’चा विस्तार आणि संकोचही पुन्हा धर्म, जात, पंथ, प्रदेश असाच असतो. त्याच्या रोमांचित होण्याचे कारण राजकारणच असते. राजकारण हे मतदार म्हणून जो कर्तव्य बजावतो त्याच्या बुद्धीचा नव्हे तर भावनेचाच प्रश्न असतो. त्यामुळे राजकीय पक्ष आणि नेते जे राजकारण करतात ते भावनेचेच असते. खरेतर फ्रॉईड म्हणतो तसे सार्वजनिक आयुष्य हे अर्थकारणावर ठरत असते. मात्र नोटेवर कुणाचा फोटो असावा, यासाठी आमचे जीव वरखाली होत असतात. वास्तविक कुणाचाही फोटो असला तरीही त्या नोटेचे मूल्य बदलत नाही. मात्र आमचे राजकारण मूल्यांवर नाही तर किमतीवर असते. यार ‘आमचे’चा अर्थ कुठल्याही राजकीय पक्षाचे नव्हे; सामान्य माणसाच्या राजकारणाची ही मिमांसा आहे.
वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची तर तर्हाच न्यारी. जो तो जिथे कुठे वावरत असेल तिथे सत्तास्थानी पोहोचण्यासाठी आणि हस्तगत केलेली सत्ता टिकविण्यासाठी राजकारणच करत असतो. तसे करण्याला पर्याय नाही, असेच त्याला वाटत असते. आयुष्यातल्या अपयशाचे कारण आपल्याला चलाखी हे कौशल्य आत्मसातच करता आले नाही, असेच चिंतन असते. वि. स. खांडेकर म्हणाले होते, राजकारणात कपटालाच कौशल्य म्हणतात. आता त्यांचा काळ हा नेहरू- इंदिरा गांधी यांचा होता म्हणून त्यांनी ते राजकारण पाहूनच हे विधान केले, असाच राजकीय विचार आम्ही करू शकतो. वास्तवात त्यांनी हे विधान सामान्यांच्या राजकारण कपटाकडे पाहूनच केले असावे. साधेपणानं वागणार्या माणसाला लोक वेडा समजतात. साधेपणाचा आदर आम्ही करणे कधीचेच सोडून दिले आहे. साधेपणाच्या आवरणाखाली राजकारणी वागणूक करणार्याचा उदोउदो केला जातो. तो आदर्श असतो आमचा. कुणी साधेपणाने वागत असेल तर त्याच्या त्या वागण्यामागेही नक्कीच काहीतरी राजकारण असलेच पाहिजे, असाच विचार केला जातो अन् त्या साध्या माणसाला अचानक प्रतिडावाचा सामना करावा लागतो. कारण माणूस कुठल्याही स्थितीतला असो, त्याला सत्ता हवी असतेच. सत्तेचे पद कुठेही असू शकते. एकतर सत्ता हवी असते किंवा सत्तेच्या जवळ तरी त्याला असायचे असते. त्यातून स्पर्धा निर्माण होते. याला वयाचेही बंधन नाही. आशा आहे, अपेक्षा आहे तोवर राजकारण आहे.
सामान्य म्हणवणारा माणूस इतका कुशाग्र राजकारणी आहे की त्याच्या कुठल्याही क्षेत्रात तो राजकारण खेळत असतो. असे असताना राजकारणाच्या नावाने तो नाके मुरडतो. राजकारण्यांची संभावना तो भ्रष्ट, घाणेरडे, असुसंस्कृत अशीच करतो. मला राजकारणाचा कसा तिटकारा आहे, हे सांगण्यात अन् तसे दाखविण्याची अहमहमिका लागलेली असते. त्यावेळी त्याच्या डोक्यात केवळ देशाची राजकीय सत्ताच असते. अगदी कुटुंबापासून संस्कृती आणि कलेच्याही क्षेत्रांतले जे काय चालले असते त्याला तो राजकारण समजतच नाही. राजकारण्यांचा तिटकारा करत असताना अन् तो भ्रष्टाचाराचा घाणेरडा नाला आहे, असे समजत असताना ती घाण आम्ही केलेलीच नाही, असाच त्याचा आव असतो. राजकारणाची घाण कुणी केली? नेत्यांच्या नावाने बोटे मोडत असताना अन् राजकारणाचा तिटकारा दाखवित असताना माणसं त्यांची पापं उजळून घेण्यासाठी त्यांच्याचकडे जातात. देशासाठी, समाजासाठी त्यांच्याकडे कुणी गेल्याचे आठवत नाही. तसा देखावा मात्र सामान्य म्हणवणारी माणसे अत्यंत उत्तम करतात. म्हणजे माझ्या घरासमोरची नाली साफ नसली तर मला शहरांत घाण पसरली आहे आणि शहराचे सत्ताधारी झोपले आहेत, असे वाटते. त्यासाठी मी कल्ला करतो अन् ती नाली साफ झाली की शहर स्वच्छ झाल्याचे वाटते. तसे हेही साधेच म्हणायला हवे. कायदा तोडण्याचा किंवा कायद्याची बंधने आपल्यावर नसण्याची खासियत माझ्याही वाट्याला यावी, यासाठी आम्ही आमचा वाटा मागायला अन् सेलिब्रेटी स्टेटस मिळवायला राजकारण्यांकडे जात असतो.
 
‘आमदार काय कामाचा? माझा मुलगा (चुकून!) ड्रंक अँड ड्राइव्हमध्ये सापडला अन् आमदाराने त्याला सोडविलाही नाही.’ अशी आमची तक्रार असते. आपण मत दिले त्याच्या बदल्यात सार्वजनिक आणि खासगीही पापं करण्याचा अन् तीही भाग्यशाली ठरविण्याचा परवाना आम्हाला मिळावा, अशी आमची मागणी असते. आम्ही नेहमीच निवडणूक मोडवर असतो. देशात कशाच्या ना कशाच्या निवडणुका सुरूच असतात. काहीच नाही तर किमान सहकारी सोसायट्यांच्या किंवा संस्थांच्या तरी असतातच अन् मग तिथे राजकारण असते. ते टाळून आम्ही विचारच करू शकत नाही. तरीही राजकारण हे आमच्यासाठी घाण, आम्हाला त्यातले काहीच कळत नाही, असा आमचा तोरा! मग याहून दुसरे मोठे राजकारणी कपट दुसरे कुठले असेल?