‘गणेशोत्सव जगभरात पोहोचवण्यासाठी ब्रँडिंग करावे’

19 Sep 2018 16:50:01



 
 

गिरगाव चौपाटीवर पाहणी करताना भाजप नगरसेवक अतुल शाह आणि मान्यवर.

 

मुंबई : १२६ वर्षांचा वारसा असलेल्या हा सार्वजनिक गणेशोत्सव आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. मुंबईतील सर्वात मोठा गणेश विसर्जन सोहळा असूनही तो जगप्रसिद्ध झाला नाही. त्यामुळे गणेशोत्सव जगभरात पोहोचण्यासाठी ब्रँडिंग करावे, अशी मागणी भाजप नगरसेवक अतुल शाह यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली. दरम्यान गणेशोत्सव जगभरात पोहोचण्यासाठी ब्रँडिंग करण्याबाबत अतुल शाह यांनी आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. आयुक्तांना ही कल्पना आवडली असून ते सकारात्मक असल्याचे अतुल शाह म्हणाले.

 

अतुल शाह यांनी ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे की, मुंबईत खूपच मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेश विसर्जन सोहळा मुंबईसारखा कुठेच होत नाही. कमीत कमी ७००० ते ७५०० पेक्षा जास्त मोठ्या मूर्ती आणि हजारो छोट्या मूर्तींचे विसर्जन मुंबईच्या चौपाटीवर करण्यात येते. स्पेनमध्ये एकामेकांवर टोमॅटो फेकण्याचा उत्सव साजरा केला जातो. तो उत्सव जगप्रसिद्ध होतो, परंतु मुंबईतील सर्वात मोठा गणेश विसर्जन सोहळा असूनही जगप्रसिद्ध झालेला नाही. मुंबई शहरात अनेक गणपती प्रसिद्ध आहेत. यामध्ये लालबागचा राजा, मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीच्या विसर्जन मिरवणुकीची लाखो भाविक आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबईत गणेश विसर्जन सोहळ्यास येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गणेश विर्सजन सोहळ्याचे आपण ब्रँडिंग करू शकतो. गणेश विसर्जनाचे जागतिक स्तरावरील महत्त्व लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने गणेश विसर्जन सोहळ्याचे ब्रँडिंग करायला हवे. गणेश विसर्जनाचे मार्ग निश्चित करून गणेश महाविसर्जन महामार्ग नाव देऊन हा महामार्ग लाल रंगाचा केल्यास त्याबद्दल पर्यटकांमध्ये उत्सुकता निर्माण होईल. त्यांना गणेश महाविसर्जन महामार्गाबाबत कळेल. त्यांच्या माध्यमातून गणेशोत्सव जगभरात पोहोचेल. तसेच गणेशोत्सवाच्या वेळी येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना मार्गक्रमण करणे सोयीचे होईल. त्यामुळे जागतिक स्तरावरील महाविशाल श्रीमूर्ती विसर्जन सोहळा करण्याच्या दृष्टीने सुनियोजित पद्धतीने ब्रँडिंग करण्यात यावे.

 

पर्यटकांसाठी सुविधा

 

परदेशी पर्यटकांना गणेशोत्सवाचा आनंद घेता यावा यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबईतील गिरगाव चौपाटीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि मुंबई महानगरपालिकेतर्फे ऑनलाईन नोंदणी सुविधा, पिण्याचे पाणी, मोबाईल स्वच्छतागृहे, बससेवा आणि अल्पोपाहारासारख्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. गिरगाव चौपाटीवर ३०० हून अधिक व्यक्ती बसण्याची क्षमता असलेला सज्जा उभारण्यात येणार आहे. याद्वारे गणेशोत्सवाला आंतरराष्ट्रीय सोहळ्याचे स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच या निमित्ताने पर्यटकांना भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचा आणि परंपरांचा अभ्यास करता येईल आणि त्यात सहभागी होता येईल.

 

मुख्यमंत्री खुल्या बसमधून पाहणी करणार

 

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जन सोहळा २३ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या सोहळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटनमंत्री जयकुमार रावल खुल्या बसमधून पाहणी करणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
Powered By Sangraha 9.0