आजीबाईंच्या रूपातली गोल्डन धावपटू...

    दिनांक  18-Sep-2018   

 
 
 
वयाच्या १०२ व्या वर्षी सुवर्णपदक जिंकत, तरुणांनाही लाजवेल असा उत्साह, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असलेल्या मन कौर या आजींची ही अनोखी कहाणी.
 

“आम्ही तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले आहेत,” हे वाक्य आपल्याला ऐकिवात आहे, कारण आपल्या घरात आजी, आजोबांकडून सहज आपण हे कधी ना कधी तरी ऐकतोच, पण या वाक्यात किती तथ्य आहे, हे पंजाबच्या ’मन कौर’ यांच्याकडे पाहिले की कळते. म्हातारपण हे दुसरं बालपण असतं, असं म्हणतात. पण या आजींनी तर कहरच केला. वयाच्या १०२ व्या वर्षी मन कौर या आजीबाईंनी गोल्डन कामगिरी केली. चक्क जागतिक एथलेटिक्स स्पर्धेत त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि त्या फक्त धावल्याच नाही तर, त्यांनी भारतासाठी सुवर्णपदकही मिळवलं. मन आजींनी आपल्या प्रौढत्वावर मात करत जणू तरुणाईला लाजवेल, अशी कामगिरी केली.

 

 
पंजाबमधील पटियाला शहरात राहणाऱ्या या आजींनी याआधी २०१७ साली न्यूझीलंडमध्येही अशीच कामगिरी केली होती आणि १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं. या आजी वयाच्या १०२ वर्षीसुद्धा एकदम तंदुरुस्त आहेत. त्याचं कारण त्या स्वत: सांगतात, ”मी मानतच नाही की, माझं वय झालं आहे. माझ्यासाठी तर मी आजही तरुणच आहे आणि तरुण आहे की नाही हे फक्त वयावरून कुठे कळतं, मन तरुण असलं की, माणूसही सदैव तरुणच राहतो.” त्यांचे हे शब्द सगळ्यांसाठीच किती प्रेरणादायी आहेत. वयाच्या चौकटीत त्यांनी स्वत:ला कधीच बांधून ठेवलं नाही, उलट त्यांनी सतत नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. धावण्याच्या स्पर्धेत आपण भाग घेतला पाहिजे आणि यालाच त्यांनी आपलं क्षेत्र बनवलं. तेव्हा त्या ९३ वर्षांच्या तरुणी होत्या. त्यांना तरुणीच म्हणावं लागेल, कारण अशी ध्येयं ही ज्यांचं मन तरुण असतं त्यांनाच असतात. वय वर्षे १०० ते १०४ गटांतील स्पर्धकांच्या २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्या सगळी मेहनत कोणतीही कारणे न देता करायला लागल्या. कारण त्यांच्या मते, कारणं फक्त तीच माणसं देतात, जी मेहनतीला घाबरतात. त्यामुळे त्यांनी आपल्या खेळाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. या आजींनी जेव्हा सर्वात आधी या स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी १०० मीटरचे अंतर केवळ एक मिनिट आणि एक सेकदांत पार केले होते, हे पाहून त्यांचा मुलगा थक्कच झाला. मुलं मोठी झाली की, पालक निश्चिंत असतात, पण कौर कुटुंबाचं समीकरणच वेगळं. मन आजींना ही धावण्याची स्फूर्ती मिळाली, ती आपल्या ७८ वर्षीय मुलाकडून. कारण तेही उत्तम धावपटू आहेत.

 

 
मान यांच्या मुलाने वयाच्या ७० व्या वर्षी ज्येष्ठ नागरिकांची ऑलिम्पिक स्पर्धा मानल्या जाणाऱ्या वर्ल्ड मास्टर्स स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यानंतर या मायलेकाने एक नवा पायंडा रचला. आजीबाईंनी जेव्हा सर्वात पहिल्यांदा या स्पर्धेत सहभाग घेतला होता, त्यावेळी त्यांनी परत एक मिनिट आणि एक सेकंदात १०० मीटरचे अंतर पार केले होते. गुरुदेव असे त्यांच्या मुलाचे नाव असून त्यांनीही वर्ल्ड मास्टर्स स्पर्धेत सहभाग घेतला आहे. वर्ल्ड मास्टर्स या स्पर्धेला ज्येष्ठ नागरिकांची ऑलिम्पिक स्पर्धाच मानले जाते. या स्पर्धेेत सहभागी होणारे सर्व खेळाडू वयाने मोठे असले तरी, मान आजी यावर्षीच्या सर्वात वयस्कर खेळाडू होत्या. या मायलेकाच्या जोडीने, एकमेकांना तंदुरुस्त ठेऊन जगभरातीलअनेक स्पर्धांमध्ये ते सहभागी झाले. त्यांचा मुलगा आजही म्हणतो की, ”आई तिच्या खाण्यापिण्याच्या सवयी निश्चयपूर्वक पाळते. तेलकट अजिबात खात नाहीत, म्हणून कदाचित या वयातही आई सुदृढ आहे.” मान आजींनी आतापर्यंत एकूण १७ सुवर्णपदके कमावली आहेत. आता आपल्याला वाटेल, आता तरी त्या थांबतील पण असं नाहीये. त्यांना यापुढे ऑकलंडमध्ये होणाऱ्या २०० मीटर धावण्याच्या, २ किलो गटातील गोळाफेक आणि ४०० मीटर भाला फेकण्याच्या स्पर्धेतही सहभागी व्हायचं आहे. म्हणजे काय म्हणावं यांच्या इच्छाशक्तीला आणि क्षमतेला. लहान-लहान गोष्टींमुळे ध्येय नकारात्मक विचारांच्या आहारी जाणारी एक पिढी आणि दुसऱ्या या आजी.

 

 
मान यांचा आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच सकारात्मक आहे, त्या म्हणतात, ”या स्पर्धांचा मी मनापासून आनंद घेते. मला परत या ट्रॅकवर धावायचं आहे, मी धावणे कधीच सोडणार नाही. पुढील काळात ज्या काही स्पर्धा येतील, त्यात मी सहभागी होईन आणि स्वतःला सदैव तंंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करेन. माझ्या आयुष्यात पूर्णविरामाला जागा नाही.” त्यांचे हे शब्द प्रत्येकाला आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन देईल एवढं नक्की, पण अशा या आजीबाईंना मात्र सलाम...!

 

 
   माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/