आता आकाशही ठेंगणे...

    दिनांक  14-Sep-2018   

 

 

 
 
 
खरं पाहायला गेलं तर सौदीमध्ये विमान वाहतूक क्षेत्रात काम करायला महिलांना तशी बंदी नव्हतीच. इतर क्षेत्रांप्रमाणे त्या याही क्षेत्रात काम करू शकत होत्या. परंतु, एकूणच महिलांकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन त्यांना हवाईसुंदरी म्हणून काम करू देण्यापलीकडचाच!  
 
 
एकीकडे सुनीता विल्यम्ससारख्या महिला अंतराळवीरांनी अवकाशझेप घेत ‘हम किसीसें कम नही’चा संदेश जगभरात दिला, तर दुसरीकडे सौदीसारख्या रुढीवादी देशांत महिला बुरख्याआडच बुजत होत्या. अगदी घराबाहेर फिरण्यापासून ते घरात कसे, कोणासमोर वावरायचे यावरही अगदी कडक बंधनं. महिलांनी केवळ आणि केवळ ‘चूल आणि मूल’ सांभाळावे, इतकी ही संकुचित, पुरुषप्रधान विचारसरणी. परंतु, सौदीमध्ये मोहम्मद बिन सलमान राजे झाले आणि महिलांचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले, असेच म्हणावे लागेल. जूनपासून ते आतापर्यंत महिलांच्या सार्वत्रिक हितासाठी सलमान यांनी घेतलेल्या निर्णयांतून याची प्रचिती येते. आज सौदीच्या महिला मतदानाचा हक्क बजावू शकतात, गाडी चालवण्याचाही अधिकार त्यांना मिळाला. त्याचबरोबर पासपोर्ट काढण्यासाठी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्याच्या पूर्वपरवानगीचीही आता त्यांना गरज उरलेली नाही. इतकेच नाही, तर ‘व्हिजन २०३०’ अंतर्गत महिलांच्या व्यापक हितासाठी असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सलमान या पुढच्या काळातही घेताना दिसतील. त्यामुळे वहाबी सुन्नी इस्लाम ‘शरिया’च्या कायद्यान्वये कडकपणे पाळणाऱ्या सौदीमध्ये महिलांचे दिवस हळूहळू का होईना, परिवर्तनाच्या मार्गावर आहेत. सौदीमध्ये आता असाच एक महिलाहिताचा निर्णय घेण्यात आला. सौदीच्या एका विमान कंपनीने तब्बल महिलांची सह-वैमानिक आणि हवाईसुंदरी या पदांवर नियुक्ती करण्याचा निर्णय कालच जाहीर केला आहे. या विमान कंपनीच्या जाहिरातीवर लगोलग एक हजार महिलांनी नोकरीसाठी अर्जही दाखल केला. त्यामुळे आता रस्त्यावर वाहने चालविणाऱ्या सौदीच्या महिला विमानही उडवताना दिसल्या, तर आश्चर्य वाटायला नको.
 
 

खरं पाहायला गेलं तर सौदीमध्ये विमान वाहतूक क्षेत्रात काम करायला महिलांना तशी बंदी नव्हतीच. इतर क्षेत्रांप्रमाणे त्या याही क्षेत्रात काम करू शकत होत्या. परंतु, एकूणच महिलांकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन त्यांना हवाईसुंदरी म्हणून काम करू देण्यापलीकडचाच! म्हणजे, काही क्षणांसाठी विमानात बुरखा घातलेल्या हवाईसुंदरींचा विचार करून बघा. बुरखा घालून, फक्त डोळे दिसलेच, तर हवाईसुंदरी म्हणून काम करणे निश्चितच त्या महिलेसाठी आणि प्रवाशांसाठीही सोयीचे नाही. कारण, आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या विमानात परपुरुषांशी बोलणे, त्यांना खाद्यपदार्थ सर्व्ह करणे, त्यांच्या इतर काही अडचणी असल्यास त्यांचे निरसन करणे हे बुरख्यात, तोंड झाकून करणे शक्य नाही. संवादप्रक्रियेमध्ये त्याचा साहजिकच अडथळा निर्माण झाला असता. त्यामुळे इतकी वर्ष सौदीच्या विमानांमध्ये हवाईसुंदरी म्हणून त्यांच्याच देशातील महिला कधीही दिसल्या नाहीत. सौदीच्या विमान कंपन्यांमध्ये हवाईसुंदरी म्हणून फिलिपाईन्स तसेच द. आशियाई देशांमधून मोठ्या प्रमाणात महिलांचा भरणा आहे. पण, या एका विमान कंपनीच्या पुढाकारामुळे कदाचित आगामी काळात हे चित्र पूर्णत: बदललेले दिसू शकते.

 

‘फ्लायनास’ नावाच्या या विमान कंपनीने घेतलेला निर्णय स्वागतार्ह म्हणावा लागेल. स्त्री-पुरुष मतभेदातील दरी कमी करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी हा निर्णय घेतल्याचे या विमान कंपनीने म्हटले असून सर्वच स्तरांतून त्याचे कौतुक आहे. या निर्णयाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही निश्चितच सकारात्मक परिणाम दिसून येईल. कारण, एका विमान कंपनीने हा निर्णय घेतला असला तरी आगामी काळात इतरही विमान कंपन्या या बाबतीत पुढाकार घेताना दिसतील. त्यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. शिवाय, इतर देशांतील हवाईसुंदरींच्या माध्यमांतून सौदीबाहेर जाणारा पैसाही सौदीमध्येच राहील. त्यामुळे महिलांच्या रोजगाराकडे केवळ समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिल्यास ते देशहितैशी ठरेल, हे सलमान यांनी अचूकपणे जाणलेले दिसते. सलमान राजगादीवर विराजमान झाल्यापासून उच्चपदस्थ अधिकारी म्हणूनही अनेक ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इतकेच काय तर सौदी अरबच्या शेअरबाजाराची प्रमुखही आज एक महिलाच आहे. त्यामुळे महिलांचा साक्षरता दर सौदीमध्ये ९१ टक्क्यांच्या घरात असला तरी नोकरी-व्यवसाय करणाऱ्या महिलांचे प्रमाण हे केवळ १३-१४ टक्केच आहे. पण, अशा स्त्रीसक्षमीकरणाच्या निर्णयामुळे सौदीमधील महिलांना आता आकाशही ठेंगणेच वाटेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/