तरुणाईची ‘इन्सानियत’

    दिनांक  12-Sep-2018   


 


पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, “भारत हा तरुणांचा देश आहे.” मोदींच्या विचारातील हा भारतीय तरुण ‘इन्सानियत’मध्ये दिसला. पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी जो ‘एकात्म मानवतावाद’ मांडला आहे, तो ‘इन्सानियत’च्या सेवाकार्याचा अंतरात्मा आहे. देशाचा सन्मान तो आपला सन्मान माननणारे आणि जागतिक पातळीवर आपल्या देशाची प्रतिमा उंचवावी, यासाठी खारीचा वाटा उचलू इच्छिणारी ‘इन्सानियत’ संस्था.

 

२०१३ साली मी लंडनला बिझनेस मॅनेजमेंट शिकत होतो. माझे दोन मित्र प्रतीक भट आणि ज्योतिबा पाटील हे अमेरिकेला शिक्षण घेत होते. दररोज आमचे बोलणे होत असे. देशापासून दूर होतो. घरापासून दूर होतो. घरची आठवण यायची. मी विदेशात शिक्षण घेत होतो. पण तिकडची संस्कृती पाहून देशाची आणि घरची खूप आठवण यायची. त्यामुळे आम्ही तिघेही मित्र जवळजवळ दररोज एकमेकांशी फोनवरून, व्हिडीओ कॉलिंगद्वारे भेटण्याचा प्रयत्न करायचो. एके दिवशी आम्ही असेच एकमेकांशी कॉन्फरन्स फोनवर बोलत होतो आणि एक धक्कादयक बातमी दिसू लागली. भारताची राजधानी दिल्ली येथे मुलीवर निर्घृण क्रूर अत्याचार. ‘निर्भया हत्याकांड’ म्हणून आपल्या देशात तर संतापाची लाट उसळली. इथे विदेशातही या बातमीने सगळ्यांना हादरवून सोडले. आमच्या सोबतच्या इतर विदेशी विद्यार्थ्यांनी आम्हाला प्रश्न विचारून भंडावून सोडले. आम्ही आमच्या परीने त्यांना सांगायचो की, ‘निर्भया हत्याकांड’ हे खूप दुर्दैवी आहे. पण त्यावरून सगळे भारतीय तसेच आहेत असे मुळीच समजू नका. पण खरं सांगतो, त्या घटनेने मी आणि माझे मित्र हादरून गेलो. इतकी क्रूरता निर्माण कुठून झाली? त्यानंतरही मग एक-दोन तशाच घटना घडल्या आणि वाटले हे काय चालले आहे? आपला देश, आपला समाज, आमचे भारतातील नातेवाईक, मित्र हे सगळे संस्कारशील आणि मानवतावादी असताना या घटना कशा घडतात? देशाला- समाजाला कलंक लावणाऱ्या या घटना थांबायलाच हव्यात. त्यामुळे जेव्हा शिक्षण पूर्ण करून मी, प्रतीक आणि ज्योतिबा मुंबईत परतलो, तेव्हाच ठरवले की, मानवतेचा संदेश घेऊन काम करायचे. कदाचित आपण जमले नाही जमले तरी प्रयत्न करायचेच. या हेतूनेच २०१५ साली ‘इन्सानियत’ ही संस्था स्थापन करण्यात आली.” ‘इन्सानियत’ जे संस्थापक आणि अध्यक्ष अर्जुन मेघे सांगत होते. केवळ २४ वर्षांचा तरुण, त्याचे सहकारी प्रतीक आणि ज्योतिबाही त्याच्याच वयाचे. मुंबईत वरळी भागात ‘इन्सानियत’चे काम जोरदार सुरू आहे. मेघे, पाटील आणि भट आडनावाच्या तरुणांनी संस्थेला ‘इन्सानियत’ हे हिंदी नाव का दिले? यावर ‘इन्सानियत’चे पदाधिकारी सांगतात की, जातपात-धर्म आणि लिंगही यापलीकडे जाऊन सगळ्यांच्या सहकार्याने काम करता यावे, म्हणून आम्ही संस्थेला ‘इन्सानियत’ हे नाव दिले. तसेही विदेशात भारतीय व्यक्तीला ‘तू मराठी, तू उत्तर भारतीय, तू दक्षिण भारतीय’ किंवा धर्मावरून ओळखले जात नाही, तर ‘भारतीय’ म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे आम्हाला असे वाटले की, मुंबईसारख्या सर्वसमावेशक शहरात सर्वांना घेऊन म्हणजे ‘सबका साथ सबका विकास’ करायचा असेल, तर सगळ्यांना आपले वाटेल असे नाव संस्थेला हवे. त्यामुळे संस्थेचे नाव ‘इन्सानियत’ ठेवले गेले.

 

‘इन्सानियत’ने पहिला कोणता उपक्रम केला असेल तर तो ‘माँ बेहेन.’ नावातच आई आणि बहीण ही नाती आहे. या उपक्रमामध्ये मुंबईतील मोठी रेल्वे स्थानके, शाळा, महाविद्यालये इथे महिलांसाठी आणि पुरुषांसाठीही स्व-संरक्षणाचे प्रात्यक्षिके आयोजित केली गेली. सर्वात पहिले प्रात्यक्षिक झाले, ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर. शाळा-महाविद्यालयामंध्येही या प्रात्यक्षिकांना भरपूर प्रतिसाद मिळाला. या प्रात्यक्षिकांचे विशेष हे की, प्रात्यक्षिक फक्त स्त्रियांसाठी नाही, तर पुरुषांसाठीही होते. खूप वेळा असे होते की, मुलींवर अत्याचार होतो. सभोवती लोक असतात. पण कोणीही मध्ये पडत नाही. ‘इन्सानियत’ नेमके यावरच प्रात्यक्षिक करते. एखाद्या मुलीवर जर अत्याचार होत असेल, तर तिथे उपस्थित लोकांनी निर्भिडपणे तिला मदत कशी करावी? यावरही हे प्रात्यक्षिक भर देते. या प्रात्यक्षिकांमध्ये अर्जुन मेघे स्वत: सहभाग घेतात. ते स्वत: कराटेमध्ये ‘ब्लॅक बेल्ट’ आहेत. ‘इन्सानियत’चे उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे, मानवतेचा प्रसार-प्रचार आणि मानवाचे कल्याण. अर्थात, मानवाचे कल्याण म्हणताना इथे स्त्री, पुरुष आणि तृतीयपंथीही अपेक्षित आहेत. वरळी सी-फेस हा तसा हौसे नवसे आणि गवसेंचाही मनसोक्त भ्रमंतीचा परिसर. रात्र झाली की वरळी सी-फेस कात टाकतो. चकचकीतपणाची रूपेरी झाक परिसरावर पसरते. पण त्याचवेळी याच परिसरात तृतीयपंथीयासाठी लाचार आणि समाजाने तिरस्कृत केलेले अस्तित्वही आपले मरणप्राय जगणे जगत असते. त्यांच्यासाठी आवाज उठवणारे कोणी नाही. त्यांच्या दैनंदिन समस्यांवर बोलणारे कोणी नाही. त्यांचा जन्म व मृत्यूमधील जीवन नावाचा भयानक प्रवास आहे. यातील दु:ख जाणणारे कोणी नसते. नेमके हेच दु:ख ओळखून ‘इन्सानियत’ने तृतीयपंथीयांसाठी काम करणे सुरू केले. त्यांचे एकत्रिकरण करणे, त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित करणे. एकदा त्यांचे दु:ख लोकांपर्यंत पोहोचावे म्हणून त्यांचा मेळावा आयोजित करून त्यांची रॅली काढली. या रॅलीमध्ये शेकडो तृतीय पंथी सहभागी झाले होते. मुंबई शहरातील वरळीसारख्या भागात तृतीयपंथीयांची रॅली निघाली. त्या रॅलीचा उद्देश, त्यातून तृतीय पंथीयांचे व्यक्त होणारे प्रश्न याला समाजाने गंभीरपणे ऐकले आणि समजून घेतले यातच सर्व काही आले.

 

वरळी भागात वरळी सी-फेस, बीडीडी चाळ आणि प्रसिद्ध कोळीवाडाही आहे. या परिसरात समाजासाठी एकांगीपणे काम करणे शक्यच नाही. अर्जुन मेघेंचे म्हणणे आहे की, “वरळी सी-फेस परिसरात राहणाऱ्या बांधवांचे प्रश्न हे वरळी बीडीडी चाळीत राहणाऱ्या बांधवांपेक्षा वेगळे आहेत आणि वरळी बीडीडी चाळीत राहणाऱ्या बांधवांपेक्षा वरळी कोळीवाड्याचे प्रश्न वेगळे आहेत. या सर्व प्रश्नांचे संदर्भ, इतिहास आणि परिणाम एकमेकांपासून अतिशय भिन्न आहेत. सारे प्रश्न ‘इन्सानियत’ सोडवूच शकत नाही. मात्र, एकमेकांपासून कित्येक योजने दूर असलेले हे प्रश्न समाजाने एकमेकांशी ‘इन्सानियत’ अर्थात माणुसकीचा दृष्टिकोन आणि व्यवहार ठेवला तर सुटू शकतात. तसेही आर्थिक स्तर आणि राहणीमान त्यानुसार उद्भवलेले प्रश्न वेगळे असले तरी, त्यांना सामोरे जाणारी जी लोकं आहेत, त्यांचे रक्त, त्यांची संस्कृती आणि समाजभाव एकच आहे ना?” अर्जुन यांचे म्हणणे बरोबर होते. अर्जुन मेघे आणि सहकारी यांचे विचार ऐकून वाटले ही तरुण मंडळी समाजाच्या समस्यांचा किती वेगळ्या स्वरूपात विचार करतात. ‘इन्सानियत’ संस्थेच्या कामातही हे वेगळेपण जाणवते. सुरुवातीला ‘इन्सानियत’ने महिला सुरक्षेवर काम सुरू केले. त्यासाठी मुंबईभर पायपीट केली. कार्यक्रम राबवले. विदेशातून उच्च शिक्षण घेतलेल्या आर्थिक आणि सामाजिक स्तरावर उच्चभू्र जीवन जगणाऱ्या अर्जुन, प्रतीक आणि ज्योतिबाला या कार्यक्रमांमधून समाज भेटत होता. स्त्रियांना स्व-संरक्षणाचे प्रात्यक्षिक शिकवूनच त्यांचे रक्षण होऊ शकत नाही, हे सत्य त्यांना कळाले. त्यांना समजले की, स्त्री ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असली तरी मानसिक आणि आर्थिक परावलंबित्वामुळेही तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातही उच्चशिक्षित आणि जरा खाली मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीबाळींना स्वत:ची प्रतिमा आणि प्रतिभाही आता आता कुठे गवसू लागली आहे. पण समाजाच्या बहुरुपात ‘स्त्री’चे अस्तित्व काय आहे? महिला ‘इन्सानियत’च्या कार्यालयात येत आणि समस्यांचा पाढा वाचत. मुख्यतः सारे प्रश्न आर्थिकबाबींशी निगडीत असायचे. घरचा कर्तापुरुष राबतो आणि त्याच्यावर घर चालते तेव्हा दोनवेळचे अन्न मिळते. पण तितकेच आयुष्य आहे का? या महिलांना एकवेळचा मोकळा श्वासही मिळत नाही. त्यांनाही वाटते की, आपण स्वत: काम करावे. पैसे कमवावे. घराला हातभार लावावा. पण शिक्षण कमी, त्यातून घराच्या रामरगाड्यातून बाहेर जाणेच शक्य नाही. असंख्य आयाबहिणींचे हेच दु:ख. ‘इन्सानियत’ने या सगळ्या महिलांची नोंदणी केली. त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले. अगरबत्ती बनवणे, विविध खाद्यपदार्थ बनवणे, कलाकुसरीच्या वस्तू बनवणे, बॅग्स बनवणे, जुन्या साड्यांपासून टिकाऊ सुंदर पर्स बनवणे एक ना अनेक स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण ‘इन्सानियत’ने या महिलांना दिले.

 

नुसते प्रशिक्षण दिले नाही, तर त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंची विक्री व्हावी यासाठीही उपक्रम आयोजित केले. त्यापैकी ‘इन्सानियत‘ हे ‘स्वयंसिद्धी महिला मंडळा‘च्या माध्यमातून महिलांनी बनवलेल्या वस्तूंचे, खाद्यपदार्थांचे प्रदर्शन आयोजित करते. या प्रदर्शनामध्ये ‘इन्सानियत’ महिलांना स्टॉल आणि बाकीच्या सेवाही विनामूल्य उपलब्ध करून देते. ‘इन्सानियत’ या प्रदर्शनामध्ये उद्घाटक किंवा अतिथी म्हणून समाजातील मान्यवरांना बोलावते. या मान्यवरांच्या येण्याने प्रदर्शानातील वस्तूंची, उत्पादनांची एकप्रकारे जाहिरातच होते. या माध्यमातून आज शेकडो स्त्रियांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ‘इन्सानियत’चे नाव घेतले की, कल्पिता साटम यांचा उल्लेख टाळता येणे शक्यच नाही. साधीभोळी गृहिणी असलेल्या कल्पिता साटम, यांना नेहमी वाटायचे की, महिलांच्या कौशल्याशी स्पर्धा कुणी करू शकत नाही. महिलांच्या या कौशल्याला विकसित करायला हवे. त्यासाठी त्या ‘इन्सानियत’च्या माध्यमातून काम करू लागल्या. साटमसारख्या शेकडो महिला आज ‘इन्सानियत’शी जोडल्या गेल्या आहेत. वरळी बीडीडी चाळ म्हणजे विद्रोहाचे केंद्रच समजले जाते. आजही वास्तव बदलले नाही. भीमा-कोरेगाव नंतरही इथे मोर्चे, आंदोलने वगैरे झाली. यावेळी समाजातील अभंगत्व टिकवण्यासाठी ‘इन्सानियत‘ पुढे आली. भीमा-कोरेगाव समर्थनार्थ निघालेल्या मोर्चामध्ये ‘इन्सानियत’चे पदाधिकारी मिसळले. मोर्चात सहभागी झालेल्यांना नक्की काय वाटते, हे समजून घेतले. कारण आपल्याला काय वाटते हे जितके महत्त्वाचे तितकेच महत्वाचे की या समाजातल्या इतर घटकांना काय वाटते? त्यानंतर ‘इन्सानियत’ने तरुणांच्या बैठका घेतल्या. आपण केवळ भारतीय आहोत, माणूस म्हणून आपले प्रश्न सध्या जरी वेगळे वाटत असले तरी पुढे गेल्यावर त्याची पाळेमुळे एकच असतील हा संदेश घेऊन ‘इन्सानियत’ वस्तीपातळीवर गेली.

 

समाजाला एकत्र आणण्यासाठी ‘इन्सानियत’ने एक शक्कल लढवली. भारत-पाकिस्तान मॅच बघताना दोन भारतीयांमध्ये कितीही दुरावा असला तरी भारत जिंकला की दोघेही जल्लोषाच्या भावनेने एकत्र येतात. नेमके हेच हेरून ‘इन्सानियत’ने ठिकठिकाणी क्रीडास्पर्धा भरवल्या. विविध वस्त्यांतील संघाचे एकत्रिकरण करून स्पर्धा खेळवल्या. यामुळे जातीमुळे विभागले जाऊ की काय? अशी शक्यता असणारे युवक खेळाच्या सांघिक माध्यमांतून एकत्र आले. या तरुणांना पुढे सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी अनेक उपक्रमांत सहभागी करण्याची कल्पनाही ‘इन्सानियत’ने राबवली. यातूनच मग ‘इन्सानियत’ने तरुणांची अनाथाश्रम, वृद्धाश्रम, दिव्यांगासाठीची शाळा यामध्येही एकत्रित भेट आयोजित करण्याचा उपक्रम सुरू केलाइतक्या विविध पातळीवर आणि सूक्ष्म नियोजन करून ‘इन्सानियत’चे काम चालते. या साऱ्यांना वैचारिक तसेच आर्थिक बळ कुठून मिळत असेल? यावर अर्जुन म्हणाले, “स्वामी विवेकानंदांचे विचार वाचताना मनात नेहमी अद्भुत शक्ती निर्माण होते. ते म्हणतात, “उठा माझ्या सिंहांनो, तुम्ही निर्बल आहात हा भ्रम मिटवा. तत्त्व तुमचे सेवक आहेत. तुम्ही तत्त्वचे सेवक नाही.” हा विचार ‘इन्सानियत’च्या प्रत्येक सदस्याच्या मनात विचारात रूजला आहे. ही आमची प्रेरणा आहे. यातूनच आम्ही समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. संस्थेसोबत अनेक युवक जोडले गेले आहेत. प्रशांत दुबेसारखे सहकारी याचे उत्तम उदाहरण आहे. माझी कंपनी आहे, मित्रांचेही उद्योग व्यवसाय आहेत, आम्ही सर्व मिळून ‘इन्सानियत’च्या उपक्रमांचा खर्च उचलतो.” ‘इन्सानियत’चे अध्यक्ष अर्जुन मेघे काय किंवा इतर पदाधिकारी काय, यांची पार्श्वभूमी काय असावी? इतका वेळ ‘इन्सानियत’च्या कार्याची माहिती देणाऱ्या अर्जुन मेघेंना तसे विचारल्यावर क्षणभर थांबून ते म्हणाले, “मी माजी खासदार दत्ता मेघेंचा मुलगा. ते नेहमी सांगतात, समाजाने आपल्याला खूप दिले आहे. त्या समाजाची परतफेड करणे आपले कर्तव्य आहे, असे संस्कार आम्हा सगळ्यांवर आपोआप झाले आहेत. त्यामुळे ‘इन्सानियत’चे काम करताना मला काही वेगळे करतो असे वाटत नाही. ‘इन्सानियत’च्या माध्यमातून समाजभाव घेऊन काम करणाऱ्या तरुणांना पाहून वाटले की, धन्य आहे ‘इन्सानियत’ आणि धन्य आहे भारतमाता!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/