ऐलान-ए-जंग...!

    दिनांक  12-Sep-2018   

 


 
 
एकीकडे भारतीय जनता पक्षाने ‘अजेय भारत, अटल भाजप’चा नारा देत २०१९चे रणशिंग फुंकणं आणि दुसरीकडे काँग्रेसने इंधन दरवाढीच्या निमित्ताने तमाम विरोधी पक्षांचा जथ्था गोळा करत दुसऱ्याच दिवशी ‘भारत बंद’ पुकारणं या दोन महत्त्वाच्या राजकीय घटना नुकत्याच भारतीय जनतेने पाहिल्या. प्रत्येक पाऊल आत्मविश्वासपूर्वक टाकत, विजयाचा अखंड ध्यास घेतलेला भाजप आणि काही ना काही कारणाने विरोधी आघाडी उभारण्यासाठी साऱ्या सोम्यागोम्यांना एका छत्रछायेखाली आणण्याचा काँग्रेसचा चाललेला केविलवाणा प्रयत्न, देशाच्या राजकारणाचं चित्र पुरेसं स्पष्ट करणाऱ्या आहेत. ‘या भाजपचं करायचं तरी काय,’ असा प्रश्न सध्या तमाम विरोधी पक्षांना पडला असून त्याचं उत्तर काही केल्या त्यांना मिळताना दिसत नाही. पूर्वीइतकंच किंबहुना अधिकच वाढलेलं वलय आणि उंचावलेली प्रतिमा असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्षणाक्षणाला सर्वांच्या कल्पनेपलीकडील व्यूहरचना आखणारे आणि तिला तितक्याच शिस्तीने आणि समर्पणाने राबवून घेणारे सेनापती अमित शाह आणि या दोघांसोबत असलेली सक्षम नेत्यांची फौज, दिमतीला उभरते प्रादेशिक नेतृत्व, तळागाळात पोहोचलेली-झिरपलेली पक्षसंघटना आदी आणि अशा अनेक साऱ्या घटकांच्या जोरावर भाजप एक कुणालाच न रोखता येणारा अश्वमेध बनला आहे. या भाजपला पराभूत तर करायचं आहे, पण नेमकं कसं, हेच कुणाला समजलेलं नाही. सारं काही करून झालं. वेगवेगळे मोर्चे काढून झाले, आंदोलनं उभारून झाली, जातीधर्माच्या नावावर आगीत तेल ओतून झालं, भाजपनेत्यांची-मंत्र्यांची जात काढून झाली, धरपकड झालेल्या नक्षलसमर्थकांची बाजू घेऊन राष्ट्रद्रोही भूमिका मांडून झाली, सैन्यदलाच्या सर्जिकल स्ट्राईकवर शंका घेऊन झाल्या. असं सारं काही करूनही जनता भाजपच्याच मागे उभी राहताना दिसते. नुकतंच महाराष्ट्रात मराठा मोर्चांनंतर झालेल्या सांगली-जळगावच्या निवडणुकीतील विजयही त्याचेच द्योतक. भाजप कार्यकारिणी बैठकीत अमित शाह म्हणाले की, “२०१९ ची निवडणूक आपण जिंकलो तर पुढील ५० वर्षे भाजपला कुणी हरवू शकणार नाही.” काहींना हे विधान पटलं नाही, अतिशयोक्ती वाटली किंवा डोक्यात गेलेली हवाही वाटली. परंतु, राजकारणाची सद्यस्थिती पाहिली तर अमित शाह वस्तुस्थिती सांगत होते, हे लक्षात येईल. कारण, तेवढा आत्मविश्वास त्यांच्यापाशी आहे आणि त्यांनी तो कमावला आहे.
 

पहिले पाढे पंचावन्नच...

 

नरेंद्र मोदी, अमित शाह किंवा एकूणच भाजपच्या आत्मविश्वासाला भेदण्याचं आव्हान विरोधी पक्षांना झेपण्यासारखं वाटत नाही. कारण, मुळात, त्यांच्याकडेच आत्मविश्वास दिसत नाही. २०१४ साली त्यांनी जो आत्मविश्वास गमावला, तो त्यांना आजपर्यंत परत आणता आला नाही. दरम्यानच्या काळात त्यावर आघात झाले ते निराळेच. ज्या काँग्रेस पक्षाने लोकशाही व्यवस्थेतील विरोधी पक्षाची महत्त्वाची भूमिका निभवायची, सरकारवर वचक ठेवायचा, तो काँग्रेस पक्ष आज विरोधी आघाडीसाठी छोट्यामोठ्या प्रादेशिक पक्षांच्या दारात खेटे घालताना दिसतो. परवाचा ‘भारत बंद’ हे याचंच एक उदाहरण. इंधन दरवाढ झाली. एक धोरण किंवा सरकारविरोधी व्यूहरचना म्हणून त्याच्या विरोधात आंदोलन उभारणं रास्त आहे. परंतु, त्या ‘भारत बंद’च्या भाषणात काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष आणि पुढे पंतप्रधान बनण्याची स्वप्ने पाहणारे राहुल गांधी काय म्हणतात? तर, “२०१९ मध्ये मोदींना पराभूत करण्यासाठी एकत्र या.” अहो, हे आंदोलन आहे कशासाठी? इंधन दरवाढीच्या विरोधासाठी की मोदींना पराभूत करण्यासाठी? याचं उत्तर स्पष्ट आहे, जे स्वतः राहुल यांनीच भाषणात सांगितलं. मोदींना पराभूत करण्यासाठी. त्या फसलेल्या ‘भारत बंद’मध्ये कोण कोण सहभागी झाले? जे स्वतः बंद पडत चालले आहेत, ते पक्ष यामध्ये सहभागी झाले. सोशल मीडियावर ‘बंद’च्या दिवशी हा विनोद सर्वाधिक व्हायरल होत होता. वीस-बावीसहून अधिक पक्ष त्या ‘बंद’मध्ये सहभागी होतात, ज्यापैकी बहुतांश पक्ष आणि नेते कधी ना कधी सत्तेत होते, मंत्रिपदी होते, त्यांच्या व्यापक वगैरे आंदोलनाची भारतीय जनता अक्षरशः खिल्ली उडवत होती आणि हे होणारंच होतं. ज्यांच्याकडे स्वतःचं असं काही नसतं, त्यांचं असंच होतं. ना सक्षम चेहरा, ना सशक्त भूमिका, ना जनाधार, ना संघटनात्मक बांधणी. मग करणार काय? मोदीविरोधाशिवाय उरलंच काय! त्यातल्या त्यात एक बरं झालं की, किमान काँग्रेस नेते रस्त्यावर तरी उतरले. वर्षानुवर्षं सत्तेची ऊब घेऊन सुस्तावलेले काँग्रेसजन रस्त्यावर उतरण्याइतपत तरी जागे आणि जागेवर आहेत, हेही नसे थोडके. इकडे मुंबईत कथित मराठी हृदयसम्राटांनी तर घरूनच भारत बंदकेला. कार्यकर्ते रस्त्यावर आणि साहेब घरी. त्यामुळे किमान आता तरी काँग्रेस व इतर विरोधी पक्षांनी थोडं आत्मपरीक्षण करून परिपक्व आणि सक्षम विरोधी पक्षासारखं वागायला हवं. पुढे निवडणुकीत कुणाचं काय करायचं, हे जनता ठरवेलच.